पसायदान साहित्य संमेलनाचे महत्व - अनिल जवळेकर


पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन आळंदी येथे 13-15 एप्रिल 2018 दरम्यान संपन्न झाले. हे एक वेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन असल्याने समाजातील धुरिणांनी आणि सामान्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. देशात ख-या धार्मिक विचार प्रवर्तनाचे (समाजधारणेचा विचार मांडणारे, विश्वातील सर्व घटकांचे केवळ सुखच नव्हे तर हितही कशात आहे हे पुढे आणणारे – संकुचित विचार व विशिष्ट उपासनापद्धतीवर अवाजवी भर देणारे नव्हे) कार्यक्रम फारसे होत नाहीत. या वैचारिक व संवाद परंपरेला बळ देण्याचे समयोचित धैर्य श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी दाखवले याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. भारतीय समाजाच्या सर्वोपरी विकासासाठी व भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मत्ता साधणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीनेही आळंदी येथे भरलेल्या पहिल्या पसायदान विचार संमेलनाचे महत्व आहे. साहित्यकारांनी व धार्मिक म्हणवल्या जाणाऱ्या संस्थांनी हा प्रयोग करावा आणि त्यांना सर्वच राजकीय पक्षांनी व धर्मिक पांथिकांनी तसेच मजहबीयांनी सहकार्य करावे हे या संमेलनाचे फलित म्हटले पाहिजे.
पसायदान हा विश्व कल्याणाचा जाहीरनामा
पसायदानाचे महत्व महाराष्ट्राला सांगण्याची गरज नसली तरी जागतिक स्तरावर त्याची महती गायली जाणे गरजेचे आहे कारण याच संमेलनातील आपल्या प्रकट मुलाखतीत  प्रसिद्ध विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटल्या प्रमाणे पसायदान हा एक विश्व कल्याणाचा जाहीरनामाच आहे. 91व्या मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुखांनी सुध्दा भूमिका मांडताना पसायदानाच्या विचाराला एकूणच वारकरी संप्रदायाचा पाया मानले व पसायदान हे एक विश्‍वशांतीसाठी रचलेलं महान असं शांतीसूक्त आहे असे म्हटले. ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशा विचारांनी विश्‍वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी मजहब (religion), जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे जी की प्रत्येक मजहब, पंथ वा समाजगट यांना आपली वाटू शकते आणि हा भारतीय एकात्म विचार दर्शनाचा मुख्य भाग म्हणता येईल.
राजकारणी व धार्मिक अभ्यासकांचा सहभाग
पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे स्वरूप, त्यातील विषय व त्यात पक्षीय राजकारण्यांनी व इस्लाम, ख्रिस्त, बौध्द, जैन व शीख मजहब/पंथांच्या अभ्यासकांनी घेतलेला भाग महत्वाचा म्हणावा लागेल. त्यात कुणी काय विचार मांडले हे ह्याठिकाणी महत्वाचे नाही तर पसायदाना सारख्या विषयावर त्यांना चर्चा करताना अवघडल्यासारखे झाले नाही हे विशेष. महत्वाचे म्हणजे सर्व अभ्यासकांनी पसायदानातील विचार हाच आपल्या मजहब/पंथाचाही विचार असल्याचे विश्वासाने सांगितले. राजकारण्यांनी मात्र आजचे राजकारण अध्यात्म विचारापासून फारकत घेत असल्याचे मत व्यक्त केले.
एकात्म विश्वदृष्टी हाच भारतीयांचा मूळ विचार
श्री ज्ञानदेवांची पसायदानात व्यक्त झालेली विश्वदृष्टी हाच खरा भारतीय विचार आहे हे मान्य व्हावे व त्यासृष्टीने एकूणच भारतीय एकात्म विचार दर्शन चर्चेत येणे गरजेचे आहे. आजच्या बाजारी, उपभोगवादी व असहिष्णु बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्यासाठीच हे संमेलन आहे असे संमेलनाचे उदघाटन कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी जे सांगितले ते खरेच म्हणावे लागेल. आणि म्हणूनच पसायदान विचार साहित्य संमेलनाचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल. येत्या काळात अशी  संमेलने होत राहिली तर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीने एक मोठे पाउल टाकल्या सारखे होईल असे म्हणावेसे वाटते.