वर्तणुकीचे अर्थशास्त्र - अनिल जवळेकर

अमेरिकेचे अर्थतज्ञ श्री रिचर्ड थेलर यांना त्यांनी वर्तणुकीच्या अर्थशास्त्रात केलेल्या कामगिरीबद्दल नुकतेच नोबेल पारितोषक देण्यात आले. आधुनिक पाश्चात्य अर्थशास्त्रात सामान्यपणे स्वार्थ साधण्याच्या वर्तणुकीला मान्यता आहे. अर्थव्यवहारातील मानव हा समजदारीने आपला स्वार्थ साधतो ह्या गृहितकावर अर्थशास्त्र उभे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. थेलर ह्यांचे वर्तणुकीचे अर्थशास्त्र हे मानायला तयार नाही. त्यांच्या मते वास्तविक व्यवहारात मानव हा असा समजदारीने वागत नाही. बऱ्याच वेळा खूप पर्याय दिले तर त्याच्या हातून चूक होण्याचीच शक्यता असते म्हणून पर्याय देताना नीट विचार झाला पाहिजे. त्यातून इष्ट पर्यायाकडे लोकांना हळुवारपणे ढकलावे (nudging), अशाने लोक इष्ट निर्णय घेण्याची शक्यता वाढते असे मानणारे हे वर्तणुकीचे अर्थशास्त्र आहे. एका दृष्टीने भारतीय चिंतनाच्या काहीसा जवळ जाणारा हा पैलू आहे असे म्हणता येईल.

भारतीय चिंतन मानवाला पूर्णपणे स्वार्थाच्या आधीन मानत नाही तर अज्ञानाच्या आधीन मानते. अज्ञान दूर झाले तर मानव आपले हित जाणेल व तेच समाज धारणेत उपयोगी ठरेल. त्यामुळे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा भारतीय चिंतनाचा आग्रह आहे. अर्थात अर्थशास्त्रात पर्यायांची माहिती पुरवली म्हणजे अज्ञान दूर होते व विक्रेत्याची जबाबदारी संपली असे मानले जाते व जाहिरातबाजीने मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय चिंतन ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीला समाजहिताची दृष्टी देते व समाज धारणेचा मार्ग खुला करते.

पाश्चिमात्य अर्थशास्त्र व्यक्तीला स्वार्थी बनवते व सरकार कडून समाजधारणेची व समाजहिताची अपेक्षा ठेवते. कंपन्यांना इच्छित निर्णय लोकांनी घ्यावेत यासाठी उपयोगी पडणारे वर्तणुकीचे अर्थशास्त्र समाजधारणेत तोटके पडण्याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय मानसशास्त्राची जोड दिली तर कदाचित ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. वर्तणूक प्रभावित करणे फक्त आर्थिक क्षेत्रातच आवश्यक नसते तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे हे मान्य व्हावे. आणि त्यासाठी मानव मानसिकदृष्ट्‍या प्रगल्भ होणे गरजेचे आहे जेणे करून व्यक्तिगत स्वार्थापेक्षा त्याला समाजहित महत्त्वाचे वाटले पाहिजे. यासाठी एकात्मतेची संकल्पना सतत पुढे ठेवली पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ साधल्याने मानव फक्त भोगवादी होत जाईल व ते समाज धारणेत बाधा टाकणारे असेल. एकात्मतेच्या जाणीवेतून आलेली प्रगल्भता सर्वांचे हित साधणारी असेल व समाजधारणेत उपयुक्त ठरेल असे म्हणता येते. वर्तणुकीचे अर्थशास्त्र भारतीय चिंतनाचा आधार घेत वाटचाल करेल तर ते निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.

सुलभ एकात्म मानव दर्शन – 04 (क्रमशः) -ले. विनय पत्राळे

3 भारतीय चिंतन

पृथ्वी वरील जीवन पाण्यात सुरू झाले. संस्कृत मध्ये पाण्यासाठी ‘जीवन’ हा शब्द आहे. त्यानंतर भूमीवर पशु, आकाशात पक्षी निर्माण झालेत. त्यांच्या पोषणासाठी निसर्गाने वनस्पती, धन-धान्य, फळे-फुले इत्यादि आधीच निर्माण करून ठेवलेले होते. प्रगतीच्या एका टप्प्यावर मनुष्याचा उद्भव झाला. मनुष्याचे प्रारंभिक जीवन पशुसमान होते. त्यानंतर तो शेती करू लागला. स्थिर जीवन जगू लागला. भाषा जन्माला आली. संस्कृती उदयास आली. मनुष्य विचार करू लागला. सर्वात मूलभूत प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. ते म्हणजे

1 ‘कोSहं’ मी कोण आहे?

2 कुतः आगतः? मी कोठून आलो आहे?

3 मला कोठे जायचे आहे?

4 हे पशु-पक्षी वनस्पति.. सारे कोठून आले व कोठे जाणार आहेत?

5 मी व ही सभोवतालची सृष्टि यांचा परस्परांशी काय संबंध आहे?

जगात सर्वप्रथम भारतीय मनीषींनी या प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने शोध घ्यायला प्रारंभ केला. अदृष्टाचा शोध! त्यांच्या ध्यानात आले की जशी रचना, जशा व्यवस्था आपल्यामध्ये आहेत, तशीच रचना बाहेरच्या विश्वात सुद्धा आहे. त्यांना त्यामध्ये अद्भुत साम्य आढळले. मनुष्याच्या शरीरात जसे रुधिराभिसरण, अन्नपचन, श्वासप्रश्वास अशी चक्रे आहेत त्याचप्रमाणे निसर्गात सुद्धा परस्परावलंबी आणि परस्परपूरक अशी चक्रे आहेत. मनुष्य आणि इतर पशु-पक्षी प्राणवायू घेतात व कर्बाम्ल वायु सोडतात तर वनस्पती कर्बाम्ल वायू घेतात व प्राणवायू मुक्त करतात. मनुष्याचे शरीर वनस्पतीचा झाडपाला खाऊन संवर्धित होते तर तेच शरीर मृत झाल्यानंतर व कुजल्यानंतर वनस्पतीचा आहार होते. निसर्गाची ही चक्रे आपसात व्यवस्थित गुंतलेली आहेत. एकाच महाकाय यंत्राचे घटक असल्यासारखी ही चक्रे आपसात एकदुस-याच्या लयीमध्ये फिरत असतात. यातील एखादे सुद्धा चक्र निसटले तर निसर्गाची गती अडखळते. लहानशा अमीबापासून तर महाकाय प्राण्यापर्यंत एक सुव्यवस्थित रचना आहे. त्याला त्यांनी नाव दिले ‘यत्पिंडे तद् ब्रह्मांडे’

अणुकेंद्रात व अणुकेंद्राच्या सभोवती फिरणा-या सूक्ष्म घटकांपासून तर प्रचंड ग्रहगोलांच्या गतिपर्यंत सर्वत्र एक लयबद्धता आहे. ही लयबद्धता एकाच शक्तिचे स्पंदन अभिव्यक्त करत असते. ती शक्ती सर्वव्यापी आहे. ती सर्वसाक्षी आहे. संपूर्ण विश्व त्या सतत प्रसरण पावणा-या ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. त्याशिवाय दुसरे काहीही नाही. तेच सर्वत्र स्थूल व सूक्ष्म स्वरुपात आहे. ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’

अग्निच्या ठिणग्या सर्वत्र पसराव्यात तसे चैतन्याचे आविष्कार सर्वत्र पसरलेले आहेत. ते सर्व प्राणीमात्र वनस्पती आणि तथाकथित निर्जीव वस्तुंमध्ये सुद्धा असतातच. त्या एकतेची अनुभूती करणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे. या लक्ष्याला त्यांनी मोक्ष हे नाव दिले.

या दृष्टिकोनातून भारतीय ऋषींनी सर्वत्र पहायला सुरुवात केली. सर्व प्रश्नांचा व समस्यांचा विचार याच दृष्टिकोनातून केला. ‘एकात्म’ भावनेतून चिंतन करीत असताना जे भोवतालच्या सृष्टीशी तदाकार झालेत त्यांना अनुभूती झाली. ह्या अद्भुत एकत्वाचा अनुभव घेतलेले आधुनिक महर्षी म्हणजे स्वामी विवेकानंद! श्री रामकृष्णांनी स्पर्श केल्याबरोबर आजूबाजूचे सर्व विश्व एकाच शून्यात विरघळून जात असल्याची त्यांना अनुभूति झाली. अशा अनुभवासाठीची आध्यात्मिक सिद्धता त्या वेळी नसल्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर त्यांनी अनेकदा हा अनुभव वर्णन करून सांगितला. पुढे भविष्यात केवळ स्पर्शाने इतरांना अशा प्रकारचा अनुभव देण्याची सिद्धी त्यांच्यात आली.

पाश्चिमात्य जगताने सर्व बाबींचा तुकड्या-तुकड्यांत विचार केला. त्यात खोलवर जाऊन प्रत्येक तुकड़ा भिन्न आहे असे समजून त्याला तपासले. त्यामुळे पश्चिमी जगात ‘स्पेशालिस्ट’ निर्माण झालेत. उदाहरणार्थ आरोग्य क्षेत्रात डोळ्यांचा डॉक्टर वेगळा, दातांचा वेगळा, नाक-कानांचा वेगळा, हाडे जोडणारा वेगळा, चामडीचा वेगळा... शरीराचा वेगळा आणि मनोजन्य रोगांचा वेगळा.

भारताने सर्व चिंतन ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’ या सूत्रावर आधारित केले. त्यामुळे त्यात व पाश्चिमात्य चिंतनात काही मूलभूत फरक दिसतात. पश्चिमी जगताचे चिंतन डार्विनच्या उत्क्रांतीवादावर आधारित आहे. त्याचे चार पायाभूत सिद्धांत व त्याच्या जोडीला त्याच संदर्भातील भारतीय विचार, असे आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ.

(पुढे क्रमशः डार्विनचे चार पायाभूत सिद्धांत Struggle for existence, Survival of the fittest, Exploitation of nature, Individual rights)