सुलभ एकात्म मानव दर्शन – 05 -विनय पत्राळे



(मागील भागात भारतीय चिंतन थोडक्यात पाहिले. या भागात डार्विनच्या चार पायाभूत सिद्धांतापैकी Struggle for existence, Survival of the fittest हे दोन सिद्धांत व तुलनेने भारतीय विचार पाहूयात. डार्विनचे बाकी दोन सिद्धांत Exploitation of nature, Individual rights पुढील भागात)

अ) (Struggle for existence) अस्तित्वासाठी संघर्ष
डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा हा प्रथम सोपान आहे. म्हणजे सृष्टीत सर्वत्र बळी तो कान पिळी हा न्याय डार्विनने पाहिला. त्याला सर्वत्र संघर्ष दिसला. शाकाहारी प्राणी झाडपाला खाऊन राहतात तर मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खाऊन राहतात. अस्तित्वासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. मोठा मासा लहान माशाला खाऊन आपली भूक भागवितो. मनुष्यामध्ये सुद्धा अधिक बलशाली दुर्बलांवर राज्य करतो. बलवान राष्ट्रे आपल्या वसाहती बनवतात व त्यांचे शोषण करून अधिकाधिक गब्बर होत जातात. त्यामुळे त्याने प्रथम सिद्धांत मांडला अस्तित्वासाठी संघर्ष!’
         भारतीय चिंतनानुसार सर्वत्र एकच ब्रह्म विद्यमान असल्यामुळे संघर्षाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर मग हा वरवरचा संघर्ष दिसण्याचे कारण काय? त्याचे कारण स्वतःच्या ख-या अस्तित्वाची ओळख नसणे हे आहे. एकदा जर का ही ओळख पटली, तर मग संघर्ष समाप्त होतो.
         समजा एखाद्या कार्यक्रमात अचानक वीज गेली व सर्वत्र अंधकार झाला तर सगळा गोंधळ उड़तो. इकड़े-तिकडे जात असताना कोणी दुस-यावर आदळला तर अंधारातच भांडण सुरू होते. भांडणाच्या दरम्यान अचानक वीज येऊन प्रकाश पडला तर सर्व लख्ख होते. लक्षात येते की अरे! हा तर आपला मित्रच! मग भांडण समाप्त होते.
         भारतीय चिंतन म्हणते की मायेच्या आवरणामुळे वरवर संघर्ष दिसतो. पण सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर हे आवरण वितळले की एकत्वाची अनुभूती होते.
डार्विनला मनुष्याच्या शरीर व मनामध्येसुद्धा संघर्ष दिसला. मनाची इच्छा खूप आवडता पदार्थ खायची असती तरी शरीर थोड्या वेळानंतर नाही म्हणू लागते. मना क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जाते शरीराच्या गतीवर मर्यादा असते. त्यामुळे शरीर व मनातही संघर्ष आहे असे त्याला वाटते.
पण शरीरही माझे व मनही माझेच असा भाव पक्का असेल तर संघर्ष येत नाही. उलट मनाच्या संकल्पनांना शरीरसुद्धा साथ देते.
         ही एकतेची जाणीव येशू ख्रिस्तामध्ये आली तेव्हा त्यानी त्यांची हत्या करणा-याविषयी पण देवाकडे त्यांना क्षमा करण्याचेच मागणे मागितले. याच जाणीवेमुळे संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या अभिषेकासाठी कावडीतून आणलेले पाणी तहानेने तडफडत असलेल्या गाढवाच्या तोंडात ओतले.
         मनुष्याची आपलेपणाची जाणीव ही फार तर त्याच्या कुटुंबाविषयी अथवा त्यांच्या जातीपर्यंत विस्तारित होते. तिच्या कक्षा रुंदावत जेव्हा संपूर्ण सृष्टिशी एकाकार होतात तेव्हा मनुष्य ईश्वररूप होतो. त्यामुळे भारतीय चिंतन अस्तित्वासाठी संघर्ष या सिद्धांताशी सहमत नाही.

ब) (Survival of the fittest) शक्तिशालीचा विजय
मराठीत याला बळी तो कान पिळी असे म्हणतात. हिंदीमध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशी म्हण आहे. अस्तित्वासाठी संघर्ष झाल्यानंतर दुर्बळांचा नाश होईल व स्पर्धेत जो टिकेल, त्याचे अस्तित्व राहील असे हा नियम सांगतो.
               असे असल्यास वृद्ध, अपंग, गरीब, लहान मुले इत्यादींनी काय करावे. त्यांचे पोषण कोण करणार, की त्यांनी नष्ट व्हावे हेच योग्य आहे?
                भारतीय चिंतनास हे मान्य नाहीं. येथे सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः ही प्रार्थना आहे. कमानेवाला खाएगा हा विचार वरवर चांगला वाटला तरी जन्मा है सो खायेगा, कमानेवाला खिलायेगा हा विचार अधिक उन्नत आहे. From each according to capacity  आणि To each according to need हे जास्त स्वीकारणीय आहे.
       समाजाचे सर्वात प्राथमिक स्वरूप म्हणजे आपला परिवार आहे. त्याला भांडवलशाहीचे सिद्धांत लावले तर घरातील वृद्ध अथवा मुले यांना जेवण मिळणार नाहीं व कमावणा-यांनाच ते मिळेल. सर्वांनी कम्युनिस्ट विचारांचे अवलंबन करायचे ठरवल्यास लहान थोर सर्वांना सारख्या संख्येने भाकर मिळेल. पण तो भारतीय परिवार असेल व जेवण कमी तयार झाले असेल तर घरातील वडीलधारी मंडळी म्हणतील, आज मुलांना पोटभर जेऊ द्या, आपल्याला उपाशी राहूनही चालेल.उद्याचे उद्या मग बघू!’ आपल्या या व्यवस्थेत दुर्बळ घटका विषयी अधिक सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे.
      वनवासात असताना पांडव भिक्षा मागून आणत. कुंती त्या भिक्षेचे दोन भाग करीत असे. त्यातील अर्धा  वाटा भीमाचा काढून उर्वरित भाग चार पांडव, कुंती व द्रौपदी मिऴून वाटून घेत. पण कोणीही याचा विरोध केला नाही. कारण जंगलात येणा-या राक्षसांशी लढण्यासाठी अथवा चालून दमलेल्या कुंतीला खांद्यावर घेऊन चालण्यासाठी भीमाची शक्ती टिकून रहाणे ही पांडव परिवाराची आवश्यकता होती. त्यानुसार भिक्षेची वाटणी होत असे.
      थोडक्यात म्हणजे सृष्टिचक्रात सर्वच प्राण्यांचे पशु-पक्षी मानव यांचे स्वतःचे विशिष्ट स्थान असून त्यात सर्वांची कदर केली जाते. एखादी प्रजाती कमी अथवा नष्ट होत असेल तर त्याने करायचे काम राहून जाते. त्यामुळे Survival of the fittest पेक्षा सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः हा भारताचा दृष्टिकोन आहे.   (पुढे क्रमशः)

भारतीय लोकशाहीतील राजेशाही - अनिल जवळेकर



श्री राहुल गांधीनी शेवटी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे ठरवले. एरवीही ते पद श्री राहुलजी शिवाय  कुणाला मिळणार नव्हतेच. भारतीय लोकशाहीची शोकांतिका येथेच म्हणावी लागेल. भारतीय लोकशाहीत राजेशाही राबवण्याचा प्रयोग भारतातील बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांचे राजकीय नेतृत्व करत आहेत असे म्हणणे भाग आहे. सर्व जग, त्यात भारतीय नव-स्वातंत्र्यवादीही आले, भारतीय लोकशाही यशस्वी झाल्याचे म्हणत असताना हा चिंतेचा विषय ठरावा. प्रश्न येतो तो हा कि मग निवडणूक नामांकन वगैरेची औपचारिकता तरी कशासाठी केली गेली?
              स्वातंत्र्यानंतर भारतीय नेतृत्वाने मोठ्या अभिमानाने संसदीय लोकशाही स्वीकारली व लोकांनी मताधिक्याने निवडून दिलेल्या नेतृत्वाकडून राज्यकारभार होईल अशी आशा बाळगली. राजकीय पक्ष उदय पावतील व ते लोकशाही हायजॅक करतील असे त्यांना वाटले असावे म्हणूनच कदाचित त्यांनी राजकीय पक्षांना राज्यघटनेत फारसे स्थान दिले नसावे. पण काळाला काही औरच मान्य होते. राजकीय पक्ष संख्येने उदंड झाले एवढेच नव्हे तर त्यांनी राजेशाहीतील घराणेशाही जिवंत ठेवली. भाजपा व साम्यवादी पक्ष सोडले तर बहुतेक पक्ष घराण्याशी जोडले असल्याचे चित्र आहे.
       एकात्म मानव दर्शनाचा विचार करतांना दीनदयाळजीनी राजकारण राष्ट्रनिर्माणासाठी करण्यावर भर दिला. राष्ट्रहितनिष्ठा ही सर्वोपरी व राजकीय निष्ठा ही दुय्यम असावी असा आग्रह धरला. आजचे भारतीय राजकारण राष्ट्रनिष्ठ असण्या एवजी व्यक्तीनिष्ठ व घराणेनिष्ठ होत चालले आहे असेच म्हणावे लागेल. राहुलजीचे पक्षाध्यक्ष होणे याला धरून आहे. पण यात फक्त कॉंग्रेस पक्षच आहे असे मानण्याचे कारण नाही. भाजपातही नेतृत्वात नसली तरी कार्यकर्त्यात घराणेशाही उतरत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
       भारतीय लोकशाहीचे निवडणुका हे एक प्रमुख अंग आहे आणि निवडणुकात ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत घराणेशाहीची मक्तेदारी होणे धोक्याचे म्हणावे लागेल. यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत व एकंदरच अभिशासन (Governance) यात बराच बदल होणे गरजेचे आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात खालील बाबींचाही विचार केला पाहिजेः
1 केंद्र व प्रांत सरकारचा आकार व आवाका कमी करणे. सरकार करत असलेली अनेक कामें सामाजिक संघटनांनी करणे जशी ती पूर्वी आपल्या देशात केली जात होती उदा. शिक्षणसंस्था व आरोग्यसेवा चालवणे, किमान आवश्यक तेवढेच सरकारी उद्योग चालवणे, विकासकामांचे शक्य तितके ग्रामपंचायत व जिल्हा परिषदांकडे हस्तांतरण करणे, नव्या तंत्रज्ञानाचा व माहितीक्रांतीचा उपयोग करून उत्पादनांचे  विकेंद्रीकरण करणे इ.
2 राजकारणापलीकडे जाऊन समाजातील विद्वान, निस्वार्थी व राष्ट्रहितदक्ष लोकांची आचार्य परिषद बनवून त्याच्याकडून सल्ला घेत रहाणे
3 पक्ष, खासदारकी व मंत्रीपद इ. साठी 10 वर्षे ही कमाल मर्यादा ठरवणे
4 कोणतीही व्यक्ती ही पक्ष किंवा लोकप्रतिनिधित्व तसेच सामाजिक, आर्थिक वा धार्मिक केवळ एका पदावरच राहू शकेल. इतर सर्व पदांचा त्याग केला पाहिजे.
5 निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव तसेच विषयप्राविण्याची पातऴी ठरविणे