सुलभ एकात्म मानव दर्शन – 05 -विनय पत्राळे



(मागील भागात भारतीय चिंतन थोडक्यात पाहिले. या भागात डार्विनच्या चार पायाभूत सिद्धांतापैकी Struggle for existence, Survival of the fittest हे दोन सिद्धांत व तुलनेने भारतीय विचार पाहूयात. डार्विनचे बाकी दोन सिद्धांत Exploitation of nature, Individual rights पुढील भागात)

अ) (Struggle for existence) अस्तित्वासाठी संघर्ष
डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा हा प्रथम सोपान आहे. म्हणजे सृष्टीत सर्वत्र बळी तो कान पिळी हा न्याय डार्विनने पाहिला. त्याला सर्वत्र संघर्ष दिसला. शाकाहारी प्राणी झाडपाला खाऊन राहतात तर मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खाऊन राहतात. अस्तित्वासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. मोठा मासा लहान माशाला खाऊन आपली भूक भागवितो. मनुष्यामध्ये सुद्धा अधिक बलशाली दुर्बलांवर राज्य करतो. बलवान राष्ट्रे आपल्या वसाहती बनवतात व त्यांचे शोषण करून अधिकाधिक गब्बर होत जातात. त्यामुळे त्याने प्रथम सिद्धांत मांडला अस्तित्वासाठी संघर्ष!’
         भारतीय चिंतनानुसार सर्वत्र एकच ब्रह्म विद्यमान असल्यामुळे संघर्षाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर मग हा वरवरचा संघर्ष दिसण्याचे कारण काय? त्याचे कारण स्वतःच्या ख-या अस्तित्वाची ओळख नसणे हे आहे. एकदा जर का ही ओळख पटली, तर मग संघर्ष समाप्त होतो.
         समजा एखाद्या कार्यक्रमात अचानक वीज गेली व सर्वत्र अंधकार झाला तर सगळा गोंधळ उड़तो. इकड़े-तिकडे जात असताना कोणी दुस-यावर आदळला तर अंधारातच भांडण सुरू होते. भांडणाच्या दरम्यान अचानक वीज येऊन प्रकाश पडला तर सर्व लख्ख होते. लक्षात येते की अरे! हा तर आपला मित्रच! मग भांडण समाप्त होते.
         भारतीय चिंतन म्हणते की मायेच्या आवरणामुळे वरवर संघर्ष दिसतो. पण सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर हे आवरण वितळले की एकत्वाची अनुभूती होते.
डार्विनला मनुष्याच्या शरीर व मनामध्येसुद्धा संघर्ष दिसला. मनाची इच्छा खूप आवडता पदार्थ खायची असती तरी शरीर थोड्या वेळानंतर नाही म्हणू लागते. मना क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जाते शरीराच्या गतीवर मर्यादा असते. त्यामुळे शरीर व मनातही संघर्ष आहे असे त्याला वाटते.
पण शरीरही माझे व मनही माझेच असा भाव पक्का असेल तर संघर्ष येत नाही. उलट मनाच्या संकल्पनांना शरीरसुद्धा साथ देते.
         ही एकतेची जाणीव येशू ख्रिस्तामध्ये आली तेव्हा त्यानी त्यांची हत्या करणा-याविषयी पण देवाकडे त्यांना क्षमा करण्याचेच मागणे मागितले. याच जाणीवेमुळे संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या अभिषेकासाठी कावडीतून आणलेले पाणी तहानेने तडफडत असलेल्या गाढवाच्या तोंडात ओतले.
         मनुष्याची आपलेपणाची जाणीव ही फार तर त्याच्या कुटुंबाविषयी अथवा त्यांच्या जातीपर्यंत विस्तारित होते. तिच्या कक्षा रुंदावत जेव्हा संपूर्ण सृष्टिशी एकाकार होतात तेव्हा मनुष्य ईश्वररूप होतो. त्यामुळे भारतीय चिंतन अस्तित्वासाठी संघर्ष या सिद्धांताशी सहमत नाही.

ब) (Survival of the fittest) शक्तिशालीचा विजय
मराठीत याला बळी तो कान पिळी असे म्हणतात. हिंदीमध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशी म्हण आहे. अस्तित्वासाठी संघर्ष झाल्यानंतर दुर्बळांचा नाश होईल व स्पर्धेत जो टिकेल, त्याचे अस्तित्व राहील असे हा नियम सांगतो.
               असे असल्यास वृद्ध, अपंग, गरीब, लहान मुले इत्यादींनी काय करावे. त्यांचे पोषण कोण करणार, की त्यांनी नष्ट व्हावे हेच योग्य आहे?
                भारतीय चिंतनास हे मान्य नाहीं. येथे सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः ही प्रार्थना आहे. कमानेवाला खाएगा हा विचार वरवर चांगला वाटला तरी जन्मा है सो खायेगा, कमानेवाला खिलायेगा हा विचार अधिक उन्नत आहे. From each according to capacity  आणि To each according to need हे जास्त स्वीकारणीय आहे.
       समाजाचे सर्वात प्राथमिक स्वरूप म्हणजे आपला परिवार आहे. त्याला भांडवलशाहीचे सिद्धांत लावले तर घरातील वृद्ध अथवा मुले यांना जेवण मिळणार नाहीं व कमावणा-यांनाच ते मिळेल. सर्वांनी कम्युनिस्ट विचारांचे अवलंबन करायचे ठरवल्यास लहान थोर सर्वांना सारख्या संख्येने भाकर मिळेल. पण तो भारतीय परिवार असेल व जेवण कमी तयार झाले असेल तर घरातील वडीलधारी मंडळी म्हणतील, आज मुलांना पोटभर जेऊ द्या, आपल्याला उपाशी राहूनही चालेल.उद्याचे उद्या मग बघू!’ आपल्या या व्यवस्थेत दुर्बळ घटका विषयी अधिक सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे.
      वनवासात असताना पांडव भिक्षा मागून आणत. कुंती त्या भिक्षेचे दोन भाग करीत असे. त्यातील अर्धा  वाटा भीमाचा काढून उर्वरित भाग चार पांडव, कुंती व द्रौपदी मिऴून वाटून घेत. पण कोणीही याचा विरोध केला नाही. कारण जंगलात येणा-या राक्षसांशी लढण्यासाठी अथवा चालून दमलेल्या कुंतीला खांद्यावर घेऊन चालण्यासाठी भीमाची शक्ती टिकून रहाणे ही पांडव परिवाराची आवश्यकता होती. त्यानुसार भिक्षेची वाटणी होत असे.
      थोडक्यात म्हणजे सृष्टिचक्रात सर्वच प्राण्यांचे पशु-पक्षी मानव यांचे स्वतःचे विशिष्ट स्थान असून त्यात सर्वांची कदर केली जाते. एखादी प्रजाती कमी अथवा नष्ट होत असेल तर त्याने करायचे काम राहून जाते. त्यामुळे Survival of the fittest पेक्षा सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः हा भारताचा दृष्टिकोन आहे.   (पुढे क्रमशः)

3 comments:

  1. डार्विनची मांडणी ही आधिभौतिक स्वरुपाची आहे (Positive theory). ह्या थिअरीचा उद्देश केवळ मनुष्यजात नव्हे तर सर्व सजीवांच्या अस्तित्वाची आणि त्यातील बदलाची स्पष्टता करणे एवढाच आहे. आपली species टिकून राहण्यासाठी आपल्या प्रजातीचा biological fitness वाढवणं आणि त्याद्वारे अधिकाधिक गुणवान (biologically fit) संतत्ती निर्माण करणं ह्या उद्दिष्टाने सजीवांत जनुकीय स्तरावर बदल होत जातात असे डार्विनच्या मांडणीचे सार सांगता येईल. ही उत्क्रांती का होते आहे ह्याचे कसलेही उत्तर ह्या थिअरीमध्ये नाही (Blind Watchmaker). केवळ positive म्हणजे आधिभौतिक थिअरी आहे.
    मला असा प्रश्न पडतोय कि एका आधिभौतिक मांडणीची तुलना एका अध्यात्मिक मांडणीबरोबर (इथे भारतीय चिंतन - कारण त्यांत काय चांगले, काय बरोबर असा normative खल आहे) करणे कितपत बरोबर आहे? भौतिक जगाच्या अस्तित्वाचे नियम आणि मानवाने कसे वागावे ह्याची मांडणी ह्या दोघांची तुलना कशी काय होऊ शकते? डार्विनचा Struggle for Existence आणि survival of fittest (डार्विनचा शब्द natural selection) हे सिद्धांत प्रजाती-प्रजातीच्या तुलनेत आहेत. प्रजातीच्या अंतर्गत तुलनेसाठी नाही. ह्या आधिभौतिक सिद्धांताना नैतिक सिद्धांत मानणे चुकीचे नाही का?
    हे काही प्रश्न आपल्या मांडणीने पडले.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. जरी डार्विनने आपले सिद्धांत सजीवांच्या जनुकीय स्तरावर होणा-या बदलांच्या संदर्भांत मांडले असले तरी ते कालांतराने ते पाश्चात्य समाज विचारातही आले व दुर्बळांना दाबणे, त्यांचे शोषण करणे व प्रसंगी त्यांना नष्ट करणे या पद्धतीला एक प्रकारे तात्त्विक पाठिंबा मिळाला. त्याचे दुष्परीणाम साम्राज्यशाहीचे बळी झालेल्य देशात दिसतात. पर्यावरणाचेही नुकसान झाले. हा परीणाम देवावर विश्वास असता वा व्यक्ती, कुटुंब, सृष्टी व परमेष्ठी यांच्यातला एकात्म भावाची काही जाणीव असती तर कदाचित झाला नसता वा एवढा टोकाचा झाला नसता. – विनय पत्राळे 1.1.2018

    ReplyDelete
  3. Read both comment and answer. I still feel that bashing Darwin for this is out of place. His theory doesn't apply to interspecies struggle. Rebuttal of it based on incorrect interpretation not just makes it absurd, it also raises a question on the credibility of author. If someone attempted to employ Darwinism to explain social conflict it is better to quote him.

    ReplyDelete