इतिहासाचे देणे - अनिल जवळेकर


इतिहासाच्या पुस्तकावरून आपल्या देशात नेहमीच वाद होत असतात. मध्यंतरी महाराणा प्रताप-अकबर युद्धा वरून असाच वाद झाला होता. महाराष्ट्रात मराठा साम्राज्या विषयी असेच अधून-मधून वाद होत असतात. सध्याही राणी पद्मावती चित्रपटावरून वाद चालूच आहे. त्यामुळे इतिहासाचे महत्व व भूमिका या विषयी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे असे वाटते.

इतिहास सर्वांनाच असतो. पण इतिहास नेमका काय होता व तो कसा सांगीतला जातो वा जावा या विषयी मतभेद असतात. असे म्हटले जाते कि बहुतेक इतिहासाविषयीची पुस्तके स्वगत भाषणा सारखी वा monologue पद्धतीची असतात कारण इतिहासकार म्हणविणारे आपल्या आकलनानुसार व समजुतीनुसार इतिहास सांगत असतात. त्यात इतिहासकाराने स्वीकारलेल्या राजकीय विचाराचा दृष्टीकोन ब-याचदा प्रभावकारी असतो. भारतात डाव्या विचाराच्या व सेक्यूलर इतिहासकारांच्या बाबतीत ते विशेषत्वाने घडले आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे भारताचा इतिहास जसा आहे तसा सांगीतला जातो असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

दुर्दैव असे की भारत हजार वर्षे गुलामीत राहिला. अश्या परिस्थितीत जेत्यांनी जेत्यांच्या सोईप्रमाणे इतिहास लिहिला व सांगितला असे मानायला जागा आहे. स्वतःला इतिहासकार समजणारे बहुतांशी, यात भारतीय सुद्धा आहेत, भारताला स्वतःचा इतिहास नाही असे मानणारे आहेत. त्यांच्या मते भारतीयांनी फक्त कथा आणि काव्य लिहिली ज्यात इतिहास कमी व कल्पना जास्त होती. असे इतिहासकार एका दृष्टीने भारताचा इतिहासच नाकारत असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. असा इतिहास नाकारणे वा स्थानिक पराक्रमाचा प्रेरणादायी इतिहास न सांगणे सुद्धा आपल्या पुढच्या पिढीची प्रतारणा केल्या सारखे होईल. इतिहास सांगण्याचा उद्देश आपल्या संकृतीची व आपल्या देशाची जडण घडण कशी झाली हा जसा असू शकतो तसाच जनमानसात आपल्या संकृतीचा अभिभान व सर्वांच्या मनात राष्ट्रीयता निर्माण करणे हा सुद्धा असतो. अशा स्थितीत जेत्यांनी वा त्यांच्या भाटांनी सांगितलेला इतिहास उपयोगाचा नसणार हे स्पष्ट आहे. कारण त्यात स्थानीय पराभव प्रभावाने सांगितला जातो. स्थानीय लोक व स्थानीय उठाव, स्थानीय पराक्रम, स्थानीय संस्कृती व स्थानीय देशाभिमान जागृत करणारा इतिहास सांगणे त्यामुळे महत्वाचे ठरते. जेत्यांचा इतिहास गुणगुणन्यापेक्षा हा स्थानिक उठाव, पराक्रम, देशासाठी त्याग जास्त प्रेरणादायी व भावी पिढी घडवण्यात जास्त उपयोगी ठरेल. राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश त्यानेच साध्य होऊ शकतो असे म्हणावेसे वाटते.

2 comments:

  1. इतिहासातून प्रेरणा मिळते। त्यासाठी प्रेरणा देणारा इतिहास भावी पिढीपुढे ठेवला पाहिजे। प्रेरणा न देणारी इतिहासाची पाने वगळायला काय हरकत आहे? अभिमान बाळगावा असा भरपूर इतिहास आपल्याकडे आहे। तो सोडून फक्त पराभवाचा इतिहास सांगितल्यास तेजोभंगच होणार। हा तेजोभंग भावी पिढ्यासाठी घातक ठरेल।

    ReplyDelete
  2. Although I agree that the history can have multiple interpretations, and some of them more nationalist in nature, we should not undermine the importance of rigour. Your example in that sense lacks substance because it is of very limited use. Also, we should acknowledge that it is hard to label true or false history since connecting dots of available information is always subjective. More and more information is the only solution to reduce subjectivity.

    ReplyDelete