सुलभ एकात्म मानव दर्शन – 06 (क्रमशः) - विनय पत्राळे

(मागील भागात डार्विनच्या चार पायाभूत सिद्धांतापैकी Struggle for existence, Survival of the fittest हे दोन सिद्धांत व तुलनेने भारतीय विचार पाहिले. डार्विनचा सिद्धांत Exploitation of nature या भागात. Individual rights पुढील भागात)

क) (Exploitation of Nature) प्रकृतीचे शोषण
मनुष्याला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिलेले आहे. ते सृष्टीला समजून तिचा योग्य प्रकारे परिपोष करण्यासाठी! पण मनुष्य बुद्धीच्या बऴावर स्वतःला सृष्टीचा राजा समजू लागला. सर्व सृष्टी स्वतःच्या उपभोगासाठी आहे असे मानू लागला. स्वतःच्या सुखसोईसाठी निसर्गाला वाटेल तसे ओरबाडू लागला. असे करणे म्हणजे स्वतःचा अधिकार आहे असे त्याला वाटू लागले.
      विनोबा भावेनी त्यांच्या मधुकर नावाच्या पुस्तकात एक लेख लिहिला आहे. त्यातला एक प्रसंग असा.... एक जण त्यांना प्रश्न विचारतो की गाई-बक-या दूध देतात, कोंबड्या अंडी देतात, कुत्रा रक्षण करतो पण वाघ-सिंह सारख्या प्राण्यांचा फायदा काय?’ यावर विनोबा उत्तर देतात सर्व प्राणी आपल्या  फायद्यासाठी नसतात हे लक्षात येणे... हाच फायदा!’    
       मनुष्याच्या भोगवादी वृत्तीमुऴे ओझोन वायुला छिद्र पडून त्यातून सूर्याचे अतिनील किरण आत येऊन चामडीचा कॅन्सर होण्याचे संकट उभे ठाकलेले आहे. हवेत कार्बन वायुचे प्रमाण वाढल्यामुऴे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. (Global warming) वार्मिंगमुळे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पाण्याती पातऴी वाढल्यामुळे समुद्रकिना-यावरची गावे व शहरे पाण्याखाली जातील की काय अशी भीति निर्माण झाली आहे.
       भौतिक विचारांवर आधारित व्यवस्थांमुळे झालेला हा परिणाम आहे. प्रचंड पैसा, ऊर्जाभक्षी कारखाने. प्रदूषण. आर्थिक विषमता. मानसिक असंतुलन हे आज निर्माण झालेले विषचक्र आहे.
       पण निसर्ग सुद्धा सर्व चुप-चाप सहन करेल हे शक्यच नाही. तो आपला हिशोब चुकता करतो. त्याची झापड़ झिणझिण्या आणणारी असते. त्याच्या कोर्टामध्ये वकील किंवा अपील चालत नाही.
       भारतीय दृष्टिकोन या संदर्भात कसा आहे ते पाहु या. ईशावास्य उपनिषदात एक श्लोक असा आहे.  ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।।
म्हणजे ईश्वराने निर्मित केलेल्या जगताचा त्यागपूर्वक उपभोग मनुष्याने करावा. निसर्गाचे शोषण करू नये. पण निसर्गाक़डून घ्यावे तर लागतेच. तेव्हा निसर्गाचे दोहन करावे. येथे दोहन शब्द अतिशय सुंदर अर्थाने योजला आहे. गाईला चार आचळ असतात. त्यातील दोन आचळातून मनुष्याने दूध घ्यावे व उर्वरित दोन तिच्या वासरासाठी ठेवावे असा संकेत आहे. असे संकेत समाजात प्रस्थापित केले गेले.
              आपल्या पूर्वजांना जेव्हा जाणवले की संपूर्ण सृष्टि ही परमात्म्याचेच प्रकट स्वरूप आहे व आपण सर्व त्याचा भाग आहोत तेव्हा त्यांनी याचक भावनेने व कृतज्ञतापूर्वक सृष्टिपासून घेण्याचा संस्कार रुजविला.आयुर्वेदिक औषधे देणारे धन्वंतरी वैद्य हे प्रथम झाडाची क्षमा मागून त्याला विनंती करतात व त्यानंतर आपली आवश्यकता सांगून त्याची पानें, मुळे, फळे जे औषधनिर्मितीसाठी उपयोगी आहे ते घेतात.
                 निसर्गाप्रति हा दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी आपल्या पूजाघरामध्ये नवगृहांची स्थापना करण्यात येते. वड, पिंपळ, तुळस हे वृक्ष पवित्र मानले जातात. नद्यावरती कुंभमेळा भरतो, घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन केले जाते. संध्याकाळ झाल्यानंतर देवाच्या पूजेसाठीसुद्धा फुले तोड़ण्याची मनाई असते, कारण वृक्ष झोपतात – त्यांना त्रास होऊ नये. अशी भावना असते. वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरे असे तुकोबारायांनी म्हटले आहे.
                 दुसरे म्हणजे आपल्याकड़े आदर्श कोणाला मानले गेले. ज्याच्याकड़े अमाप संपत्ती, पैसा, सत्ता आहे त्याला नव्हे. तर जो सर्वसंगपरित्याग केलेला भगवा वस्त्र धारण केलेला संन्यस्त जीवन जगणारा आहे. जो निसर्गाकडून अथवा समाजकडून कमीतकमी घेतो आणि अधिकाधिक परत देतो तो आपल्या संस्कृतीत पूज्य मानला गेला.
                 आपण जगण्यासाठी श्वास घेतो, प्राणवायू वापरतो, अन्न खातो, खनिजे वापरतो, लाकूड वापरतो..... त्यामुळे निसर्गाची झीज होते. ही झीज भरुन काढण्याची व्यवस्था निसर्गाकड़े असते पण त्याला निश्चित कालावधी लागतो. तो कालावधी जाऊ दयावा लागतो. निसर्गाची झीज भरून काढण्याची गती व माणसाची निसर्ग वापरण्याची गती यात संतुलन साधले गेले तर निसर्ग टिकून रहातो. अन्यथा ज्याप्रमाणे टाकीतून पाणी वाहून नेणारे नळ अधिक झाले तर टाकी रिकामी होते त्याप्रमाणे निसर्गाचा
-हास होत जातो.
जमिनीच्या पोटात जे इंधन (fossil fuel) तयार होण्यासाठी सहा अब्ज वर्षे लागलीत, ते इंधन मनुष्याने गेल्या 60 वर्षात संपवत आणले. आता पुढे वीस वर्षानंतर कोणते इंधन वापरणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सगळेच विश्व या तिढ्यात अडकले आहे. त्यातून सुटण्याचा मार्ग शोधते आहे.
मागे वीस वर्षापूर्वी रियो-डी-जानीरो येथे पर्यावरणासाठी Mother Earth Summit झाले होते. भारताचे प्रतिनिधि या नात्याने तत्कालीन पंतप्रधान श्री नरसिंह राव तेथे गेले होते. त्यांची भाषणात सांगितले की आज पर्यावरण विनाशाच्या टोकावर येऊन ठेपलेले असताना तुम्ही मदर अर्थ हा शब्द वापरून सम्मेलन बोलावित आहात पण आम्ही वेदकाळापासूनच माता भूमि पुत्रोSहम् पृथिव्याः हा श्लोक म्हणत आलो आहोत.  आमच्या विचारविश्वातच पर्यावरणाची मातृस्वरूपात वंदना करणे आहे. थोडक्यात म्हणजे आज प्रचलित झालेला Eco friendly lifestyle हा शब्द सहजपणे आमच्या जीवनरचने आढळतो. आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त घेणारा हा चोर आहे व त्यास दंड दिला पाहिजे असे वेदात म्हटले आहे. आज विश्वाला या जीवनदृष्टिची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment