सुलभ एकात्म मानव दर्शन – 07 (क्रमशः) - विनय पत्राळे

(मागील भागांत डार्विनच्या चार पायाभूत सिद्धांतापैकी Struggle for existence, Survival of the fittest, Exploitation of nature हे तीन सिद्धांत व तुलनेने भारतीय विचार पाहिले. डार्विनचा चौथा सिद्धांत Individual rights या भागात)



ड) (Individual rights) व्यक्तिगत अधिकार

पाश्चिमात्य चिंतनाप्रमाणे व्यक्ति ही स्वतंत्र आहे आणि समाज स्वतंत्र आहे. दोन स्वतंत्र घटकांचे एक दुस-याबरोबर संयोजन करायचे असेल तर ते नियमांद्वारेच होऊ शकते. त्यामुऴे व्यक्ति व समाज यामध्ये एक नियमावली / करार झालेला आहे असे ते मानतात.

प्रत्येक राष्ट्राचा इतर राष्ट्रांशी संबंध येतो. अशी सर्व राष्ट्रे मिऴून पृथ्वीवरचा मानवसमाज निर्माण होतो. यापेक्षा मोठी असते सृष्टि! सृष्टिमध्ये पशु, पक्षी, वनस्पती, पर्यावरण सर्वच अंतर्भूत झालेले असते. जर मनुष्य ईश्वराचे अस्तित्व मान्य करत असेल तर ‘परमेष्ठी’चे वर्तुळ हे सृष्टीच्या वर्तुळापेक्षा मोठे असून त्यात इतर सर्व वर्तुऴे समाविष्ट असतात.

पाश्चिमात्य चिंतनाप्रमाणे ही सर्व वर्तुळे कॉन्सेट्रिक (Concentric circles) असतात. एका मध्यबिंदुभोवती ती आखलेली असतात, पण एका वर्तुळाचा दुस-या वर्तुळाशी संपर्क / संबंध नसतो. अमेरिकेमध्ये व्यक्तिगत अधिकारांचा एवढा गवगव आहे की शाळेत जाणा-या मुलालासुद्धा त्याचे व्यक्तिगत अधिकार शिकवले जातात. वडीलांनी थापड़ मारली किंवा आईने रागावून एखादे काम करायला सांगितले, तर पोलिसांना फोन करून त्याविरुद्ध तक्रार कशी नोंदवावी हे विशिष्ट नंबर दाबून पोलिसांना माहिती देण्याचे प्रशिक्षण शाळेत दिले जाते. माझा जोडीदार झोपेत घोरत असल्यामुळे माझा शांत झोपेचा अधिकार भंग होतो व त्यामुळे मला घटस्फोट मिऴाला पाहिजे... हे म्हणणे अत्यंत योग्य मानले जाते.





भारतीय चिंतनाप्रमाणे प्रत्येक वर्तुऴाची कक्षा हऴूहऴू रुंदावत जाते व एका वर्तुळाला समाहित करणारे दूसरे वर्तुळ त्यातून निर्माण होत जाते. वर्तुळे कोठही एकदुस-यापासून वेगळी नसतात. इंग्रजी भाषेत या रचनेला (Spiral) सर्पिल रचना असे म्हणतात. सर्पिल रचनेमध्ये आतले वर्तुळ हे बाहेरच्या वर्तुळाचाच एक अवयव असते.

भारतीय चिंतनानुसार मनुष्य-परिवार-समाज-राष्ट्र- सृष्टि-परमेष्ठी यांत अंगांगी भाव आहे. एका बृहद् शरीराचे (अंग) इतर अंगी आहेत - म्हणजे अवयव आहेत. अवयवांचे स्वतंत्र अधिकार नाहीत पण ते दुस-या अंगांशी जोडले असल्यामुळे त्यांची कर्तव्ये आहेत. किंबहुना एकाच्या अधिकाराचे रक्षण दुस-याने कर्तव्यपालन करण्यात निहित आहे. त्यामुऴे भारतीय चिंतन हे कर्तव्य प्रधान आहे असे म्हणता येईल. उदाहरणार्थ शिक्षण मिळणे हा मुलांचा अधिकार आहे व आईव़डिलांनी स्वकष्टाने पैसा मिळवून त्यांची फी भरल्यास म्हणजे स्वतःचे कर्तव्य केल्यास मुलांच्या अधिकाराचे संरक्षण होईल. तसेच तरुण पुत्राने स्वतःचे कर्तव्य केल्यास वृद्ध आईवडिलांच्या अधिकाराचे संरक्षण होईल. शिक्षकाने कर्तव्य केल्यास विद्यार्थ्यांच्या अधिकाराचे रक्षण व विद्यार्थ्यांनी कर्तव्य केल्यास शिक्षकांच्या अधिकाराचे रक्षण होईल. यालाच गीतेमध्ये असे म्हटले आहे ‘स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः’ म्हणजे प्रत्येकाने आपापले कर्तव्य मनःपूर्वक करावे असे केल्यास सर्वांचेच कल्याण होईल.

अशाच प्रकारे आपण संपूर्ण सृष्टिचा विचार केला तर व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र यांनी स्वतःची कर्तव्ये केल्यास अन्यांच्या अधिकारांचे संरक्षण होईल. यातील मोठ्या घटकाने लहान घटकाचे रक्षण पोषण करावे आणि लहान घटकांनी मोठ्यांचा सन्मान करावा अशी विभागणी करीत गेल्यास संतुलन टिकून राहील. परिवारातील एक मनुष्य परिश्रम करून सुखाचा त्याग करून पैसा मिळवतो त्यामुळे परिवाराचे चक्र फिरत असते त्याप्रमाणेच गावाच्या भल्यासाठी एखाद्या परिवाराने त्याग करावा असे संस्कृत सुभाषित आहे.

त्यजेदेकं कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्। ग्रामं जनपदस्यार्थे, आत्मार्थे पृथिवीं त्यजेत्।।

अशी संस्कृतीची प्रेरणा असल्यामुळे दुस-यांच्या अधिकाररक्षणासाठी अथवा समष्टिच्या कल्याणासाठी त्याग करणारे आपल्या रचनेत महान समजले गेले. पितृवचनासाठी सत्तेचा त्याग करणारे राम, वृत्रासुराला मारण्यासाठी अस्थिदान करणा-या दधीचीपासून उदयपुर गादीचा वंशदीपक उदयसिंह जीवित रहावा म्हणून स्वपुत्राचे बलिदान देणारी पन्नादाई - देशाला स्वतंत्र करण्यासाठी आत्माहुती देणारे सर्व क्रांतिकारक - आपल्या देशात पूज्य मानले गेले.

त्यामुळे डार्विनच्या संकल्पनेचा चौथा आधारस्तंभ म्हणजे एकांगी व्यक्तिगत अधिकार भारतीय चिंतनाने नाकारला असून व्यक्तिगत कर्तव्यावर अधिक भर दिलेला आहे. (पुढे क्रमशः)