पसायदान साहित्य संमेलनाचे महत्व - अनिल जवळेकर


पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन आळंदी येथे 13-15 एप्रिल 2018 दरम्यान संपन्न झाले. हे एक वेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन असल्याने समाजातील धुरिणांनी आणि सामान्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. देशात ख-या धार्मिक विचार प्रवर्तनाचे (समाजधारणेचा विचार मांडणारे, विश्वातील सर्व घटकांचे केवळ सुखच नव्हे तर हितही कशात आहे हे पुढे आणणारे – संकुचित विचार व विशिष्ट उपासनापद्धतीवर अवाजवी भर देणारे नव्हे) कार्यक्रम फारसे होत नाहीत. या वैचारिक व संवाद परंपरेला बळ देण्याचे समयोचित धैर्य श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी दाखवले याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. भारतीय समाजाच्या सर्वोपरी विकासासाठी व भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मत्ता साधणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीनेही आळंदी येथे भरलेल्या पहिल्या पसायदान विचार संमेलनाचे महत्व आहे. साहित्यकारांनी व धार्मिक म्हणवल्या जाणाऱ्या संस्थांनी हा प्रयोग करावा आणि त्यांना सर्वच राजकीय पक्षांनी व धर्मिक पांथिकांनी तसेच मजहबीयांनी सहकार्य करावे हे या संमेलनाचे फलित म्हटले पाहिजे.
पसायदान हा विश्व कल्याणाचा जाहीरनामा
पसायदानाचे महत्व महाराष्ट्राला सांगण्याची गरज नसली तरी जागतिक स्तरावर त्याची महती गायली जाणे गरजेचे आहे कारण याच संमेलनातील आपल्या प्रकट मुलाखतीत  प्रसिद्ध विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटल्या प्रमाणे पसायदान हा एक विश्व कल्याणाचा जाहीरनामाच आहे. 91व्या मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुखांनी सुध्दा भूमिका मांडताना पसायदानाच्या विचाराला एकूणच वारकरी संप्रदायाचा पाया मानले व पसायदान हे एक विश्‍वशांतीसाठी रचलेलं महान असं शांतीसूक्त आहे असे म्हटले. ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशा विचारांनी विश्‍वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी मजहब (religion), जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे जी की प्रत्येक मजहब, पंथ वा समाजगट यांना आपली वाटू शकते आणि हा भारतीय एकात्म विचार दर्शनाचा मुख्य भाग म्हणता येईल.
राजकारणी व धार्मिक अभ्यासकांचा सहभाग
पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे स्वरूप, त्यातील विषय व त्यात पक्षीय राजकारण्यांनी व इस्लाम, ख्रिस्त, बौध्द, जैन व शीख मजहब/पंथांच्या अभ्यासकांनी घेतलेला भाग महत्वाचा म्हणावा लागेल. त्यात कुणी काय विचार मांडले हे ह्याठिकाणी महत्वाचे नाही तर पसायदाना सारख्या विषयावर त्यांना चर्चा करताना अवघडल्यासारखे झाले नाही हे विशेष. महत्वाचे म्हणजे सर्व अभ्यासकांनी पसायदानातील विचार हाच आपल्या मजहब/पंथाचाही विचार असल्याचे विश्वासाने सांगितले. राजकारण्यांनी मात्र आजचे राजकारण अध्यात्म विचारापासून फारकत घेत असल्याचे मत व्यक्त केले.
एकात्म विश्वदृष्टी हाच भारतीयांचा मूळ विचार
श्री ज्ञानदेवांची पसायदानात व्यक्त झालेली विश्वदृष्टी हाच खरा भारतीय विचार आहे हे मान्य व्हावे व त्यासृष्टीने एकूणच भारतीय एकात्म विचार दर्शन चर्चेत येणे गरजेचे आहे. आजच्या बाजारी, उपभोगवादी व असहिष्णु बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्यासाठीच हे संमेलन आहे असे संमेलनाचे उदघाटन कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी जे सांगितले ते खरेच म्हणावे लागेल. आणि म्हणूनच पसायदान विचार साहित्य संमेलनाचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल. येत्या काळात अशी  संमेलने होत राहिली तर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीने एक मोठे पाउल टाकल्या सारखे होईल असे म्हणावेसे वाटते.

सुलभ एकात्म मानव दर्शन – 10 (क्रमशः) - विनय पत्राळे


(मागील भागात काम व अर्थ पुरुषार्थ हे पैलू पाहिले. उरलेले धर्म व मोक्ष या भागात)
धर्म पुरुषार्थ: धर्म शब्द अनेक ठिकाणी नियम/ कायदे अशा अर्थाने वापरला जातो. उदा. 'परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे हे धर्मात बसत नाही.'
अनेकदा धर्म हा स्वभाव या अर्थानेसुद्धा वापरला जातो. उदा. 'संपर्कात आलेल्याला भस्म करणे हा अग्नीचा धर्म आहे.'
कित्येक ठिकाणी धर्म हा शब्द कर्तव्य अशा अर्थाने वापरतात. उदा. अहो तुमच्या घरच्या लग्नात मदत करणे हा आमच्या लेखी शेजारधर्म आहे.
अनेकदा दुसऱ्यांसाठी निरपेक्ष सेवा अशा अर्थाने सुद्धा धर्म हा शब्द योजला जातो. उदा. धर्मशाळा, धर्मार्थ दवाखाना, धर्मकाटा इ.
'धर्म' हा व्यापक अर्थ असलेला गहन शब्द आहे. 'धारणा करणे' अशा अर्थाने तो मुख्यतः: वापरला जातो. 'धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा' म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी यांच्यात संतुलन साधणारी, प्रत्येक घटकाचे पोषण/ संवर्धन करणारी व्यवस्था म्हणजे धर्म होय. थोडक्यात विश्वभराच्या व्यवस्था संचालनासाठीचे, काळाच्या कसोटीवर टिकलेले, शाश्वत नियम म्हणजे धर्म म्हणता येईल.
हे नियम स्थलकालनिरपेक्ष आहेत. शाश्वत सिध्दांतांच्या प्रकाशात काळानुसार त्यांची व्याख्या करणे याला युगधर्म किंवा आचारधर्म असे नाव आहे. प्राणसंकट आले असताना इतर सर्व उपचार बाजूला ठेऊन स्वरक्षण करावे याला आपद्धर्म असे नाव आहे. यात कुठेही ज्या अर्थाने हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असे म्हणतात तसे अभिप्रेत नाही तर सर्वकल्याणकारी, शाश्वत, सार्वजनीन नियम असा भाव यात आहे.
त्यामुळेच भारतात 'धर्म' या शब्दाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. 'धर्माकरिता मरावे' अथवा 'स्वधर्मे निधन श्रेय: परधर्मो भयावह:' हे वाक्य काय दर्शविते? येथे परधर्म याचा अर्थ हिंदू, मुस्लिम, इसाई अशा अर्थाने नाही. उद्या शाळेत मन लावून शिकवणाऱ्या शिक्षकाला केवळ चांगला मनुष्य आहे; देशभक्ती मुलांना शिकवतो म्हणून जर बंदूक घेऊन युद्ध करायला पाठवले तो त्याच्यासाठी व सैन्यासाठी सुद्धा परधर्मो भयावह: असे ठरेल. मुलावर आत्यंतिक प्रेम करणारी आई मुलगा आजारी पडला म्हणून स्वत:च त्याला इंजेक्शन टोचायला लागेल तर 'परधर्मो भयावहः' असे होईल. अशा अर्थाने 'धर्म' येथे आला आहे.
आपल्या संसदेत 'यतो धर्मस्ततो जय:' हे वाक्य लिहिले आहे. येथे आजच्या प्रचलित अर्थाने हिंदू धर्म की यहुदी धर्म की बहाई धर्म...... कोणता धर्म समजावा? कोणताही नाही.
खरे पाहता 'धर्म' या शब्दाचा कोणत्या देवाला मान, कोणत्या पूजाघरात जा, कोणते ग्रंथ माना काय कर्मकांड पाळा इ.शी काहीही संबंध नाही. ही सर्व संप्रदायाची (sect or religion) वैशिष्ट्ये आहेत. धर्म म्हणजे मजहब (Religion) नव्हे. धर्म व मजहब (Religion) यांच्या गल्लतीमुळे मूळ 'धर्म' संकल्पनेला खऱ्या अर्थाने समजून घेताना अनेक पूर्वग्रह आडवे येतात.
भारतीय चिंतनात खऱ्या अर्थाने धर्मोपासनेला पुरुषार्थ मानले गेले आहेत. आपल्यावर अन्याय होतो आहे हे जाणून सुद्धा पुत्रधर्म पाळण्यासाठी राम वनात गेले. आपणच जेष्ठ पांडव आहोत हे जाणल्यानंतरसुद्धा मित्रधर्मासाठी कर्ण दुर्योधनाकडून महाभारताचे युद्ध लढला. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला तेव्हा जो पराभूत होईल त्याने दुसऱ्याचे शिष्यत्व स्वीकारावे अशी अट होती. त्याकाळी बौद्धिक प्रामाणिकता एवढी होती कि या शास्त्रार्थाचा निर्णायक म्हणून मंडनमिश्रांच्या पत्नीकडे जबाबदारी सोपवली गेली. पतीचा पराभव झाल्याचा तिच्या बुद्धीने कौल दिला. हे स्वीकारणे म्हणजेच पती संन्यास धारण करून घर सोडेल हे मान्य करणे. कोणीही स्त्री हे करू धजणार नाही. पण धर्माला प्रमाण मानून मंडनमिश्रांची पत्नी भारती हिने शंकराचार्यांचा विजय घोषित केला.
हा धर्मपालनाचा वसा आजची पिढी पाळेल तर......! विद्यार्थी, शिक्षक, कारखानदार, सरकारी अधिकारी, व्यापारी, मंत्री...... सर्वांनी आपले धर्म पाळायचे म्हटले तर धर्मराज्य येईल. भ्रष्टाचाराचा मागमूस राहणार नाही.
पण त्यासाठी धर्म-पुरुषार्थाची उपासना करायला हवी.
मोक्ष पुरुषार्थ: 'मृत्यूनंतर नेमके काय होते' हे चिरकालापासून सर्वांनाच पडलेले कोडे आहे. पौर्वात्य व पाश्चिमात्य मान्यता या बाबतीत पूर्णपणे भिन्न आहेत. भारताबाहेर जन्म झालेल्या संप्रदायांमध्ये शरीर जपून ठेवणे 'कयामत के दिन' सर्वांच्या पापपुण्याचा हिशोब होणे व त्यानुसार स्वर्गात अथवा नरकात स्थान मिळणे अशा मान्यता आहेत. भारतात स्थापन झालेल्या सर्व संप्रदायामध्ये आत्म्याच्या अमरत्वाची व पुनर्जन्माची कल्पना आहे. गीतेमध्ये सांगितले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे बदलून नवे धारण करतो, त्याचप्रमांणे आत्मा जुने शरीर टाकून नवे धारण करतो. पूर्वजन्मांच्या संचिताचे गाठोडे घेऊन नवा प्रवास प्रारंभ होतो. अशी अनंत जन्मांची यात्रा असते. 'पुनरपि जनन पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्'
गीतेमध्ये कृष्णांनी म्हटल्याप्रमाणे बहुनि मे व्यतीतानी जन्मानि तव चार्जून। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप।। जेव्हा मनुष्याला याची जाणीव होते तसेच त्याला मी कोण?’, मी का जन्माला आलो?’, माझे व जगाचे तसेच ईश्वराचे काय नाते आहे?’, माझ्या जीवनाचे सार्थक कशात आहे?’ असे प्रश्न पडू लागतात. मग त्याचे मन त्यापासून सुटण्यासाठी व प्रश्नांचे उत्तर शोधणयासाठी मार्ग शोधू लागते. येथे अध्यात्माचा खरा प्रारंभ होतो. जितका मनुष्य या मार्गावर अग्रेसर होतो तितकी त्याची 'अभीप्सा' वाढत जाते. कर्म-ज्ञान-भक्ती यांच्या माध्यमातून तो अशा ठिकाणी पोचतो की तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे 'देव पाहायला गेलो आणि देवच होऊन ठेलो'  अशी स्थिती होते. 'थेंबाचे समुद्रात मिसळणे' अशी ही घटना असते. तिला 'मोक्ष' म्हणतात. जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटतो. अनादी-अनंताशी एकाकार होतो.
 भारतीय चिंतनाप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याचा अंतिम पडाव हा मोक्ष आहे. पण ही शेवटली पायरी आहे. आपण जेथे आहोत तेथून सुरुवात करायची असते अन्यथा बालमंदिरात शिकणाऱ्या मुलाच्या दप्तरात Ph.Dची  पुस्तके कोंबल्यासारखे होते. त्यातून दंभ व पोकळपणा निर्माण होतो. म्हणून मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे. तत्पूर्वी धर्माचे आचरण करून अर्थ व काम पुरुषार्थाची प्राप्ती करायची असते. तेव्हा हे संतुलन साधले जाते.
त्यामुळे भारतीय जीवनव्यवस्थेत ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम भोगून झाल्यानंतर मग संन्यासाश्रम असतो. तेथे बंधने गळून पडतात. तोडावी लागत नाहीत. दमन करावे लागत नाही. विकृती निर्माण होत नाही. भोगांचे वैय्यर्थ्य ध्यानात आल्यामुळे त्यांची आस मनात राहत नाही. पक्व फळ गळून पडावे तशी स्थिती असते.
असे असले तरी सर्व इतके सोपे नसते. मोहाचे धागे चिवट असतात. राग-द्वेषाची बंधने तीव्र असतात. मान-अपमानाच्या कल्पना सुटता सुटत नाहीत. सापाने गिळलेला बेडूक मरता मरता सुद्धा एखादा किडा पटकन मटकावतो अशी माया असते. त्यातून पार होण्यासाठी साधना करावी लागते. पुरुषार्थ करावा लागतो. सगळी ऊर्जा ओतावी लागते.
असा मनुष्य संसारातून निवृत्त होत नाही. त्याची रोजची कामे चालूच राहतात पण एका निर्लेप भावनेने तो कर्म कर्तव्य म्हणून करीत राहतो. येणाऱ्या सुख दुःखाकडे, मान अपमानाकडे साक्षी भावनेने पाहत राहतो. त्यामुळे ती कर्मे त्याला बंधनकारक होत नाहीत. जुने गुंते सुटत जातात. नवे निर्माण होत नाहीत. 'न मां कर्माणि लिम्पन्ति - न मे कर्मफले स्पृहा'.  त्यामुळे मोक्ष पुरुषार्थ नामाभिधान केलेले आहे. भारतीय चिंतनाच्या परिपूर्णतेचा हा अंतिम आविष्कार आहे.

राष्ट्रीय एकात्मतेकडे गांभीर्याने पहावे - अनिल जवळेकर


रामनवमीच्या पर्वावर प.बंगाल व बिहारराज्यातील काही भागात दंगली झाल्या. हिंदु-मुस्लीम दंगली तशा भारताला नवीन नाहीत. पण अशा दंगली राष्ट्रीय एकात्मतेला सुरुंग लावतात हे मान्य व्हावे. भारत स्वतंत्र झाल्यापासूनच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आहे आणि तो वाढतच गेल्याचे दिसते. अजूनही हा प्रश्न गंभीरपणे मांडला जातो आहे व त्यावर विचार होतो आहे असे म्हणता येत नाही. राष्ट्रीय एकात्मता हा कुठ्ल्याही राष्ट्राचा प्राण असतो आणि राष्ट्रीय एकात्मता नसलेले राष्ट्र केव्हाही समर्थ व शक्तिशाली होत नसते.
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न  भारतीय नागरिकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. संक्षेपाने असे म्हणता येते की देशातील सर्व नागरिकांत जेव्हा एकतेची भावना असते, ते सर्व जेव्हा राष्ट्राशी एकनिष्ठ असतात व त्यांचे जीवन व्यवहार जेव्हा राष्ट्रासाठी समर्पित असतात तेव्हा राष्ट्रीय एकात्मता साधली जाते. अशा राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय भारतीयांना स्वातंत्र्य चळवळीत तसेच भारत-चीन वा भारत-पाकिस्तान युध्याच्या वेळी झाल्याची दिसते. तसा भारत-पाकिस्तान क्रिकेट वा हॉकी सामन्याच्या वेळी अशा मानसिकतेचा परिचय होतो. पण तेवढयावर समाधान मानणे धोक्याचे ठरेल.
आज राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न केवळ हिंदु-मुस्लीमांचा प्रश्न राहिला नाही तर भाषा, प्रांत, पंथ व जातीय अस्मितेच्या कल्पनेने विस्तारित झाला आहे. शिवाय त्याला व्यक्तिगत सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची जोड मिळत आहे. हा प्रश्न आता राजकीय व सामाजिक संघर्षाचे रूप घेत आहे.
 भारतीय राज्यघटनाकारांना राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रश्नाची जाणीव होती पण तात्कालिक सामाजिक  वा राजकीय प्रश्नांमुळे असेल कदाचित, त्यांनी हा प्रश्न राज्यघटनेच्या मार्गदर्शक सूचनेतून सोडवण्याचा प्रयत्न केला. समान नागरिकत्व व समान नागरी कायदा ह्यातला मुख्य भाग म्हणता येईल. समानतेच्या आधारावर एक सामाजिक व आर्थिक न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर ह्या मार्गदर्शक तत्वाचा भर असल्याचे लक्षात घेतले तर एकात्मतेचा प्रश्न समजणे सोपे होते. कारण मुळातच सामाजिक आर्थिक समानता नसेल व मुलभूत गरजाही भागल्या जात नसतील तर राष्ट्रीय एकात्मतेचा पाया ठिसूळ होतो. अर्थात मार्गदर्शक तत्वाच्या अंमलातून राष्ट्रीय एकात्मता येईलच असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही हेही तेवढेच खरे. यासाठी त्या पुढे जावून राजकीय व नागरिकांच्या मानसिकतेला  हात घालावा लागेल.
  1. राष्ट्रीय निष्ठा सर्वात महत्वाची. सामान्य नागरीकापेक्षाही भारतातील राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय भूमिकांतून जास्त संभ्रम निर्माण होतात आणि यावरच पहिला घाव घालावा लागेल.  काही राष्ट्रीय निष्ठा संबंधी भूमिका स्पष्ट करून त्या न मानणाऱ्या नागरिकांना व राजकीय पक्षांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील निवडणुकांत भाग घेण्याला मज्जाव करणे म्हणूनच गरजेचे राहील.
  2. सर्व नागरिक व त्यांच्या सर्व प्रकारच्या संघटनांनी भारतीय राज्यघटना सर्वोपरी मानली पाहिजे व संसदेला सर्व प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार (ज्यात घटना दुरुस्तीचा अधिकार अंतर्भूत आहे) असल्याचे मान्य केले पाहिजे व भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण श्रद्धा  व्य्वक्त केली पाहिजे. मान्य न करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद त्यासाठी आवश्यक राहील.
  3. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांबरोबर त्यांच्या कर्तव्यालाही महत्व देण्याची गरज आहे ज्यात कुठल्याही परदेशी निष्ठा मान्य केल्या जाऊ नयेत व कर्तव्य न पाळण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये.
  4. काही मुद्द्यावर राष्ट्रीय भूमिका सहमतीने स्पष्ट करून त्याविरुद्धची भूमिका राष्ट्रद्रोह मानला पाहिजे. राष्ट्रद्रोहाची कल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्यातरी राजद्रोहाला राष्ट्रद्रोह मानला जातो आहे व ते बरोबर म्हणता येणार नाही.
  5. सरकारचे धोरण सर्व नागरिकाला समान मानण्याचे असले पाहिजे व त्या साठी समानत्व स्पष्ट करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकाला प्रथमतेचा दर्जा मिळाला पाहिजे व राजकीय नेते, सरकारी कर्मचारी व सरकारमधील मंत्री वगैरेचे सर्व विशेषाधिकार रद्द केले पाहिजेत. कायदा व न्याय प्रक्रियेत कुणालाही विशेष सरंक्षण देणे थांबवले पाहिजे.
राष्ट्रीय एकात्मतेचा गांभीर्याने विचार व्हावा असे म्हणावेसे वाटते.