सुलभ एकात्म मानव दर्शन – 09 (क्रमशः) - विनय पत्राळे


चतुर्विध पुरुषार्थ.....
भारतीय विचार हा मूलत: अकर्मण्यता शिकवणारा आहे असे काही जणांना वाटते. तो निष्क्रीयताप्रेरक आहे. आळशी लोकांचे तत्त्वज्ञान आहे अशी त्यावर टीका होते. उदा.
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
अजगर न करे चाकरी पंछी न करे काम, दास मलूक कह गये- सब के दाता राम
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा इत्यादि
इतक्या प्राचीन देशात अशी काही उदाहरणादाखल वाक्ये शोधणे फारसे अवघड नाही. विशेषतः भगवान बुद्धांच्या प्रभाव काळात निवृत्तिपर तत्वज्ञानाने भारतात मूळ पकडले. त्या कालच्या विशिष्ट पार्शवभूमीवर ते चिंतन प्रस्तुत झाले.  यज्ञातील हिंसेचा अतिरेक टाळण्यासाठी बुद्धांनी अहिंसेचा पाठ शिकविला, आग्रह धरला.
समाज सर्वदा दोन अति च्या मध्ये हेलकावे खात असतो. कोणत्याही एका टोकाला गेला तर भारतासारख्या देशात कोणी महापुरुष त्याला दुसऱ्या टोकाकडे प्रेरित करतो. परिणामस्वरूप सुवर्णमध्य साधला जातो. अति हिंसा जशी वर्ज्य तसेच अहिंसेचा अतिरेक सुद्धा वाईटच. अति भोग-विलास करणे वाईट तसे मुद्दाम गरिबीला कवटाळणे सुद्धा वाईटच. महापुरुषाचे सांगणे स्थल, काल, परिस्थिती सापेक्ष समजून घेतले तर गोंधळ होणार नाही. वैचारिक गोंधळ महापुरुषांच्या विचारामुळे नाहीतर त्यांच्या अनुयायांनी लावलेल्या चुकीच्या अर्थामुळे झालेले दिसतो. असो! सतत कर्मप्रेरणा देणारी, पराक्रम व पुरुषार्थाला आवाहन करणारी सूत्रे वेदांमध्ये आहेत.
वीरभोग्या वसुंधरा  (पृथ्वी हि वीरांसाठी आहे.)
नायमात्मा बलहीनेन लभ्यते  (दुर्बल मनुष्याला आत्मा (परमेश्वर) लाभत नाही.)
कृण्वन्तो विश्वमार्यम्  (सर्व विश्वाला सुसंस्कृत करूया.)
तेजोSसि तेजोमयी धेही (हे ईश्वर या सूर्यासारखे मलासुद्धा तेजस्वी कर.)
चतुर्विध पुरुषार्थापैकी एकेकाचे विश्लेषण पाहूया. पुरूषार्थ संकल्पनेत धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थपैलू अंतर्भूत आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरूषैः अर्थ्यते।’ ’मनुष्य मात्र जे मिळविण्याची इच्छा करतो व त्याच्या प्राप्तर्थ्य प्रयत्न करतो ते सर्व.  पुरुषसंज्ञेत मनुष्यमात्राचा म्हणजे स्त्रीसकट मनुष्यमात्राचा अंतर्भाव आहे.
काम पुरुषार्थ : काम शब्द येथे कामना या अर्थाने आला आहे. कृतीचा प्रारंभ कामनेमुळे होतो. इच्छांच्या पूर्तीसाठी मनुष्य सतत झटत असतो. कामना, वासना, एषणा, आकांक्षा या मनुष्यासाठी स्वाभाविक मानल्या गेल्या आहेत. त्याच सृष्टीचे प्रेरकबळ आहेत. परमेश्वराला सुद्धा 'एकोSहं  बहुस्याम' ची कामना झाल्यामुळे या सृष्टीची निर्मिती झाली आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वत:ला 'काम' असे संबोधले आहे, 'धर्माविरुद्ध भूतेषु कामोSस्मि भरतर्षभ (धर्मसंमत असा काम मी आहे.)
भारतीय चिंतनात कामनांच्या पूर्तीला पुरुषार्थ मानले गेले आहे. सृष्टिसंचालनासाठी हे आवश्यकच आहे. इच्छा' हे दु:खाचे मूळ नव्हे तर अमर्याद इच्छा ही मनुष्याच्या दु:खाचे कारण असते. आवश्यकता पूर्ती होण्याआधीच मनुष्य संतोष करू लागला तर तो पलायनवाद ठरेल. दुर्बळांच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही किंवा गरिबीतल्या साधेपणाचे गोडवे गाईले जात नाहीत त्याचप्रमाणे कामनांचा त्याग करण्यापूर्वी कामना-पूर्ती करण्यासाठीचे सामर्थ्य आवश्यक आहे. गडगंज संपत्ती असूनसुद्धा जो साधेपणाने राहतो त्याचीच किंमत असते. क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो'
अर्थ पुरुषार्थ: मराठी भाषेत म्हण आहे की सर्व सोंगे आणता येऊ शकतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' अशी धनाची आवश्यकता प्रतिपादित केली आहेच. पैसा कमावणे ह्यात काहीच चुकीचे नाही. 'लक्ष्मी'ला भारतीय चिंतनात विष्णूची पत्नी या नात्याने पूजाघरात स्थान प्राप्त झालेले आहे. अनीतीच्या मार्गाने, लोकांना फसवून, शोषण करून, अवांछनीय तडजोडी करून पैसे कमविणे हा अधर्म आहे. हे चूक आहे पण धनसंपत्ती कमविणे हा पुरुषार्थ समजला गेला आहे.
देवांची सुद्धा संपत्ती आहे व कुबेर या भांडाराचा- भंडारी मानला गेला आहे.
पैसे कसा निर्माण होतो? शत्रूचा सामना करण्यासाठी जसे साहस हवे असते, बळ हवे असते, त्याचप्रमाणे पैसा अर्जित करण्यासाठी साठी उद्यम, निर्णयाचे साहस, कौशल्य, बुद्धिमत्ता हे सर्वच आवश्यक असते. धनवान मनुष्याने केलेला व्यय हा इतरांसाठी उत्पन्नाचे साधन होतो. त्यामुळे अर्थ पुरुषार्थ करणारा मनुष्य हा अनेक परिवारांना प्रत्यक्ष वा परोक्ष मदत करणारा ठरतो. त्यामुळे अर्थार्जनाला पुरुषार्थ मानले गेले आहे.
अर्थार्जन करणे चुकीचे नाही पण अनावश्यक अर्थसंग्रह करणे चुकीचे आहे. शास्त्रात सांगितले आहे कि शंभर हातांनी कमवा व हजार हातांनी वाटून टाका. अर्थाचा अभाव व प्रभाव हे दोन्ही घातक आहेत. प्रशासन अधिक कमविणाऱ्यांकडून अधिक कर वसूल करून तो पैसा सेवा-सुविधांच्या रूपाने कमी कमावणाऱ्यांकडे वळविते. पण कर देताना देणाऱ्यांच्या मनात अनिच्छा असते. त्यापेक्षा तो पैसा स्वेच्छापूर्वक दानरूपाने सेवेसाठी वापरला गेला तर ते अधिक इच्छनीय वाटते. त्यामुळे भारतीय विचारात अर्थार्जन हा पुरुषार्थ समजला गेला असून दान करणाऱ्याचा पण 'दानशूर' असा गौरव केलेला आढळतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित असे आहे. 'शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित:। वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा।।'                                                          (क्रमशः)

पक्षाधारित लोकशाहीत सुयोग्य बदल गरजेचे -अनिल जवळेकर



सध्या चीन चर्चेत आहे. चीनच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षाला आता सत्ता आयुष्यभर भोगता येऊ शकते. तशी तरतूद करणारी व्यवस्था तेथे नुकतीच निर्माण केली गेली आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या निमित्ताने अनेक पक्षाधारित राज्यपद्धतीपेक्षा एक पक्षीय राज्यपद्धती चांगली असल्याचेही मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे अनेक पक्ष सतत स्पर्धात्मक भूमिका घेत असतात व त्याने अडचणीच निर्माण होतात आणि समान उद्देश्यही साध्य होत नाही. तसे हे दोन्ही मुद्दे चीन संबधित आहेत व त्याचा भारताशी तसा संबंध नाही. भारताने आणीबाणीचा क्लेशकारी अनुभव घेतला असल्याने ह्या दोन्ही मुद्द्यांना भारतात मान्यता मिळेल असे वाटत नाही.
         पण भारतात असा विचार करणारे राजकारणी व राजकीय पक्ष नाहीत असे म्हणता येणार नाही. भारतातील राजकीय पक्ष जसे चालवले जातात त्यावरून त्यांच्या लोकशाही राबवण्याचा पद्धती बद्दल शंका घेता येते व ते वेळ आल्यास एक पक्षाधारित राज्यव्यवस्थेला (लोकशाहीला?) मान्यता देवून एकाधिकार पद्धती आणू शकतात हे विसरता येत नाही. काँग्रेस पक्षाला भारतावर राज्य करण्याचा अधिकार फक्त एकाच पक्षाला, नव्हे एकाच घराण्याला आहे असे वाटते व त्या साठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात हे आणीबाणीच्या काळाने दाखवून दिलेले आहे. भारतीय कमुनिष्ट पक्ष तर स्वत:च्या पक्षाची हुकुमशाही असणे ही गरजच मानतात त्यामुळे इतर कुठल्याही राजकीय अस्तित्वाला त्यांच्या राज्यात मान्यता असणार नाही हे गृहीत धरायला हवे (भारतात अजून त्यांना तशी केंद्रात संधी मिळाली नाही हे लक्षात ठेवले पाहिजे). भारतातील इतर बहुतांशी पक्ष एक तर एका व्यक्तीशी व एका घराण्याशी बांधीलकी मानणारे आहेत त्यामुळे तेही आपल्या स्वत:ची वा स्वतःच्या घराण्याची एक केंद्रित सत्ता स्थापन करण्यात प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी ते कुठलाही समझोता करायला तयार असतात. राष्ट्रप्रेरणेने संघटित असलेला एकमेव पक्ष म्हणून भाजपचे नाव घेता येईल पण तो एकाकी असल्याने त्याचे राजकीय अस्तित्व नेहमीच धोक्यात असते कारण इतर सर्व मिळून त्याला संपवण्याचा प्रयत्न करतच असतात.
          भारताने लोकशाही मान्य केली असली तरी ही लोकशाही पूर्णतः निवडणुकांवर अवलंबून आहे. आणि निवडणुक सध्यातरी गठ्याने मत देवू शकणाऱ्या मतदारांवर केंद्रित झालेली दिसते. सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकणे महत्वाचे मानतात त्या साठी मतदारांना यांना भुलविण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न बऱ्याचदा राष्ट्र हिताचा असत नाही. आतापर्यंत तरी हे सर्व पक्ष भारतीय राज्यघटना व भारतीय लोकशाही पद्धत मानतात व निवडणूक पद्धतीने अशा सत्तेची अपेक्षा ठेवतात. सत्ता मिळवताना आणि टिकवताना वा राबवताना मात्र हे पक्ष सर्व प्रकारचे समझोते करायला तयार असतात व त्यासाठी राष्ट्रहिताचाही बळी द्यायला तयार असतात. म्हणून या लोकशाहीची ही पक्षीय पद्धती कितपत योग्य आहे व त्यात काय चांगले बदल करता येतील याचा विचार गंभीरपणे करणे गरजेचे आहे असे म्हणावेसे वाटते.
         त्या साठी पहिली गरज आहे ती म्हणजे राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्या पक्षालाच मान्यता देण्याची व निवडणुकात प्रेवेश परवानगीची. असे बरेच पक्ष आहेत जे राष्ट्रहिताच्या विरोधी मत मांडत असतात. हे खरे आहे कि राष्ट्रहित कशात आहे हे मूलतः ठरवणे अवघड आहे. परंतु काही निश्चित भूमिका घेतल्या गेल्या पाहिजेत हे सांगता येते. उदाहरणार्थ काश्मीर प्रश्न वा पाकिस्तान संबंध. तसेच बाहेरच्या देशाशी असलेले संबंध. स्वदेशी धोरण, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संस्कृती बद्दल आदर, भारतीय राज्यघटनेशी बांधिलकी, राज्य कर्जात डुबत असताना केवळ मतदारांना लालूच दाखविण्यासाटी फुकट बाबींची आश्वासने देणे वगैरे.
         दुसरी गरज आहे ती ही कि राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची संख्या कमी करण्याची. जेणे करून खऱ्या अर्थाने मतदारांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल. आज बरेचशे पक्ष केवळ मते खाण्यासाठी निवडणुका लढवतात हे विसरता येत नाही. मजहब, पंथ वा जाती वाचक तसेच विशिष्ट व्यक्ती वा घराण्याशीच प्रामुख्याने संबधित असलेल्या पक्षाची मान्यता पूर्णपणे रद्द करणे तेव्हढेच गरजेचे म्हणावे लागेल. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाची नोंदणीचे नियम आणखी कडक करून ब-यापैकी जनाधार असलेल्या पक्षांनाच फक्त लोकसभा व विधानसभेला निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी दिल्याने बरेचशे प्रश्न कमी होतील असे वाटते. 
         तिसरी गोष्ट म्हणजे ग्राम स्तरावर व शहरात लहान प्रभाग स्तरावर (5,000 जनसंखेपेक्षा कमी) निवडणुका न होता सामंजस्याने एकमताने प्रतिनिधीची निवड व्हावी. यातील सामाजिक एकात्मतेला बळ मिळेल.
         भारतीय लोकशाहीतील निवडणूक ही वरचेवर राष्ट्रहिताकडून पक्षहिताकडे घसरत चालली आहे त्यामुळे त्यात भाग घेणारे राजकीय पक्ष नेतृत्वात व राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने प्रगल्भ होणे व काही सुधारणा करणे गरजेचे आहे एवढेच ह्या ठिकाणी सांगावेसे वाटते.

'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' - प्राचार्य श्याम अत्रे

एकात्म प्रबोध मंडळ, मुंबई या संस्थेच्या वतीने "समाज जीवन: सुयोग्य दिशा व परिवर्तन" या विषयावर दि. ९,१०,११ फेब्रुवारी २०१८ रोजी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेची जी प्रक्रिया झाली त्यातील एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला या टिपणात लक्ष वेधायचे आहे.

समाजजीवन, समाजधारणा , समाजरचना व समाजसुधारणा या सर्व प्रक्रियेचा आधार काय असावा, या संदर्भात अभ्यासकांनी चर्चेच्या ओघात जी मांडणी केली त्यात दोन मतप्रवाह आढळून आले. अभ्यासकांचे साधारण म्हणणे असे होते की या प्रक्रियेचा आधार 'धर्म' असावा, तर काही जणांना धर्माच्या पार्श्वभूमीवर यापुढे प्रामुख्याने 'भारतीय राज्यघटने’च्या आधारे ही समाज परिवर्तन प्रक्रिया घडून यावी, असे वाटत होते

'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' यात अंतर्विरोध आहे वा विसंगती आहे आहे असे का वाटले असावे? धर्म म्हणजे ‘रिलिजन’ नवे हे पुन्हापुन्हा: अधोरेखित करूनही ते दोन्ही शब्द समानार्थी वापरले जातात त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळ झालेले दिसतात. Dharma is a way of life हा धर्म शब्दाचा अर्थ आणि आशय (meaning and import) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारून धर्म आणि रिलिजन यातील अंतर स्पष्ट केले आहे. तरी देखील या दोन्ही संकल्पनात जी गल्लत केली जाते, ते प्रथम थांबले पाहिजे. सर्व गोंधळाचे मूळ या चुकीच्या अवधारणेत आहे.

'धारणात् धर्म इत्याहुः' 'धारयति स: धर्म:' यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धि: स धर्म:' या 'धर्म' संकल्पनेच्या सर्वमान्य व्याख्या आहेत. या व्याख्यांशी सहमती दर्शवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "हिंदू धर्माचा सिद्धांत इतर धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्त्वाशी पोषक आहे.... सारी माणसे ईश्वराचीच रूपे आहेत, असे मोठ्या निर्भीडपणे हिंदूधर्म सांगत आहे. जेथे सारीच रूपे ईश्वराची रूपे आहेत तेथे कोणी उच्चं कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही, हे त्या धर्माचे एक महान ओजस्वी तत्व आहे..... समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा मोठा आधार सापडणे कठीण दिसते.” असे असेल तर हिंदू समाजात टोकाची भूमिका का दिसते? जन्माधिष्ठित उच्चनीचता का दिसते? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "हिंदुधर्माची दोन अंगे आहेत. एक तत्वज्ञान आणि एक आचार. त्यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान असले तरी आचाराच्या दृष्टीने असमान- नव्हे- अपवित्र आहेत. म्हणून त्यांच्याशी व्यवहार करणे हा अधर्म होय!" याचे अधिक स्पष्टीकरण करताना बाबासाहेब म्हणतात, "धर्माची वरीलप्रमाणे दोन अंगे आहेत हे जरी मान्य केले तरी कोणत्याही धर्माचा आचारात्मक भाग त्या धर्माच्या तत्त्वावरच अधिष्ठित असला पाहिजे, हे विसरता कामा नये.. समाजाचा आचारात्मक धर्म जर त्या धर्माच्या विचारात्मक धर्माच्या नांगरास जखडलेला नसेल तर तो समाज होकायंत्राशिवाय समुद्रात लोटून दिलेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे कोठे वाहत जाईल, व कोणत्या खडकावर आदळेल याचा नेम नाही," (दोन्ही उद्धरणे ‘बहिष्कृत भारत’ अग्रलेख २२ एप्रिल १९२७) हिंदू समाजाची अशी अवनती का झाली हे समजल्याशिवाय समाजधारणेचा आधार 'धर्म' होण्यास का विरोध होतो, हे समजणार नाही.

हिंदुधर्माचे तत्वज्ञान वेद व विशेषतः उपनिषदांवर आधारित आहे. यांना 'श्रुती' असे म्हणतात. तर हिंदुधर्माचा आचारात्मक भाग ज्यात येतो त्याला 'स्मृती' म्हणतात. धर्माचा तत्त्वविचार हा सनातन व शाश्वत असतो तर आचारधर्म हा काळ व परिस्थितीनुसार बदलणारा असतो. मात्र त्याची नाळ धर्माच्या तत्त्वांशी जोडलेली असणे आवश्यक असते. जेव्हा हे भान सुटते तेव्हा समाजाच्या अध:पतनाला सुरुवात होते. अनेकानेक ऋषीमुनींनी आपापल्या काळात त्या त्या काळाला व परिस्थितीला अनुकूल अशा स्मृतींची रचना केलेली दिसते. त्यामुळे स्मृती या अनेक आहेत.

कारणे काहीही असोत, पण दुर्दैवाने गेल्या हजार वर्षात युगानुकूल अशा नव्या स्मृतींची रचना झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. समाजधारणा तर पोकळीत होऊ शकत नाही. त्यामुळे तत्कालीन शेवटच्या स्मृतींचा पगडा आजही समाजमानसावर पडलेला दिसतो. त्यामुळे समाजाचा जो काही आचारात्मक धर्म आजही अस्तित्वात आहे त्याची नाळ धर्माच्या तात्त्विक अंगापासून तुटलेली दिसते.

समाज रचनेत आज जे दोष व विकृती उत्पन्न झालेल्या दिसतात त्याचे मूळ आज कालबाह्य झालेल्या प्राचीन स्मृतींत दिसते. स्मृतींचा आधार 'धर्म' आहे, त्यांचा तो विचारात्मक भाग आहे; अशी लोकभावना आहे. त्यामुळे आजच्या सर्व सामाजिक परिस्थितीला धर्मच जबाबदार आहे, असे कोणा लोकांना वाटले तर ती त्यांची चूक म्हणता येणार नाही. मूलतः 'गुणकर्मविभागशः' असलेली वर्णव्यवस्था पुढे जन्माधिष्ठित जातीउपजातींत रूपांतरित झाली, ही विकृती आहे. जातीव्यवस्थेत शिरलेली जन्माधिष्ठित उच्चनीचतेची भावना हि विकृती आहे. वंशपरंपरागत व जन्माधिष्ठित अस्पृश्यता, हि सामाजिक विकृती आहे. आज समाजाच्या हाडीमांसी रुजलेल्या या विकृत संकल्पनांना स्मृतींचा आधार आहे, आणि स्मृती हा आचार धर्म , धर्मावर आधारित आहे, म्हणून जर कोणी ‘धर्मा’बद्दल शंका घेतली तर, ती आपण समजू शकतो. धर्म तत्त्वे व आचारधर्म यातील अंतर सर्वांना स्पष्ट होत नाही.

या पार्श्वभूमीवर निकोप समाजधारणेसाठी धर्माच्या तात्त्विक अंगाची आवश्यकता राजा राममोहन रॉय यांच्यापासून डॉ. आंबेडकरांपर्यंत जवळ जवळ सर्वच प्रबोधनकारांनी व समाजसुधारकांनी मान्य केली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. पण त्याचबरोबर प्रचलित आचारधर्म त्यातील विकृतींमुळे त्यांनी जवळपास नाकारला. तेव्हा नवा कालसुसंगत आचारधर्म विकसित करत राहणे हा उपाय आहे.

निकोप समाजधारणेसाठी श्रेयस्कर आहे धर्म हाच समाजधारणेचा आधार आहे. धर्म म्हणजे सर्व मानवांच्या हिताची, सुयोग्य व उन्नत जीवनव्यवहाराची मार्गदर्शक तत्त्वे. धर्मजीवन म्हणजे आपल्या जीवनपध्दतीतील उदात्त मूल्यांनुसार वैयक्तिक व समाजजीवनाची आखणी करणे, ती मूल्ये जीवनात उतरवणे. धर्म म्हणजे उपासना पद्धती वा मजहब religion नव्हे.

धर्मतत्त्वातून समाजाचे नीतिशास्त्र तयार होते व त्याचे एक व्यावहारिक स्वरूप म्हणजे राज्यघटना. त्या दृष्टीने राज्यघटना ही आज समाजजीवनाला लागू असणारी स्मृती (आचारसंहिता) आहे. समाजधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या नव्या आचारधर्माची युगानुकूल मांडणीचे एक स्वरूप म्हणजेच भारतीय राज्यघटना. त्या राज्यघटनेचा ज्यांना समाजधारणेसाठी आधार वाटतो, ती भूमिकेही योग्यच आहे. ती नवी आचारसंहिता म्हणजेच आचारधर्माचे युगानुकूल अशी मांडणी आहे, हे लक्षात घेतले तर 'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' यात अंतर्विरोध वा विसंगती नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे एका बाजूला धर्माचे शुद्ध तात्विक स्वरूप, त्यातील शाश्वत व सनातन जीवनमूल्ये यांची पुनः प्रस्थापना करणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय राज्यघटनेच्या आधारे समाजाची धारणा व रचना करताना घेणे, ही काळाची गरज आहे, हेच या चर्चेत अधोरेखित झाले, हे महत्वाचे आहे.