सुलभ एकात्म मानव दर्शन – 09 (क्रमशः) - विनय पत्राळे


चतुर्विध पुरुषार्थ.....
भारतीय विचार हा मूलत: अकर्मण्यता शिकवणारा आहे असे काही जणांना वाटते. तो निष्क्रीयताप्रेरक आहे. आळशी लोकांचे तत्त्वज्ञान आहे अशी त्यावर टीका होते. उदा.
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
अजगर न करे चाकरी पंछी न करे काम, दास मलूक कह गये- सब के दाता राम
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा इत्यादि
इतक्या प्राचीन देशात अशी काही उदाहरणादाखल वाक्ये शोधणे फारसे अवघड नाही. विशेषतः भगवान बुद्धांच्या प्रभाव काळात निवृत्तिपर तत्वज्ञानाने भारतात मूळ पकडले. त्या कालच्या विशिष्ट पार्शवभूमीवर ते चिंतन प्रस्तुत झाले.  यज्ञातील हिंसेचा अतिरेक टाळण्यासाठी बुद्धांनी अहिंसेचा पाठ शिकविला, आग्रह धरला.
समाज सर्वदा दोन अति च्या मध्ये हेलकावे खात असतो. कोणत्याही एका टोकाला गेला तर भारतासारख्या देशात कोणी महापुरुष त्याला दुसऱ्या टोकाकडे प्रेरित करतो. परिणामस्वरूप सुवर्णमध्य साधला जातो. अति हिंसा जशी वर्ज्य तसेच अहिंसेचा अतिरेक सुद्धा वाईटच. अति भोग-विलास करणे वाईट तसे मुद्दाम गरिबीला कवटाळणे सुद्धा वाईटच. महापुरुषाचे सांगणे स्थल, काल, परिस्थिती सापेक्ष समजून घेतले तर गोंधळ होणार नाही. वैचारिक गोंधळ महापुरुषांच्या विचारामुळे नाहीतर त्यांच्या अनुयायांनी लावलेल्या चुकीच्या अर्थामुळे झालेले दिसतो. असो! सतत कर्मप्रेरणा देणारी, पराक्रम व पुरुषार्थाला आवाहन करणारी सूत्रे वेदांमध्ये आहेत.
वीरभोग्या वसुंधरा  (पृथ्वी हि वीरांसाठी आहे.)
नायमात्मा बलहीनेन लभ्यते  (दुर्बल मनुष्याला आत्मा (परमेश्वर) लाभत नाही.)
कृण्वन्तो विश्वमार्यम्  (सर्व विश्वाला सुसंस्कृत करूया.)
तेजोSसि तेजोमयी धेही (हे ईश्वर या सूर्यासारखे मलासुद्धा तेजस्वी कर.)
चतुर्विध पुरुषार्थापैकी एकेकाचे विश्लेषण पाहूया. पुरूषार्थ संकल्पनेत धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थपैलू अंतर्भूत आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरूषैः अर्थ्यते।’ ’मनुष्य मात्र जे मिळविण्याची इच्छा करतो व त्याच्या प्राप्तर्थ्य प्रयत्न करतो ते सर्व.  पुरुषसंज्ञेत मनुष्यमात्राचा म्हणजे स्त्रीसकट मनुष्यमात्राचा अंतर्भाव आहे.
काम पुरुषार्थ : काम शब्द येथे कामना या अर्थाने आला आहे. कृतीचा प्रारंभ कामनेमुळे होतो. इच्छांच्या पूर्तीसाठी मनुष्य सतत झटत असतो. कामना, वासना, एषणा, आकांक्षा या मनुष्यासाठी स्वाभाविक मानल्या गेल्या आहेत. त्याच सृष्टीचे प्रेरकबळ आहेत. परमेश्वराला सुद्धा 'एकोSहं  बहुस्याम' ची कामना झाल्यामुळे या सृष्टीची निर्मिती झाली आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वत:ला 'काम' असे संबोधले आहे, 'धर्माविरुद्ध भूतेषु कामोSस्मि भरतर्षभ (धर्मसंमत असा काम मी आहे.)
भारतीय चिंतनात कामनांच्या पूर्तीला पुरुषार्थ मानले गेले आहे. सृष्टिसंचालनासाठी हे आवश्यकच आहे. इच्छा' हे दु:खाचे मूळ नव्हे तर अमर्याद इच्छा ही मनुष्याच्या दु:खाचे कारण असते. आवश्यकता पूर्ती होण्याआधीच मनुष्य संतोष करू लागला तर तो पलायनवाद ठरेल. दुर्बळांच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही किंवा गरिबीतल्या साधेपणाचे गोडवे गाईले जात नाहीत त्याचप्रमाणे कामनांचा त्याग करण्यापूर्वी कामना-पूर्ती करण्यासाठीचे सामर्थ्य आवश्यक आहे. गडगंज संपत्ती असूनसुद्धा जो साधेपणाने राहतो त्याचीच किंमत असते. क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो'
अर्थ पुरुषार्थ: मराठी भाषेत म्हण आहे की सर्व सोंगे आणता येऊ शकतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' अशी धनाची आवश्यकता प्रतिपादित केली आहेच. पैसा कमावणे ह्यात काहीच चुकीचे नाही. 'लक्ष्मी'ला भारतीय चिंतनात विष्णूची पत्नी या नात्याने पूजाघरात स्थान प्राप्त झालेले आहे. अनीतीच्या मार्गाने, लोकांना फसवून, शोषण करून, अवांछनीय तडजोडी करून पैसे कमविणे हा अधर्म आहे. हे चूक आहे पण धनसंपत्ती कमविणे हा पुरुषार्थ समजला गेला आहे.
देवांची सुद्धा संपत्ती आहे व कुबेर या भांडाराचा- भंडारी मानला गेला आहे.
पैसे कसा निर्माण होतो? शत्रूचा सामना करण्यासाठी जसे साहस हवे असते, बळ हवे असते, त्याचप्रमाणे पैसा अर्जित करण्यासाठी साठी उद्यम, निर्णयाचे साहस, कौशल्य, बुद्धिमत्ता हे सर्वच आवश्यक असते. धनवान मनुष्याने केलेला व्यय हा इतरांसाठी उत्पन्नाचे साधन होतो. त्यामुळे अर्थ पुरुषार्थ करणारा मनुष्य हा अनेक परिवारांना प्रत्यक्ष वा परोक्ष मदत करणारा ठरतो. त्यामुळे अर्थार्जनाला पुरुषार्थ मानले गेले आहे.
अर्थार्जन करणे चुकीचे नाही पण अनावश्यक अर्थसंग्रह करणे चुकीचे आहे. शास्त्रात सांगितले आहे कि शंभर हातांनी कमवा व हजार हातांनी वाटून टाका. अर्थाचा अभाव व प्रभाव हे दोन्ही घातक आहेत. प्रशासन अधिक कमविणाऱ्यांकडून अधिक कर वसूल करून तो पैसा सेवा-सुविधांच्या रूपाने कमी कमावणाऱ्यांकडे वळविते. पण कर देताना देणाऱ्यांच्या मनात अनिच्छा असते. त्यापेक्षा तो पैसा स्वेच्छापूर्वक दानरूपाने सेवेसाठी वापरला गेला तर ते अधिक इच्छनीय वाटते. त्यामुळे भारतीय विचारात अर्थार्जन हा पुरुषार्थ समजला गेला असून दान करणाऱ्याचा पण 'दानशूर' असा गौरव केलेला आढळतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित असे आहे. 'शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित:। वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा।।'                                                          (क्रमशः)

1 comment:

  1. अर्थार्जनाला विरोध कधीच नव्हता. संपूर्ण तत्त्वज्ञान विचार सरणी मांडणाऱ्या उपनिषदांनीसुध्दा अर्थार्जनाला विरोध केला नव्हता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तैत्तरीय उपनिषदांतील शिक्षावल्लीमधे गुरुकुलातील शिक्षण संपवून घरी परत निघालेल्या, म्हणजेच गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्या आपल्या शिष्याला, भूत्यैः मा प्रमिदितव्यः म्हणजे संपत्ती मिळवण्यापासून चुकू नकोस असा उपदेश करतात. कौटिलीय अर्थशास्त्रात सगळ्या कर्मांच मूळ अर्थ आहे आहे, धर्मस्य मूलम् अर्थः। असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यासाठी उत्तम व्यापारी धोरणे आखली आहेत. व्यापारी मार्गांची चर्चा आहे त्यामुळे भारतीयांचा अर्थार्जनाला विरोध होता हे अत्यंत चुकीचे आहे.

    ReplyDelete