'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' - प्राचार्य श्याम अत्रे

एकात्म प्रबोध मंडळ, मुंबई या संस्थेच्या वतीने "समाज जीवन: सुयोग्य दिशा व परिवर्तन" या विषयावर दि. ९,१०,११ फेब्रुवारी २०१८ रोजी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेची जी प्रक्रिया झाली त्यातील एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला या टिपणात लक्ष वेधायचे आहे.

समाजजीवन, समाजधारणा , समाजरचना व समाजसुधारणा या सर्व प्रक्रियेचा आधार काय असावा, या संदर्भात अभ्यासकांनी चर्चेच्या ओघात जी मांडणी केली त्यात दोन मतप्रवाह आढळून आले. अभ्यासकांचे साधारण म्हणणे असे होते की या प्रक्रियेचा आधार 'धर्म' असावा, तर काही जणांना धर्माच्या पार्श्वभूमीवर यापुढे प्रामुख्याने 'भारतीय राज्यघटने’च्या आधारे ही समाज परिवर्तन प्रक्रिया घडून यावी, असे वाटत होते

'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' यात अंतर्विरोध आहे वा विसंगती आहे आहे असे का वाटले असावे? धर्म म्हणजे ‘रिलिजन’ नवे हे पुन्हापुन्हा: अधोरेखित करूनही ते दोन्ही शब्द समानार्थी वापरले जातात त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळ झालेले दिसतात. Dharma is a way of life हा धर्म शब्दाचा अर्थ आणि आशय (meaning and import) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारून धर्म आणि रिलिजन यातील अंतर स्पष्ट केले आहे. तरी देखील या दोन्ही संकल्पनात जी गल्लत केली जाते, ते प्रथम थांबले पाहिजे. सर्व गोंधळाचे मूळ या चुकीच्या अवधारणेत आहे.

'धारणात् धर्म इत्याहुः' 'धारयति स: धर्म:' यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धि: स धर्म:' या 'धर्म' संकल्पनेच्या सर्वमान्य व्याख्या आहेत. या व्याख्यांशी सहमती दर्शवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "हिंदू धर्माचा सिद्धांत इतर धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्त्वाशी पोषक आहे.... सारी माणसे ईश्वराचीच रूपे आहेत, असे मोठ्या निर्भीडपणे हिंदूधर्म सांगत आहे. जेथे सारीच रूपे ईश्वराची रूपे आहेत तेथे कोणी उच्चं कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही, हे त्या धर्माचे एक महान ओजस्वी तत्व आहे..... समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा मोठा आधार सापडणे कठीण दिसते.” असे असेल तर हिंदू समाजात टोकाची भूमिका का दिसते? जन्माधिष्ठित उच्चनीचता का दिसते? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "हिंदुधर्माची दोन अंगे आहेत. एक तत्वज्ञान आणि एक आचार. त्यापैकी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान असले तरी आचाराच्या दृष्टीने असमान- नव्हे- अपवित्र आहेत. म्हणून त्यांच्याशी व्यवहार करणे हा अधर्म होय!" याचे अधिक स्पष्टीकरण करताना बाबासाहेब म्हणतात, "धर्माची वरीलप्रमाणे दोन अंगे आहेत हे जरी मान्य केले तरी कोणत्याही धर्माचा आचारात्मक भाग त्या धर्माच्या तत्त्वावरच अधिष्ठित असला पाहिजे, हे विसरता कामा नये.. समाजाचा आचारात्मक धर्म जर त्या धर्माच्या विचारात्मक धर्माच्या नांगरास जखडलेला नसेल तर तो समाज होकायंत्राशिवाय समुद्रात लोटून दिलेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे कोठे वाहत जाईल, व कोणत्या खडकावर आदळेल याचा नेम नाही," (दोन्ही उद्धरणे ‘बहिष्कृत भारत’ अग्रलेख २२ एप्रिल १९२७) हिंदू समाजाची अशी अवनती का झाली हे समजल्याशिवाय समाजधारणेचा आधार 'धर्म' होण्यास का विरोध होतो, हे समजणार नाही.

हिंदुधर्माचे तत्वज्ञान वेद व विशेषतः उपनिषदांवर आधारित आहे. यांना 'श्रुती' असे म्हणतात. तर हिंदुधर्माचा आचारात्मक भाग ज्यात येतो त्याला 'स्मृती' म्हणतात. धर्माचा तत्त्वविचार हा सनातन व शाश्वत असतो तर आचारधर्म हा काळ व परिस्थितीनुसार बदलणारा असतो. मात्र त्याची नाळ धर्माच्या तत्त्वांशी जोडलेली असणे आवश्यक असते. जेव्हा हे भान सुटते तेव्हा समाजाच्या अध:पतनाला सुरुवात होते. अनेकानेक ऋषीमुनींनी आपापल्या काळात त्या त्या काळाला व परिस्थितीला अनुकूल अशा स्मृतींची रचना केलेली दिसते. त्यामुळे स्मृती या अनेक आहेत.

कारणे काहीही असोत, पण दुर्दैवाने गेल्या हजार वर्षात युगानुकूल अशा नव्या स्मृतींची रचना झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. समाजधारणा तर पोकळीत होऊ शकत नाही. त्यामुळे तत्कालीन शेवटच्या स्मृतींचा पगडा आजही समाजमानसावर पडलेला दिसतो. त्यामुळे समाजाचा जो काही आचारात्मक धर्म आजही अस्तित्वात आहे त्याची नाळ धर्माच्या तात्त्विक अंगापासून तुटलेली दिसते.

समाज रचनेत आज जे दोष व विकृती उत्पन्न झालेल्या दिसतात त्याचे मूळ आज कालबाह्य झालेल्या प्राचीन स्मृतींत दिसते. स्मृतींचा आधार 'धर्म' आहे, त्यांचा तो विचारात्मक भाग आहे; अशी लोकभावना आहे. त्यामुळे आजच्या सर्व सामाजिक परिस्थितीला धर्मच जबाबदार आहे, असे कोणा लोकांना वाटले तर ती त्यांची चूक म्हणता येणार नाही. मूलतः 'गुणकर्मविभागशः' असलेली वर्णव्यवस्था पुढे जन्माधिष्ठित जातीउपजातींत रूपांतरित झाली, ही विकृती आहे. जातीव्यवस्थेत शिरलेली जन्माधिष्ठित उच्चनीचतेची भावना हि विकृती आहे. वंशपरंपरागत व जन्माधिष्ठित अस्पृश्यता, हि सामाजिक विकृती आहे. आज समाजाच्या हाडीमांसी रुजलेल्या या विकृत संकल्पनांना स्मृतींचा आधार आहे, आणि स्मृती हा आचार धर्म , धर्मावर आधारित आहे, म्हणून जर कोणी ‘धर्मा’बद्दल शंका घेतली तर, ती आपण समजू शकतो. धर्म तत्त्वे व आचारधर्म यातील अंतर सर्वांना स्पष्ट होत नाही.

या पार्श्वभूमीवर निकोप समाजधारणेसाठी धर्माच्या तात्त्विक अंगाची आवश्यकता राजा राममोहन रॉय यांच्यापासून डॉ. आंबेडकरांपर्यंत जवळ जवळ सर्वच प्रबोधनकारांनी व समाजसुधारकांनी मान्य केली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. पण त्याचबरोबर प्रचलित आचारधर्म त्यातील विकृतींमुळे त्यांनी जवळपास नाकारला. तेव्हा नवा कालसुसंगत आचारधर्म विकसित करत राहणे हा उपाय आहे.

निकोप समाजधारणेसाठी श्रेयस्कर आहे धर्म हाच समाजधारणेचा आधार आहे. धर्म म्हणजे सर्व मानवांच्या हिताची, सुयोग्य व उन्नत जीवनव्यवहाराची मार्गदर्शक तत्त्वे. धर्मजीवन म्हणजे आपल्या जीवनपध्दतीतील उदात्त मूल्यांनुसार वैयक्तिक व समाजजीवनाची आखणी करणे, ती मूल्ये जीवनात उतरवणे. धर्म म्हणजे उपासना पद्धती वा मजहब religion नव्हे.

धर्मतत्त्वातून समाजाचे नीतिशास्त्र तयार होते व त्याचे एक व्यावहारिक स्वरूप म्हणजे राज्यघटना. त्या दृष्टीने राज्यघटना ही आज समाजजीवनाला लागू असणारी स्मृती (आचारसंहिता) आहे. समाजधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या नव्या आचारधर्माची युगानुकूल मांडणीचे एक स्वरूप म्हणजेच भारतीय राज्यघटना. त्या राज्यघटनेचा ज्यांना समाजधारणेसाठी आधार वाटतो, ती भूमिकेही योग्यच आहे. ती नवी आचारसंहिता म्हणजेच आचारधर्माचे युगानुकूल अशी मांडणी आहे, हे लक्षात घेतले तर 'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' यात अंतर्विरोध वा विसंगती नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे एका बाजूला धर्माचे शुद्ध तात्विक स्वरूप, त्यातील शाश्वत व सनातन जीवनमूल्ये यांची पुनः प्रस्थापना करणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय राज्यघटनेच्या आधारे समाजाची धारणा व रचना करताना घेणे, ही काळाची गरज आहे, हेच या चर्चेत अधोरेखित झाले, हे महत्वाचे आहे.

8 comments:

  1. Fully agreed,
    Wrong interpretation, wilful misleading interpretation and information has caused lot of damage to our society and hence nation in particular.
    It is the need of the time that this explaination must spread across the varied societal blocks and common people should be explained about these basic and important aspects, jan Jagruti may be the answer.
    All political parties, social groups and caste based groups may not help as there is limitation in their response due to very nature of their structure , expectations and aspirations.
    Like minded people should come forward and try to take this to common man in this country, I would be one interested in doing this.
    Apologies for lengthy comment.
    Thanks n Regards
    Ramesh Joshi

    ReplyDelete
  2. भारतीय राज्यघटना ही फक्त भारतीय संघराज्यातील जनतेस लागू आहे, समग्र हिंदू समाजास नाही. ती समाजधारणेचा आधार कशी असू शकेल?

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही हाच प्रश्न आहे. जे हिंदू भारतीय नाहीत त्यांना भारतीय राज्यघटनाएवढाच लागू होणार नाही. पण माझ्यामते इथे समाज म्हणजे भारतीय समाज एवढंच पकडायला हवं.

      Delete
  3. वरील पोस्टमधील वाक्य:- 'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' यात अंतर्विरोध आहे वा विसंगती आहे आहे असे का वाटले असावे?
    ‘धर्म’ ह्या संकल्पनेचा अर्थ ‘रिलीजन’ असा घेतल्याने ‘रिलीजन’ आणि ‘राज्यघटना’ ह्या एकमेकांशी विसंगत दिसतात आणि त्यामुळे ‘धर्म’ आणि ‘राज्यघटना’ ह्यांनाही एकमेकांशी विसंगत मानले जाते असे विधान आहे. ह्या विधानात काही विसंगती नाही.
    पण ‘धर्म’ ह्या संकल्पनेचा अर्थ ‘रिलीजन’ असा न घेता ‘समाजाच्या धारणेसाठी आवश्यक मूल्यव्यवस्था’ असा घेतला तरीही विसंगती पूर्ण मिटत नाही. ‘राज्यघटना’ , जी कालानुरूप स्मृती आहे असे ब्लॉगमध्ये मांडले आहे, ती ‘धर्माच्या श्रुतीतून आलेली असेल तर ‘राज्यघटना’ आणि ‘श्रुतीद्वारे आचरणात येणारा धर्म’ ह्यांत विसंगती राहणार नाही.
    म्हणजे (१) एक तर आत्ता अस्तित्वात असलेली ‘राज्यघटना’ ही ‘धर्माच्या’ मूल्यव्यवस्थेतून उदयाला आलेली आहे असे लेखकाला म्हणायचे आहे किंवा (२) जेव्हा ‘भारतीय राज्यघटना’ ही बदलून तिला धर्माच्या मूल्यव्यवस्थेशी सुसंगत केले जाईल तेव्हा विसंगती दूर होईल असे म्हणायचे असले पाहिजे.
    ह्यातले (१) हे विधान फारच धाडसी आहे. कारण एकात्म मानवदर्शन आणि ज्याला ‘हिंदुत्ववाद’ असे म्हटले जाते अशा राजकीय विचारप्रणालीच्या मांडणीत ‘भारतीय राज्यघटना’ ही पश्चिमेचे अनुकरण आहे, त्यांत केवळ मूलभूत हक्क आहेत-मूलभूत कर्तव्ये नाहीत, व्यक्तिवाद आहे असे आणि अन्य अनेक मूलभूत आक्षेप येतात. त्यामुळे आत्ता अस्तित्वात असलेली राज्यघटना ही ‘धर्माची’ स्मृती आहे असे जर कोणी म्हणत असेल तर त्त्याचा अर्थ अशा व्यक्तीची ‘धर्माची’ संकल्पना ही ‘लिबरल आणि व्यक्तीकेंद्रित’ स्वरुपाची (थरूर ह्यांनी त्यांच्या Why I am a Hindu पुस्तकात केलेल्या मांडणीसारखी) आहे असा काढावा लागेल.
    त्यामुळे (२) हा अर्थ अधिक संभाव्य वाटतो. त्यात काही विसंगती नाही. पण त्यासाठी आवश्यक असलेली ‘भारतीय राज्यघटना’ अद्याप अस्तित्वात आलेली नाही.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Rajendra Koppikar10 March 2018 at 21:41

    'धर्म' आणि 'भारतीय राज्यघटना' - प्राचार्य श्री. श्याम अत्रे

    माझे मत:
    "धर्म" आणि "राज्यघटना" या संपूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत.

    "धर्म" या संकल्पनेची स्पष्टता "मानवाची जीवन जगण्याची पद्धत" अशी आहे. भारतीय धर्माला वैश्विक उन्नतीच्या, प्रगतीच्या विचाराचे अधिष्ठान आणि आस आहे. हे विश्वचि माझे घर । ऎसि मति जयाचि स्थिर । किंबहुना, चराचर । आपण जाहला ॥ (संदर्भ:ज्ञानेश्वरी-१२-२१३) हा भारतीय धर्माचा दृष्टिकोन आहे.

    "राज्यघटना" ही राजकीय दृष्टिकोनातून देशाचा कारभार विशिष्ट पद्धतीने चालविण्यासाठी तयार केलेली नियमावली किंवा सूची आहे. त्यामुळे ती केवळ भारत देशाचा कारभार चालविण्यापुरती मर्यादित आहे.
    याशिवाय, प्रचलित "राज्यघटना" एका विशिष्ट भारतविरोधी विचारसरणीच्या समूहाने स्वतंत्र विचारहीन अशी बनविलेली आहे.

    यामुळे "धर्म" आणि "राज्यघटना" यांना अनुसरून आपल्या मनात अंतर्विरोध उत्पन्न होण्यास वाव नसावा.

    वरील बाबी लक्षात घेता समाजजीवन, समाजधारणा , समाजरचना व समाजसुधारणा या सर्व प्रक्रिया भारतीय (हिंदू) धर्माधारेच होणे हे भारत देश, देशवासीय आणि मानवाच्या हिताचे आहे.

    हे हित जोपासण्यासाठी आणि जतन करून ठेवण्यासाठी प्रचलित राज्यघटनेमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. असा प्रत्येक कायदा (त्याच्या उपवाक्य सकट) जो भारत देश आणि देशवासीय विरोधी विचारसरणीचा आहे तो खोडून काढून योग्य असा कायदा समाविष्ट करणे आवश्यक आहे.

    हिंदू समाजामध्ये दिसून येणार्‍या टोकाच्या भूमिका या मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या येनकेन प्रकारेण आपापल्या धर्माच्या स्वार्थाधारित प्रस्थापने साठी अवलंबिलेल्या मार्गांचा परिपाक आहे. त्यामुळे त्यांचा पाया हा विध्वंसक असला तरी तकलादू आहे.

    याचे ताजे उदाहरण म्हणजे संघस्वयंसेवकांच्या गेल्या काही वर्षांच्या अविरत आणि अथक प्रयत्नांमुळे ईशान्येकडील भारतीय राज्यांमध्ये अलिकडेच मिळालेला राजकीय विजय, जो मत आणि बर्‍याच अंशी मन परिवर्तनामुळे प्राप्त झाला.

    मानवी मन हे विश्वामध्ये कुठेही गेले तरी समानच असणार आहे. त्यामुळे हिंदुधर्माचे तत्वज्ञान हे अखिल मानवजातीला आकृष्ट करणारच. श्रुतींच्या प्रकाशात स्मृतींच्या आधाराने चालणारा हिंदुधर्म हाच सर्वसमावेशक आणि सर्वोपयोगी सिद्ध होणार आहे.

    ख्रिश्चन धर्मीयांच्या अगोदर पैसा आणि औषध रुपांमधील लाच देवून नंतर धर्मांतरितांना अपमानास्पद वागणूक देण्याची कार्यपद्धत असो किंवा मुसलमानांची आणि कम्युनिस्टांची दहशतवादी कार्यपद्धत असो, जगभरात हळुहळु पण निर्णायक असे भारतीय विचारसरणीचे (सामाजिक तसेच आर्थिक) स्वागत आणि पाश्चात्य समाजामध्ये हिंदू धर्माचे होत असलेले अनुकरण हेच अधोरेखित करते की भारतीय राज्यघटना ही हिंदू धर्माधारितच असली पाहिजे.

    - राजेंद्र कोप्पीकर

    ReplyDelete
  7. या लेखावर प्रसिद्ध झालेल्या मतमतांतरांविषयी मूळ लेखकाचे जर काही मत असेल तर कृपया मांडावे.

    ReplyDelete