हे असे एकात्म मानव दर्शन ------ कविः डॉ अभिजित फडणीस

साम्यवादाचा फुगा फुटला
भांडवलशाहीला सामान्य विटला
आता हवे पर्यायी चिंतन
देते आम्हा एकात्म मानव दर्शन

भांडवलशाहीतून स्वार्थ निपजला
साम्यवादाने मनुष्य चिरडला
आमच्या ऋषींचे विचार चिरंतन
त्यावर आधारित एकात्म मानव दर्शन

समाजाची त्यांनी रचना केली
अधिकारांची विभागणी केली
दायित्व अधिकारांहून महान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्मज्ञान आहे तिथे सत्ता नको
सत्ता आहे तिथे स्वार्थ नको
पैसा  आहे तिथे समाजाची जाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

गुण-कर्म जरी प्रत्येकाचे वेगळे असे
ध्येय मात्र सर्वांचे एकच जसे
श्रमाश्रमातून समाज उन्नयन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

जाती पाती वर्ण आणि पंथभेद
वरवरती दिसती, अंतर्यामी एकजीव
अवयव अनेक, तरी एकत्र संजीवन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानवाच्या भोगासाठी सृष्टी
समजूत इहवादाची खोटी
कंकरात ईश्वरी अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन
केवळ स्वार्थ नसे जीवनमूल्य
अधिकारांपेक्षा कर्तव्याला मोल
प्रत्येक कृतीतून विश्वस्पंदन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानव नसे केवळ पशूमात्र
दिव्यत्वाचा त्याला स्पर्श
करू त्याचे सम्यक जागरण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

घेण्याचा नको देण्याचा विचार
व्यष्टीचाच नको समष्टीचा विचार 
सृष्टी आणि परमेष्टी चिरंतन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

एकात्मता बंधुत्वाहून श्रेष्ठ
अद्वैत द्वैताहून वरिष्ठ
भावनिक ऐक्याचे प्रतिपादन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

पददलितांचे उत्थान साधूया
परदुःखातच आपले दुःख पाहूया
जनताजनार्दन म्हणजे नारायण
हेच खरे एकात्म मानव दर्शन
पंथ निरपेक्षता हवी साची
ईश्वराची भक्ती यथामती
पण राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्म म्हणजे राष्ट्राची चिती
विराट राष्ट्राची संस्कृती
चिती  आणि विराटाचे जागरण 
हेच खरे एकात्म मानव दर्शन
राजसत्तेची इतिकर्तव्ये अनेक
व्यक्तीचे उत्थान समाजधारणा नेक
प्रजेचे स्वपुत्रवत पालन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

शिक्षण नसे केवळ पुस्तकी ज्ञान
आंतरिक क्षमतांचे त्यात विकसन
व्यक्ती बने राष्ट्रीय सद्गुणांची खाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कायद्यापेक्षा स्वयंशिस्त श्रेष्ठ
संस्काराने नराचा नारायण हे उद्दिष्ट
जीवनाचं आमूलाग्र परिवर्तन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कलहापेक्षा प्रेम आणि अवलंबित्व
पश्चिम नि भारतीय विचार भिन्नत्व
वैविध्यता एकत्व सूत्र बंधन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

विसंवाद नको संवाद हवा,
युद्ध नको बंधुभाव हवा
त्या साठी सबळ राष्ट्र निर्माण
हेच एकात्म मानव दर्शन

काम, क्रोध ह्रासाला कारण,
प्रेम आणि त्याग सत्वाचे जागरण
मैं नही तू ही विचार संवर्धन
हेच एकात्म मानव दर्शन

व्यक्तीचा विचार नको अर्धवट :
शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांचा हा घट
या साऱ्यांचे सम्यक चिंतन
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
चारी पुरुषार्थांची सांगड श्रेष्ठ
धर्माचे महत्व अनन्य साधारण
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म राज्याहुन ही श्रेष्ठ
धर्म म्हणजे पंथ नव्हे जाण
धर्म राष्ट्राचालनाचा प्राण
हेच एकात्म मानव दर्शन

राजशक्ती अतिरेक, तर धर्माचा क्षय
हेच साम्यवादाच्या ह्रासाचे कारण
समाजाभिमुख व्यक्तीचे निर्माण,
हेच एकात्म मानव दर्शन

राज्यशक्ती आणि राष्ट्र आहेत भिन्न
पश्चिमेने केली गल्लत समान लेखून
राज्य अस्थायी, राष्ट्रशक्ती असे चिरंतन
हेच एकात्म मानव दर्शन

जन्मलेल्या अन्न हवे,
कमवेल त्याने द्यायला हवे
वसुधैव कुटुंबाची जाण
हेच एकात्म मानव दर्शन

मनुष्य घटक नसे केवळ आर्थिक
'
जीवो ब्रहमैव ना परः' ऐक्य उत्कट
करूया त्याला नराचा नारायण
हेच एकात्म मानव दर्शन

स्वदेशी, विकेंद्रीकरणावर भर
तंत्रज्ञानाबरोबर मानवीय विचार
स्वार्थ नव्हे, अंत्योदयाचा निर्धार
हेच एकात्म मानव दर्शन
(एकात्म मानव दर्शन संमेलन ठाणे 24.9.2017)

दीनदयाळजींचे विचार अभ्यासणे गरजेचे - अनिल जवळेकर

पं. दीनदयाळजींच्या जन्म शताब्दी वर्ष समाप्तीच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे विचार अंमलात आणण्याचा फार प्रयत्न झाला असे म्हणता येत नाही. त्यांचे विचार समजून घेण्याचा फार प्रयत्न झाला असेही नाही. तसं पाहिलं तर भारतात विद्वानांची संख्या कमी नाही. त्यातही अशांची संख्या खूप मोठी आहे जे भारतीय तर आहेत पण त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय नाही. भारतीय असून तत्त्वज्ञानही भारतीय असलेल्यांची संख्या भारतात फार कमी आहे आणि त्यात एक पं. दीनदयाळजी मोडतात.

भारतीय चिंतन पारंपारिक दृष्ट्‍या विकसनशील राहिले आहे. सूक्ष्म व विस्तृत्व अशा दोन्ही रूपात या तत्वज्ञानाला समजून घेता येते आणि भारतीय तत्त्ववेत्त्यांनी तसाच प्रयत्न केलेला दिसतो. भारतीय साधुसंत व विद्वान भारतीय चिंतनाचा अर्थ कधी विस्तार करून सांगत आले आहेत तर कधी सूक्ष्मतेत त्यांनी त्याचा शोध घेतला आहे. म्हणूनच भागवत व पुराणात हे चिंतन विस्तारित होते तर भगवद्गीतेत सूक्ष्म. विशेष म्हणजे समयानुसार अर्थ हा ह्या भारतीय चिंतनाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. म्हणूनच एका पराभूत मानसिकतेने दुर्बल झालेल्या समाजाला समर्थतेचा संदेश स्वामी विवेकानंद देऊ शकले तर म गांधीजी संतत्व स्वीकारून भारतीय चिंतनाच्या आधारे स्वतंत्रतेचे आंदोलन यशस्वी करू शकले. पं दीनदयाळजींनी ह्याच भारतीय चिंतनाला स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचा आधार मानला व काही रचनात्मक विचार मांडले. सध्या त्याचा विशेष अभ्यास होण्याची गरज आहे असे वाटते.

स्वातंत्र्यानंतर देशाला एक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करणे गरजेचे होते. पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने या देशाची एक राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे धाडसाचे होईल. संसदीय लोकशाही, अलिप्ततावाद व पाश्च्यात्याच्या विचारांचे-आचारांचे अनुकरण हेच राष्ट्रीयतेचे प्रतीक बनवताना आपल्या सांस्कृतिक परंपरा, संस्कार आणि आदर्श तिरस्कारीत होणार नाहीत ह्याची काळजी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. दीनदयाळजीनी आपल्या विचारात हे आग्रहाने मांडले की कुणाच्या अनुकरणाने वा परावलंबनाने राष्ट्र जोमाने उभे राहत नसते तर स्व‍कीय साधनसामुग्रीच्या संवर्धनातून व सामर्थ्यातून ते येत असते. त्यांच्या मते राष्ट्रीयता व राष्ट्रीय भावना ह्या फक्त भौगोलिक सीमांमुळे जागृत होत नसतात तर त्याला परंपरागत सांस्कृतिक वारशाची ओळख लागते. एकात्मता, इतिहासातील उन्नत व अवनत कालखंडांसंबंधी समान भाव, राष्ट्रीय गौरवाची भावना व भविष्यातील प्रगतीसाठी मिळून प्रयत्न करण्याच्या समान इच्छेची प्रत्येक नागरिकात वा जनमानसात निर्मिती झाल्याशिवाय राष्ट्र भावना व्यक्त होत नाही. राष्ट्रहिताला डावलून वेगवेगळ्या इच्छा असणारे गट देशहिताला नुकसान पोचवतात. आजचे बरेच संघर्ष हे संपूर्णसमाजहित न पाहणा-या वेगवेगळ्या इच्छांमुळे आहेत हे मान्य व्हावे. पाकिस्तानबरोबर युद्ध होत असताना राष्ट्रीय इच्छेची प्रचीति येत असते. पण अशी एकात्म समान इच्छा सर्वच ठिकाणी दिसली पाहिजे तर ते राष्ट्रीय हिताचे होईल असे दीनदयाळजींचे म्हणणे होते.

सध्या भारतीय लोकशाही ही फारच खालच्या पातळीवर जात आहे हे मान्य व्हावे. पं. दीनदयाळजींना ही भीती वाटायची की संधिसाधू राजकीय वृत्ती समाजाचा लोकशाहीवरचा विश्वास उडवण्यास कारणीभूत ठरेल आणि ते भयावह असेल. व्यक्तिगत शुद्ध चारित्र्य, तत्त्वनिष्ठा व देशहिताचे राजकारण करण्याची वृत्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

दीनदयाळजी प्रागतिक विचाराचे होते. जुन्या रूढी परंपरा ज्यांची आज गरज संपली आहे त्या सोडल्या पाहिजेत असेच त्यांचे मत होते. गंगेत जे पाणी वाहून गेले आहे ते परत आणता येत नसते याची त्यांना जाण होती. जे चांगले आहे ते जतन केले पाहिजे ह्या बाबतीत मात्र ते आग्रही होते. अंधानुकरणाच्या ते विरुद्ध होते. प्रगतीचा अर्थ पाश्चिमात्य होणे असा नाही हे लक्षात ठेवले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे. त्यांच्या मते कुठलाही ‘इझम’ जिथे जन्मला तिथे जेवढा उपयोगी असतो तेवढा दुसरीकडे असत नाही याचे भान ठेवले पाहिजे. सर्वच ‘इझम’पासून दूर राहीले पाहिजे कारण ‘इझम’ आपल्याला सांच्यात जखडून टाकू शकतो. भारताला आपल्या समस्या आपल्याच बळावर सोडवाव्या लागतील व अनुकरणाने नुकसानच होईल असे त्यांना वाटायचे. दीनदयाळजीनी एकात्म मानव दर्शनाची रूपरेषा मांडली त्या अगोदरचा काळ साधारणपणे १९४७ ते १९६४ पर्यंतचा त्यांनी अभ्यासिला होता. ह्या काळात चीनबरोबरचे एक युद्ध भारत हरलेला होता व एक योजनाबद्ध विकासाचे नेहरू पर्व संपलेले वा संपत आलेले होते. एकंदरीतच राष्ट्र निर्माणाची एक महत्त्वाची संधी भारताने गमावली असल्याची त्यांना खंत होती. त्यातूनच त्यांनी भारतीय चिंतनावर आधारित काळानुरूप राष्ट्रीय तत्त्वज्ञान ‘एकात्म मानव दर्शन’ अभ्यास करून मांडले. ते मांडताना त्यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लो.टिळक, महामना मालवीय, म. गांधी, विनोबाजी व इतरांच्या राष्ट्रीय विचारांचा सुमेळ साधला आहे. त्यालाही आता 50 वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही याचा जेवढा अभ्यास, प्रचार, प्रसार व उपयोग राष्ट्रजीवनात व्हावयास हवा तेवढा होत नाही. हे आपण करू तरच पाश्चात्य चक्रव्यूहातून बाहेर पडून आपण सुयोग्य, सर्वसमावेशक व मानवी चेह-याचा विकास करू शकू.

वयं पंचाधिकं शतम् - रवीन्द्र महाजन

दै. लोकसत्तेतील बातमीप्रमाणे अमेरिकेत बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात बोलताना

“..... नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत....हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे…..”

परदेशात आपले पंतप्रधान, आपले सरकार यांच्यावर कडक टीका करणा-या व आपल्या देशाचे काळेकुट्ट चित्र रंगवणा-या राजकीय नेत्याचे पक्षांध लोक सोडल्यास कोणीही समर्थन करणार नाही. सध्या ज्यांची जन्मशताब्दी चालू आहे त्या पं. दीनदयाळजींचे या बाबतीत स्मरण होते. परदेशात दौ-यावर असताना त्यांना तत्कालीन सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारण्यात आले. पण त्यांनी नम्रपणे सांगितले की परदेशात आम्ही राष्ट्रीय सरकारच्याच बाजूने आहोत. धोरणात्मक मतभेद हे आम्ही आमच्या राष्ट्रीय व्यासपीठावर मांडू.

आनंदाची गोष्ट म्हणजे असाच विवेक ज्यांच्याकडून फारशी अपेक्षा नसेल अशा लालुप्रसाद यादवांनीही केला होता. पत्रकार व भाजपचे माजी खासदार बलबीर पुंज यांनी एका बैठकीत नुकतेच सांगितले की 2002 साली अटलजी पंतप्रधान असताना ते एका संसदीय शिष्टमंडळात पाकिस्तानला गेले होते. त्यांच्याबरोबर लालूजी व कॉंग्रेसचे मणीशंकर अय्यरही होते. लाहोर येथे टीव्ही कार्यक्रमात त्या तिघांना भारतीय राजकारणारवर उलटे सुलटे प्रश्न विचारले जात होते. लालूजींना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की “हम सब एक हैं, बलबीर जी ही इसका जबाब देंगे”. मणी शंकर अय्यरांनी मात्र भारत सरकारच्या धोरणांवर खरपूस टीका केली.

एकंदरच राजकारणापेक्षा राष्ट्रकारण हे मोठे आहे व राष्ट्रीय प्रतिमा व राष्ट्रीय हित जपणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव स्वार्थ व पक्षमोह यांमुळे कमी होत आहे. म्हणूनच युधिष्ठिराने आपले भाऊ भीम व अर्जून यांना संकटात सापडलेल्या दुर्योधनाल वाचविण्यासाठी केलेला ‘वयं पंचाधिकं शतम्’ हा उपदेश सर्व काळात सर्व सत्ताधा-यांनी सतत स्मरत रहाण्याची आवश्यकता आहे. पं. दीनदयाळांनी अशाच भावनेतून सर्व पक्षांना साधारणपणे स्वीकारार्ह होऊ शकेल अशा भारतीय चिंतनावर आधारित ‘एकात्म मानव दर्शन’ या राष्ट्रीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा मांडली. तपशीलात वेगवेगळी मते असू शकतात पण राष्ट्रहिताची म्हणचेच जनहिताची सर्वांची एक दृष्टी असेल तर राष्ट्र चांगली प्रगती करू शकते. आजच्या परिस्थितीत हे साधण्यासाठी आदरणीय राष्ट्रपतींनी सर्वपक्षीय बैठक पुरेशा पूर्वतयारीनिशी बोलावून राजकारणात असलेल्या लोकांसाठी परदेशदौ-यासाठी आचारसंहिता करण्याचा प्रयत्न केल्यास ते देशहिताचे होईल. परदेशांमध्ये भारताची प्रतिमा उजळ राहील. असाच प्रयत्न भारतीय चिंतन व परिस्थितीवर आधारित विकासाची मार्गदर्शक आधारभूत तत्त्वे यांच्याविषयी राष्ट्रीय सहमती करण्याचा आदरणीय राष्ट्रपतींनी करावा असे सुचवावे वाटते.