दीनदयाळजींचे विचार अभ्यासणे गरजेचे - अनिल जवळेकर

पं. दीनदयाळजींच्या जन्म शताब्दी वर्ष समाप्तीच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे विचार अंमलात आणण्याचा फार प्रयत्न झाला असे म्हणता येत नाही. त्यांचे विचार समजून घेण्याचा फार प्रयत्न झाला असेही नाही. तसं पाहिलं तर भारतात विद्वानांची संख्या कमी नाही. त्यातही अशांची संख्या खूप मोठी आहे जे भारतीय तर आहेत पण त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय नाही. भारतीय असून तत्त्वज्ञानही भारतीय असलेल्यांची संख्या भारतात फार कमी आहे आणि त्यात एक पं. दीनदयाळजी मोडतात.

भारतीय चिंतन पारंपारिक दृष्ट्‍या विकसनशील राहिले आहे. सूक्ष्म व विस्तृत्व अशा दोन्ही रूपात या तत्वज्ञानाला समजून घेता येते आणि भारतीय तत्त्ववेत्त्यांनी तसाच प्रयत्न केलेला दिसतो. भारतीय साधुसंत व विद्वान भारतीय चिंतनाचा अर्थ कधी विस्तार करून सांगत आले आहेत तर कधी सूक्ष्मतेत त्यांनी त्याचा शोध घेतला आहे. म्हणूनच भागवत व पुराणात हे चिंतन विस्तारित होते तर भगवद्गीतेत सूक्ष्म. विशेष म्हणजे समयानुसार अर्थ हा ह्या भारतीय चिंतनाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. म्हणूनच एका पराभूत मानसिकतेने दुर्बल झालेल्या समाजाला समर्थतेचा संदेश स्वामी विवेकानंद देऊ शकले तर म गांधीजी संतत्व स्वीकारून भारतीय चिंतनाच्या आधारे स्वतंत्रतेचे आंदोलन यशस्वी करू शकले. पं दीनदयाळजींनी ह्याच भारतीय चिंतनाला स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचा आधार मानला व काही रचनात्मक विचार मांडले. सध्या त्याचा विशेष अभ्यास होण्याची गरज आहे असे वाटते.

स्वातंत्र्यानंतर देशाला एक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करणे गरजेचे होते. पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने या देशाची एक राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे धाडसाचे होईल. संसदीय लोकशाही, अलिप्ततावाद व पाश्च्यात्याच्या विचारांचे-आचारांचे अनुकरण हेच राष्ट्रीयतेचे प्रतीक बनवताना आपल्या सांस्कृतिक परंपरा, संस्कार आणि आदर्श तिरस्कारीत होणार नाहीत ह्याची काळजी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. दीनदयाळजीनी आपल्या विचारात हे आग्रहाने मांडले की कुणाच्या अनुकरणाने वा परावलंबनाने राष्ट्र जोमाने उभे राहत नसते तर स्व‍कीय साधनसामुग्रीच्या संवर्धनातून व सामर्थ्यातून ते येत असते. त्यांच्या मते राष्ट्रीयता व राष्ट्रीय भावना ह्या फक्त भौगोलिक सीमांमुळे जागृत होत नसतात तर त्याला परंपरागत सांस्कृतिक वारशाची ओळख लागते. एकात्मता, इतिहासातील उन्नत व अवनत कालखंडांसंबंधी समान भाव, राष्ट्रीय गौरवाची भावना व भविष्यातील प्रगतीसाठी मिळून प्रयत्न करण्याच्या समान इच्छेची प्रत्येक नागरिकात वा जनमानसात निर्मिती झाल्याशिवाय राष्ट्र भावना व्यक्त होत नाही. राष्ट्रहिताला डावलून वेगवेगळ्या इच्छा असणारे गट देशहिताला नुकसान पोचवतात. आजचे बरेच संघर्ष हे संपूर्णसमाजहित न पाहणा-या वेगवेगळ्या इच्छांमुळे आहेत हे मान्य व्हावे. पाकिस्तानबरोबर युद्ध होत असताना राष्ट्रीय इच्छेची प्रचीति येत असते. पण अशी एकात्म समान इच्छा सर्वच ठिकाणी दिसली पाहिजे तर ते राष्ट्रीय हिताचे होईल असे दीनदयाळजींचे म्हणणे होते.

सध्या भारतीय लोकशाही ही फारच खालच्या पातळीवर जात आहे हे मान्य व्हावे. पं. दीनदयाळजींना ही भीती वाटायची की संधिसाधू राजकीय वृत्ती समाजाचा लोकशाहीवरचा विश्वास उडवण्यास कारणीभूत ठरेल आणि ते भयावह असेल. व्यक्तिगत शुद्ध चारित्र्य, तत्त्वनिष्ठा व देशहिताचे राजकारण करण्याची वृत्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

दीनदयाळजी प्रागतिक विचाराचे होते. जुन्या रूढी परंपरा ज्यांची आज गरज संपली आहे त्या सोडल्या पाहिजेत असेच त्यांचे मत होते. गंगेत जे पाणी वाहून गेले आहे ते परत आणता येत नसते याची त्यांना जाण होती. जे चांगले आहे ते जतन केले पाहिजे ह्या बाबतीत मात्र ते आग्रही होते. अंधानुकरणाच्या ते विरुद्ध होते. प्रगतीचा अर्थ पाश्चिमात्य होणे असा नाही हे लक्षात ठेवले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे. त्यांच्या मते कुठलाही ‘इझम’ जिथे जन्मला तिथे जेवढा उपयोगी असतो तेवढा दुसरीकडे असत नाही याचे भान ठेवले पाहिजे. सर्वच ‘इझम’पासून दूर राहीले पाहिजे कारण ‘इझम’ आपल्याला सांच्यात जखडून टाकू शकतो. भारताला आपल्या समस्या आपल्याच बळावर सोडवाव्या लागतील व अनुकरणाने नुकसानच होईल असे त्यांना वाटायचे. दीनदयाळजीनी एकात्म मानव दर्शनाची रूपरेषा मांडली त्या अगोदरचा काळ साधारणपणे १९४७ ते १९६४ पर्यंतचा त्यांनी अभ्यासिला होता. ह्या काळात चीनबरोबरचे एक युद्ध भारत हरलेला होता व एक योजनाबद्ध विकासाचे नेहरू पर्व संपलेले वा संपत आलेले होते. एकंदरीतच राष्ट्र निर्माणाची एक महत्त्वाची संधी भारताने गमावली असल्याची त्यांना खंत होती. त्यातूनच त्यांनी भारतीय चिंतनावर आधारित काळानुरूप राष्ट्रीय तत्त्वज्ञान ‘एकात्म मानव दर्शन’ अभ्यास करून मांडले. ते मांडताना त्यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लो.टिळक, महामना मालवीय, म. गांधी, विनोबाजी व इतरांच्या राष्ट्रीय विचारांचा सुमेळ साधला आहे. त्यालाही आता 50 वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही याचा जेवढा अभ्यास, प्रचार, प्रसार व उपयोग राष्ट्रजीवनात व्हावयास हवा तेवढा होत नाही. हे आपण करू तरच पाश्चात्य चक्रव्यूहातून बाहेर पडून आपण सुयोग्य, सर्वसमावेशक व मानवी चेह-याचा विकास करू शकू.

No comments:

Post a Comment