सुलभ एकात्म मानव दर्शन – 03 (क्रमशः) -ले. विनय पत्राळे



भांडवलशाही
 प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार मिळाले पाहिजे या तत्वावर भांडवलशाही व्यवस्था उदयास आली. यंत्रयुग, नफेखोरी, स्पर्धा ही या व्यवस्थेची लक्षणे म्हणता येतील. त्यातून आर्थिक विषमता व सामाजिक विद्वेष जन्माला आले. पैशाकडे पैसा जाऊ लागला. श्रीमंत अधिक श्रीमंत झालेत तर गरीब अधिक गरीब होऊ लागलेत. समाजात शोषक आणि शोषित असे दोन वर्ग तयार झाले व त्यातून कम्युनिस्ट क्रांतीची पार्श्वभूमी तयार झाली.
      भांडवलशाहीचे पुरस्कर्ते केन्स व एडम स्मिथ यांच्या मताप्रमाणे मनुष्यातला लोभ व हावरटपणा, ईर्ष्या व मत्सर जेवढा वाढवता येईल तेवढी ही व्यवस्था चांगली चालेल. या विचारसरणीमुळे गरजेनुसार उत्पादन या ऐवजी नफ्यासाठी उत्पादन करणे व विक्रीसाठी गरज निर्माण करणे हे नवे सूत्र निर्माण झाले. आपल्या देशात पूर्वी चहा पिण्याचे प्रमाण अत्यल्प होते. इंग्रजांच्या काळात फुकटात चहा वाटून त्याची सवय लावण्यात आली. हळूहळू तिचे व्यसनात रूपांतर झाले. घरोघरी चहा घेतला जाऊ लागला. चहा वेळेवर मिळाला नाही तर डोके दुखते, कामात लक्ष लागत नाही... असे घडू लागले.
       अशीच स्थिति आज सर्वत्र आढळते. भरमसाठ उत्पादने निर्माण केली जातात. ती विक्री होण्यासाठी टीव्हीवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार केला जातो. अमुक साबण वापरले नाही किंवा अमुक सौंदर्य प्रसाधन वापरले नाही.... विशिष्ट चॉकलेट खाल्ले नाही किंवा विशिष्ट कोल्ड ड्रिंक प्यायले नाही तर तुम्ही मागासलेले आहात हा भाव जाहिरातीतून निर्माण केला जातो. वस्तू डोक्यावर मारण्याची व्यवस्था असते. हाव वाढवली जाते. हाजमोल्याने पचवा पण तत्पूर्वी भरपूर खा... असे प्रलोभन दिले जाते.
       निसर्गाकड़े सर्वांच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी पुरेसे स्त्रोत उपलब्ध आहेत पण कोणाचाही अतिरिक्त लोभ पूर्ण करण्यासाठीच्या व्यवस्था नाहीत. Nature has sufficient to supply for everybody’s is need but nobody’s greed.  भांडवलशाही व्यवस्थांमुळे निसर्गावर अतिरिक्त ताण पडतो. वापरा व फेका (use and throw) ची संस्कृती तयार होते. नफेखोरी हाच मुख्य उद्देश असल्यामुळे पर्यावरण व नैतिकतेचा बळी दिला जातो. मी कमावलेला पैसा - मी वाटेल तसा उडवणार अशी गुरमी निर्माण होते.    
       अमेरिकेत एका टी शर्ट बनवणा-या कंपनीने पिस्तुलाचे चित्र असलेला टी शर्ट तयार केला थोड्याच काळात तो युवकांमधे अत्यंत लोकप्रिय झाला. कंपनीने खूप नफा कमविला. पण काही काळाने लोकांच्या लक्षात आले की हे टी शर्ट घालणा-या युवकांच्या मनात हिंसक विचार येतात - त्यांच्यात गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते. समाजातल्या सुजाण लोकांनी ह्या विरुद्ध आवाज उठविला. कंपनीवर बाजारातून टी शर्ट परत मागवण्यासाठी दबाव उत्पन्न केला.... यावर कंपनी मालकाचे उत्तर असे होते “I am in the business of T-shirts…  not in the business of morality”.
      वाढते उत्पादन व तंत्रामुळे निसर्गावर किती भार प़डतोय याचा विचार भांडवलशाही व्यवस्था करत नाही. रासायनिक द्रव्ये निर्माण करणारे कारखाने आपला दूषित कचरा बिनदिक्कत नद्यांमधे ओततात... त्यामुळे त्यातील जलचरसृष्टीला होणारे नुकसान त्यांच्या खिजगणतीत नसते.
      यंत्रयुगामुळे उत्पादनाची गती वाढते पण माणसाला पूर्ण वस्तु उत्पादन केल्याचे समाधान मिळत नाही. तेच ते काम सतत केल्यामुळे जीवनात एक प्रकारची निराशा येते. त्यातून हताशा व वैफल्य जन्म घेतात. ते दूर करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. आर्थिक विषमता ही विद्वेषाला जन्म देते. त्यातून समाजात गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते असे हे दुष्ट चक्र आहे. त्यातून दुस-या अतिचा जन्म होतो.

कम्युनिझम
Communist Revolution is natural outcome of Capitalism असे म्हटले जाते. कम्युनिझम मनुष्याचे स्वातंत्र्य मर्यादित करतो. उत्पादनाची साधनें ही समाजाच्या मालकीची असतात. उत्पादन व वितरणातून जो नफा होतो, तो सर्वांना समान रूपाने वाटला जावा अशी अपेक्षा असते. कम्युनिस्ट व्यवस्था कुटुंब मानत नाही. लोकांनी लहान लहान कम्युनमधे रहावे. तेथे सर्वांच्या आवश्यकता पूर्ण केल्या जातील असे ती म्हणते.
        कम्युनिस्ट क्रांतीचा सर्वात मोठा प्रयोग सोवियत यूनियन (USSR) च्या स्वरूपात झाला. त्यांनी कुटुंब व्यवस्थेबरोबरच राष्ट्रीयतेला सुद्धा नकार दिला. 15-16 राष्ट्रांचे एक सोवियत यूनियन तयार केले. सामूहिक शेतीचा प्रयोग सुरू केला. उत्पादनाची साधने, कारखाने सरकारने ताब्यात घेतले. जगभर सोवियत क्रांतीचे पोवाडे गाईले जाऊ लागले. अमेरिका व रशिया सोवियत अशा दोन महाशक्तींच्या टक्करी जगाने काही काळ पाहिल्या. भिंतीपलीकडचे वास्तव सोवियत यूनियनने दीर्घकाळपर्यंत आपल्या पोलादी पडद्याआड दडवून ठेवले. व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. प्रचारमाध्यमांना लगाम लावला गेला. त्या काळात एक विनोद प्रसिद्ध होता. अमेरिकन नागरिक व रशियन नागरिक चर्चा करीत असतात. अमेरिकन नागरिक म्हणतो की आमच्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य पराकोटीचे आहे. इतके की अमेरिकेचा नागरिक व्हाईट हाऊससमोर उभा राहून मोठ्याने ओरडू शकतो की अमेरिकेचा राष्ट्रपती मूर्ख आहे. यावर रशियन नागरिक म्हणतो की यात विशेष ते काय? आमच्याकडेही स्वातंत्र्य आहे. आम्हीसुद्धा क्रेमलीनसमोरच्या चौकात उभे राहून मोठ्याने ओरडू शकतो की अमेरिकेचा राष्ट्रपती मूर्ख आहे’!”
               कम्युनिस्ट अर्थव्यवस्थमुळे एक नुकसान असे झाले की पुढाकार (initiative) घेण्याची वृत्ती मंदावली. मला जर श्रेय मिळणार नसेल तर मी का परिश्रम करावे?” हा स्वाभाविक विचार परिणाम दाखवू लागला. अन्नधान्याचे उत्पादन सामूहिक शेतीमुळे प्रचंड प्रमाणात कमी झाले. अन्नासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या.
             प्रशासनाच्या हाती सर्वाधिकार घेतल्यामुळे सोवियत यूनियनने शस्त्रास्त्रे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केलीत. पण शेवटी मिसाइल विकून ब्रेड व नान खरेदी करण्याची पाळी त्यांच्यावर आली.
       दाबून टाकलेल्या राष्ट्रीयतेचा आवाज सोवियत यूनियनमधे बुलंद झाला. कम्युनिस्ट पकड़ ढीली झाल्याबरोबर सोवियत यूनियनची शकले उडाली. युक्रेन, किर्गिझस्तान, कजाकिस्तान, उज़्बेकिस्तान, अझरबैजान असे त्याचे टुकडे झालेत.
       सर्वांत मोठा घटक या नात्याने रशिया अजूनही आहे. पण त्यांनी क्रेन लावून मार्क्स व लेनीनचे पुतळे हटवले. शहाणपणा दाखवून गोर्बाचेव्हने शस्त्रकपातीचा निर्णय घेतला. त्यातून जीवघेणी शस्त्रस्पर्धा कमी झाली  व विश्वाने सुटकेचा श्वास टाकला.

भांडवलशाही व कम्युनिझम दोन्हीतही दोष
        वरील दोन्ही प्रकारच्या विचारसरणीत एक साम्य आढळून येते. या दोन्ही पाश्चिमात्य विचारधारा भौतिक आहेत. तेथे ईश्वराचे अस्तित्व अमान्य केले आहे अथवा विचारात घेतलेले नाही. मानवमात्र संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे आणि त्याच्या उपभोगासाठीच ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली असा बायबलप्रेरित विचार केंद्रस्थानी असल्यामुळे निसर्गाच्या अपरिमित -हासाकड़े पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. काहीही लाभ होणार नसेल तर एका मनुष्याने दुस-यास मदत का करावी?’ या साध्या प्रश्नाचे उत्तर भौतिकवादी विचार देऊ शकत नाही.
       आज कम्युनिस्ट समाजवादी विचार पराभूत झाल्यानंतर विश्व पुन्हा भांडवलशाही व्यवस्थेकडे आकर्षित झालेले दिसते. चीनमधे स्टॉक मार्केट सुरू झाले. भारतानेही स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेहरूंच्या  नेतृत्वाखाली रशियन मॉडेल स्वीकारले होते ते सोडून अमेरिकन मॉडेलच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. सरकारद्वारा संचालित पब्लिक सेक्टरमधे प्रचंड नुकसान झाल्यानंतर त्याचे खाजगीकरण सुरू झाले. लालफीतशाही मोकऴी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.  
      परंतु श्रीमंतीचा महापुर असलेल्या अमेरिकेतील मनुष्य सुखी आहे असे म्हणता येईल का? झोपेच्या गोळ्या घेणा-यांचे प्रमाण तेथे सर्वाधिक आहे. दारू पिऊन रोड एक्सीडेंट करणा-यांची संख्या भयानक आहे. जगातील सर्व देशांच्या तुलनेत सर्वाधिक कैदी अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. कुमारी मातांचे प्रमाण खूप अधिक आहे. माता किंवा पिता यापैकी एकाच पालकांजवळ राहणारी मुले प्रचंड संख्येत आहेत.
      भारतातून जाणा-या आध्यात्मिक विभूतींना तेथे प्रचंड प्रतिसाद आहे. योग, ध्यान इत्यादींना खूप मागणी आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास होत आहे. भारतीय संस्कृती, हिंदुत्व इत्यादी विषयावर शोधप्रबंध लिहिले जात आहेत.
      थोड़क्यात... एका तिस-या पर्यायाकडे विश्व दृष्टी लावून बसले आहे. तो पर्याय त्यांना भारतीय चिंतनात जाणवतो आहे. काय आहे हे भारतीय चिंतन... (क्रमशः)

No comments:

Post a Comment