केंद्रीय बजेट आणि अंत्योदय - अनिल जवळेकर

भारतीय वित्तमंत्र्यांनी २०१८-१९ साठीचे बजेट सादर केले. भाजपा सरकारचे या कार्यकालाचे हे बजेट शेवटचे असेल तेव्हा मतपेटी कडे लक्ष असणे स्वाभाविक म्ह्णावे लागेल. भारतीय मतपेटी ही शेतकरी, गरीब, दलित तसेच अल्पसंख्य म्हणवला जाणारा मुस्लीम समाज याने भरलेली आहे. त्यामुळे कुठलाही वित्तमंत्री मग तो कुठल्याही पक्षाचा असो या मताचा विचार करणार हे गृहीत धरले पाहिजे. प्रश्न फक्त ह्या विचारामागे खरच काही करण्याची इच्छा आहे का एवढाच असतो. ७० वर्षांच्या अनुभवाने असे म्हणता येते की या नवीन अंदाजपत्रकात वित्तमंत्र्यांनी काहीसा प्रयत्न केला आहे. परंतु शेवटी त्यांचे विचार प्रत्यक्षात किती उतरतात त्यावरून हे बजेट चांगले आहे की नाही ते ठरवणे जास्त योग्य होईल.

२०१८-२०१९ वर्षीच्या अंदाज पत्रकात शेतकरी व गरीब यांच्या विषयी विशेष तळमळ व्यक्त केली असल्याचे दिसते. शेतकऱ्याच्या पिकाला लाभदायक मूल्य व गरीब कुटुंबातील सर्वांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा या घोषणा या दृष्टीने महत्वाच्या म्हणता येतील. पं. दीनदयाळजींनी पुरस्कारिलेल्या अंत्योदयाच्या मूळ धोरणाला हे धरून म्हणता येईल. ह्यातून शेतकरी व गरीबांचा खरच किती उदय होईल हे मात्र तपासत रहावे लागेल.
तशी अंत्योदयाची कल्पना राबवण्याचा सरकारी प्रयत्न सुरु होऊनही आता ४० वर्षे झाली आहेत. गरीब आणि दलितांसाठी म्हणून भरपूर योजना आखल्या व राबवल्या गेल्या हे खरे असले तरी त्यांच्या अंमलबजावणीने त्यांच्या उदयाची कल्पना साकार झाली असे म्हणणे धाडसाचे होईल.
गरीब आणि दलितांसाठीच्या सुरुवातीच्या योजना त्यांच्यात आर्थिक क्षमता निर्माण व्हावी असा प्रयत्न करणाऱ्या होत्या असे म्हणता येते कारण त्यात रोजगार निर्माण करणे वा उत्पन्न वाढवणे यावर जास्त भर होता. पण नंतर नंतर विशेषतः जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यानंतर अश्या योजनाचा भर प्रत्यक्ष आर्थिक मदतीवर असल्याचे दिसते. दोन्ही प्रकारच्या योजना भारतातील गरिबी हटवू शकल्या नाहीत. शेतकऱ्यासाठी म्हणून राबवलेली न्यूनतम मूल्याची कल्पना राबवूनही आता ५० वर्षे होऊन गेली आणि तरी बहुतांश शेतक-यांपर्यंत त्याचे लाभ पोंचत नाहीत असे दिसते. देशाच्या अऩेक भागात शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत.

यातून एक गोष्ट निश्चित म्हणता येऊ शकेल ती म्हणजे भारताने स्वीकारलेले विकासाचे मॉडेल गरिबी हटवण्यास आणि शेतकऱ्याला समृद्ध करण्यात यशस्वी होऊ शकलेले नाही. स्वीकारलेले विकास मॉडेल मुख्यता उद्योगीकरण व शहरीकरणाचा पुरस्कार करणारे होते हे लक्षात घेतल्यास ग्रामीण भाग, ग्रामीण गरीब आणि लहान शेतकरी का वंचित राहिला हे समजण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण संसाधन व शेती ह्या विकास मॉडेल मध्ये बलिदानाची भूमिका घेत राहतील तरच उद्योग वाढीला लागतात व शहरीकरण होते हे समजून घेतले तर हे विकास मॉडेल अपयशी होण्याचे कारणही समजेल. त्यामुळे खरोखरच जर आपल्याला अंत्योदय पहायचा असेल तर ह्या विकास मॉडेलला तिलांजली द्यावी लागेल.

म. गांधी-विनोबा आणि पं.दीनदयाळांनी पर्याय म्हणून या साठी स्वदेशी, विकेंद्रीत उद्योग व ग्रामीण कौटुंबिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक मानले तर शेती निसर्गाशी संतुलित व स्वावलंबी असण्यावर भर दिला. या सर्वाला पूरक अशी तकनिकी विकसित करणेही त्यांना गरजेचे वाटले. विनोबांनी स्वराज्याची व्याख्या करताना असे म्हटले कि स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचे राज्य म्हणजे प्रत्येकाला माझे वाटेल असे राज्य, असे सर्वांचे राज्य म्हणजे रामराज्य.

ग्रामीण भारतातील बहुतांशी नागरिकाला ह्या रामराज्याची आस आहे पण त्याला आपलेसे वाटेल असे विकासाचे मॉडेल कुणी स्वीकारत नाही. परदेशी विकासाच्या कल्पना, परदेशी भांडवल व परदेशी चंगळवादी जीवन पद्धती स्वीकारल्याने रामराज्य येणार नाही हे जेवढे खरे तेवढेच या रामराज्यात अपेक्षित असलेला अंत्योदय व सर्वोदयही होणार नाही हेही खरे. त्यासाठी एकात्म मानव दर्शनाच्या आधारावर सम्यक विकासाची संकल्पना स्वीकारून पुढे जावे लागेल. त्यामुळे या बजेटमधील सरकारी मदतीच्या घोषणेने अंत्योदयाची कल्पना फार पुढे जाईल याची खात्री वाटत नाही.

सुलभ एकात्म मानव दर्शन – 08 (क्रमशः) - विनय पत्राळे


4 सुखाची संकल्पना .......

मनुष्य सकाळपासून रात्रीपर्यंत कामांमध्ये, अनंत खटपटींमध्ये गुंतलेला असतो. सर्वच प्राणिमात्र ज्या विविध गतिविधी करत असतात त्या सर्वांचे सारांश असा एकमात्र उद्देश कोणता असेल तर तो सुखाची प्राप्ती हा आहे. दगड फोडणाऱ्या पाथरवटापासून तर मोठ्या कारखानदारापर्यंत आणि जमिनीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर मोठ्या राजकीय नेत्यापर्यंत सर्वांच्या जीवनाचा धावपळीचा एकमेव उद्देश हा सुखाची प्राप्ती हा आहे. सुख म्हणजे काय, सुख होते म्हणजे काय होते, आनंद होतो म्हणजे नक्की काय असते हा चिंतनाला विषय आहे.

सुख म्हणजे काय ? अनुकूल संवेदना म्हणजे सुख. जे केल्याने अनुकूल, आवडणाऱ्या संवेदना निर्माण होतात, ते म्हणजे सुख व जे केल्याने प्रतिकूल न आवडणाऱ्या संवेदना निर्माण होतात ते म्हणजे दुःख:!

सुखाचे वर्णन करणे कठीणच आहे. सुख होते म्हणजे नक्की काय होते? मला गुलाबजाम आवडतात, ते खाल्ल्याने मला सुख मिळते. किशोरकुमारचे गाणे ऐकून मिळते, रातराणीचा सुगंध घेतल्याने मिळते. सूर्यास्ताची शोभा पाहिल्याने मिळते. नरम मुलायम गादीवर गाढ झोपल्याने मिळते.

जीभ, कान, नाक, डोळे, त्वचा हि इंद्रिये आहेत आणि शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध हे विषय आहेत. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यामुळे जी अनुकूल संवेदना निर्माण होते ते म्हणजे सुख. हे सुख 'मला' होते. हा आनंद 'मला' होतो.

पण मग ‘मी’ कोण आहे?

आपण म्हणतो “आज सकाळी ‘मी’ स्नान करून नाश्ता केला”. येथे मी म्हणजे आपण शरीराशी एकरूप आहोत.
“रेल्वे अपघाताची बातमी वाचून ‘मी’ विषण्ण झालो”. येथे मी म्हणजे आपण मनाशी एकरूप आहोत.

“पासपोर्ट कसा काढायचा याची ‘मी’ त्याला कल्पना दिली” या वाक्यात मी स्वात:ला बुद्धी समजून बोलतोय.

“माझ्यातला ‘मी’पणा गेला तर तो (परमात्मा) भेटेल”. या वाक्यात मी म्हणजे अहंकार आहे.

गीतेत कृष्ण म्हणतात “बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन”. म्हणजे माझे व तुझे यापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. यातला ‘मी’ म्हणजे स्वात:चा चैतन्य समजून केलेला उल्लेख आहे.

हे मनुष्याच्या अस्तित्वाचे शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चैतन्य असे विभिन्न होत जाणारे आविष्कार आहेत व सुखाच्या पायऱ्या या सर्व आविष्कारांवर अधिकाधिक उन्नत होत जातात. वरच्या स्तराचे सुख माणसाला अधिक प्रिय असते. त्याची किंमत देऊन खालच्या स्तराचे सुख मिळाले तर ते त्याला नको असते.

उदाहरणार्थ जेवल्याने सुख मिळते. पण कोणी शिव्या देत देत अन्न वाढले तर सुख मिळेल काय? नाही! शिव्या दिल्याने काय झाले? अन्नाची चव कमी झाली काय? नाही! भूक थांबली काय? नाही! पण मन असंतुष्ट झाले. ते सुखी नाही, ते दुःखी आहे. क्षुब्ध आहे. ते क्षुब्ध असताना शरीर स्तरावरच्या सुखाचा आनंद घेता येत नाही. कारण मनाचे सुख अधिक उन्नत आहे.


बुद्धीचे सुख हे त्यापेक्षा उच्च स्तराचे असते. रात्री प्रयत्न केला व एखादे सहजपणे न सुटणारे गणित सोडविले, तर आनंदाची उर्मी येते. तहानभूक विसरून मनुष्य एखाद्या विषयात बुडून जातो. त्यावेळचा आनंद अद्भुत असतो. कवी एखादी कविता लिहितो, चित्रकार सुंदर चित्र निर्माण करतो. ते पूर्ण झाल्यानंतरचा आनंद हा निर्मितीचा (creation) आनंद असतो.

सोने शुद्ध कि अशुद्ध कसे ओळखावे ही समस्या राजाने आर्किमिडीज समोर मांडली. दिवसभर विचार करकरून थकलेला आर्किमिडीज तोच विचार डोक्यात घेऊन रात्री झोपला व दुसऱ्या दिवशी स्नानासाठी टब मध्ये उतरला असताना त्याच्या डोक्यात एक कल्पना स्फुरली. तेव्हा हर्षातिरेकाने वेडा होऊन तो ‘युरेका-युरेका’ असे ओरडत धावत सुटला. अंगावरती वस्त्र नाही, ओले अंग पाण्याने निथळत आहे. रस्त्यावरील लोक ह्या ध्यानाकडे बघून आपसात हसत आहेत. प्रतिष्ठा धुळीला मिळते आहे. कशाची सुद्धा पर्वा न करता आर्किमिडीज धावत होता. केव्हा एकदा एकदा राजाला भेटून हि युक्ती सांगतो. असे त्याला झाले होते. हा असतो बौद्धिक आनंद. तो शरीर व मनापेक्षा श्रेष्ठ प्रतीचा असतो.

प्रसूतीच्या कळा सोसल्यानंतर बाळाच्या मुखाकडे पाहून झालेला मातेला आनंद हा या सर्व आनंदाच्या पलीकडला असतो. शरीर तर पीडेने कष्टात असते. त्या वेदनेमुळे मन-बुद्धी विचारांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यानंतर आपण ‘आई’ झालो याचा आनंद! हा आत्मिक आनंद असतो. हा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. देशासाठी हसतमुखाने फासावर चढणाऱ्या क्रांतिकारकांच्या चेहऱ्यावरचा आनंद. शरीर थोड्याच वेळात आत्यंतिक पीडा देऊन होणार शांत होणार असतानासुद्धा झालेला हा आनंद हा आत्मिक आनंद असतो. इतर सर्व सुखे यापुढे फिकी वाटतात. मनुष्य उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेला; याचा अर्थ तो वरच्या सुखाच्या पाय-या चढत गेला. त्याची गोडी त्याला लागली . त्या सुखापुढे निन्म स्तराची सुखे त्याला गौण वाटू चालली.

जनसामान्यांचे जीवन शारीरिक स्तराच्या सुखावरच अडकते. 'आहार- निद्रा, भय, मैथुन' हेच त्यांचे जीवन असते. खाण्यासाठी जगणारे बरेचजण असतात. अशा व्यक्तींना मृत्यू अत्यंत दुःख:दायक वाटतो. भयाण वाटतो. त्यापेक्षा वरच्या स्तरावर पोचलेले समाजसेवा करणारे, दुसऱ्यांसाठी झिजणारे; तुलनेने शांतपणे मृत्यूचे स्वागत करतात. कला, कविता, साहित्य यांचं आस्वाद घेत, बौद्धिक आनंद उपभोगणारे मृत्यूचे प्रसन्न मनाने स्वागत करतात. अटलजींच्या कवितेची एक ओळ आहे. ‘अंतिम दस्तक पर खुद दरवाजा खोले’..... तर उन्नत होत होत सत्-चित्-आनंद अवस्थेला पोचलेल्या व्यक्तीला जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे उत्सव असतो. त्याला आनंद होतो हे म्हणण्यापेक्षा तो आनंदमय होऊन जातो असे म्हणणे सुयोग्य ठरेल.

ह्या चिर आनंदमय अवस्थेकडे संकेत करणारे सुख हे इंद्रिय-विषयांच्या संयोगातून शारीरिक स्तरावर निर्माण होणारे सुख असते. हे सुख क्षणिक असते. तरीही ते सत्-चित्-आनंद अवस्थेची एक झलक दाखवते. मनुष्याला क्षणमात्र त्या उंचीवर पोचवते. पुन्हा खाली आणते. अतृप्ती वाढवते. मनुष्य तेच तेच सुख घेण्यास चटावतो. हे वर खाली येणे सुरु राहते. सततची अतुप्तीच इंद्रिय-विषयांच्या संयोगातल्या सुखातून नशिबात येते. वास्तविक तो क्षण काय आहे हे समजून घेतले पाहिजे.

सुखाचा क्षण म्हणजे व्यावहारिक स्तरावर गुंतून जाणे असे असते. मानसिक स्तरावर भान हरपणे असते आणि आध्यात्मिक स्तरावर अहंकार-रहित होणे असते. मनुष्याचे ‘मी’पण क्षणार्धासाठी लुप्त होते. तो विराटाशी एकाकार होतो. त्याला सुखानुभूती म्हणतात. गाढ झोपेत सुख मिळते. मनुष्य म्हणतो छान झोप झाली. खूप मजा आली. तू तर झोपला होतास मग मजा कुणास आली? मजा माझ्यातल्या सुप्त ‘मी’ला आली.

जसे जसे मनुष्याला ह्या उन्नत अवस्थांचा बोध होईल, सुखाची खरी गुरुकिल्ली सापडेल तसे तसे निन्म स्तरावरील सुखाच्या लालसा गाळून पडतील. त्यांचे दमन करावे लागणार नाही. त्या गळून पडतील. कमीत कमी हे लक्षात आले तरी ह्याच जन्मी सर्व भोगून घ्यायची वखवख थांबेल. मनुष्य शांत होत जाईल. जीवनाकडे संतुलित दृष्टीने पाहू शकेल. जीवनाचे सार केवळ अर्थ व काम न राहाता धर्म व मोक्षाच्या आधारावर तो स्थिर होईल. या दिशेने मनुष्याला नेण्यासाठी चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना भारतीय नीतिशास्राने मांडली. ते चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे काय ते पुढे पाहू. (पुढे क्रमशः)

भारतीय न्याय व्यवस्थेतेने आत्मपरीक्षण करावे - अनिल जवळेकर



जे  घडू नये ते घडले. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील काही ठराविक न्याय‍धीशांनी मुख्य न्याय‍धीशांच्या कार्यप्रणाली बद्दल जाहीर तक्रार केली. एवढेच नाही तर त्यांनी न्याय व्यवस्था निरपेक्ष नसेल तर भारतीय लोकशाही धोक्यात येईल असेही सांगीतले. भारतीय स्वातंत्र्या नंतरच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असल्याचे बोलले जाते.
भारतीय जनतेचा विश्वास न गमावलेली संस्था म्हणून भारतीय न्याय व्यवस्थेचा लौकिक आह. त्यामुळे न्याय व्यवस्थेतच न्याय‍धीशांत दुफळी व्हावी व त्यांनी त्याची जाहीर वाच्यता करावी हे निराशाजनक आहे. याला राजकारणाचा वास येणे साहजिक आहे. कारण  काही न्याय‍धीशांच्या घरी राजकीय नेते भेटी-गाठी करत असल्याची बाब पुढे आली आहे. न्याय‍धीशांनी उपलब्ध घटनात्मक मार्ग न पत्करता पत्रकार परिषद घेऊन आपली तक्रार केली हे न समजण्या सारखे आहे.
भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचा त्यांचा मुद्दाही न पटणारा आहे. न्याय व्यवस्था व लोकशाहीचा तसा अर्था-अर्थी काही संबंध असेल असे वाटत नाही कारण न्यायाची कल्पना लोकशाही अस्तित्वात येण्या पूर्वीची आहे वा असेही म्हणता येईल कि राज्यव्यवस्था कुठलीही असली तरी न्याय व्यवस्था  नि:पक्ष व न्याय्य असू शकते कारण ती मुळात न्याय देणाऱ्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.  राज्यव्यवस्था कशीही असली तरी न्याय दिला जावू शकतो हे मान्य व्हावे. महाराष्ट्रातील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे उदाहरण देता येईल ज्यांनी पेशव्याच्या विरुद्ध निकाल दिला होता. त्यामुळे राज्यव्यवस्थेचा दबाव स्वीकारणे वा न स्वीकारणे हे सर्वस्वी न्याय‍धीशांच्या चारित्र्य व सद्सदविवेक बुद्धीवर अवलंबून असते असे म्हणता येते. भारतीय लोकशाही  टिकवण्याचे काम न्याय व्यवस्थेचे नाही तर भारतीय जनतेने स्वीकारलेल्या राज्य पद्धतीने व मान्य केलेल्या कायद्यानुसार राष्ट्रहित जपत सामन्याला न्याय देणे हे आहे हे समजून घेण्याची गरज आहे.  
एवढे खरे की गेल्या साठ-सत्तर वर्षात भारतातील सर्वच संस्था कमी अधिक प्रमाणात आपले स्वत्व व जनमानसातील आपले स्थान गमावून बसल्या आहेत. त्यात फक्त न्यायव्यवस्थेने आपले स्वत्व व स्थान  जपले होते तेही आता डळ-मळताना दिसत आहे. भारतीय समाज व राजकारणाची दशा व दिशा लक्षात घेतल्यास न्यायव्यवस्था हे स्वत्व व  स्थान किती काळ टिकवू शकेल असे वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयातील हे बंड समोर आले आहे.
या ठिकाणी सर्वानीच हे लक्षात घेण्याची गरज आहे की राज्यव्यवस्था ( मग ती लोकशाही असो का हुकुमशाही किंवा इतर कोणती शाही)  ही  नेहमीच न्यायव्यवस्थेवर वा किंबहुना सर्वच सामाजिक संस्थांवर दबाव आणून आपल्या तंत्राने वागायला लावणारी संस्था आहे. तशी ती वागू नये म्हणून जे प्रयत्न झाले त्यात नियमानुसार वागण्याचे बंधन मुख्य मानता येईल ज्याला आपण आज राज्यघटना म्हणतो. राज्यघटनेतील पद्धती सर्वांनीच पाळणे गरजेचे असते. पण असे होत नाही हे अशा बंडखोरी मागचे महत्वाचे कारण म्हणता येईल. तसा भारतीय लोकशाहीत  दबावाचे तंत्र आणीबाणीचं काळात व त्यानंतर विशेषत्वाने सुरु झाले असे म्हणायला जागा आहे. त्याच काळात एका न्याय‍धीशांनी committed judiciary ची कल्पना मांडली होती. ही कल्पना सरकार धार्जिणी होती त्यामुळे अशा कल्पना मांडणारे व राज्यव्यवस्थेचे मांडलिक होणारे न्याय‍धीश न्यायव्यवस्थेच्या अधोगतीला जबाबदार आहेत असे मानले पाहिजे.
पं. दीनदयाळजींनी १९६५ सालीच एकात्म मानव दर्शन मांडताना भारतीय राजकीय पक्ष पाळत असलेल्या मूल्यांबदल व त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते व अशा वातावरणात प्रगती कशी होणार ह्या बद्दल चिंता व्यक्त केली होती.  सर्वच समाजघटक राष्ट्रहित हे प्रमुख मानतील व सामाजिक सुचारित्रता पाळतील तर बरेचसे असे वाद होणार नाहीत अशी त्यांची भूमिका होती. निश्चितच ज्या न्यायाधीशांनी बंडखोरीची भाषा केली व ज्या राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलला त्यांनी राष्ट्रहित जपले नाही असेच म्हणणे भाग आहे. त्यांनी देशहितासाठी आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.