सुलभ एकात्म मानव दर्शन – 08 (क्रमशः) - विनय पत्राळे


4 सुखाची संकल्पना .......

मनुष्य सकाळपासून रात्रीपर्यंत कामांमध्ये, अनंत खटपटींमध्ये गुंतलेला असतो. सर्वच प्राणिमात्र ज्या विविध गतिविधी करत असतात त्या सर्वांचे सारांश असा एकमात्र उद्देश कोणता असेल तर तो सुखाची प्राप्ती हा आहे. दगड फोडणाऱ्या पाथरवटापासून तर मोठ्या कारखानदारापर्यंत आणि जमिनीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर मोठ्या राजकीय नेत्यापर्यंत सर्वांच्या जीवनाचा धावपळीचा एकमेव उद्देश हा सुखाची प्राप्ती हा आहे. सुख म्हणजे काय, सुख होते म्हणजे काय होते, आनंद होतो म्हणजे नक्की काय असते हा चिंतनाला विषय आहे.

सुख म्हणजे काय ? अनुकूल संवेदना म्हणजे सुख. जे केल्याने अनुकूल, आवडणाऱ्या संवेदना निर्माण होतात, ते म्हणजे सुख व जे केल्याने प्रतिकूल न आवडणाऱ्या संवेदना निर्माण होतात ते म्हणजे दुःख:!

सुखाचे वर्णन करणे कठीणच आहे. सुख होते म्हणजे नक्की काय होते? मला गुलाबजाम आवडतात, ते खाल्ल्याने मला सुख मिळते. किशोरकुमारचे गाणे ऐकून मिळते, रातराणीचा सुगंध घेतल्याने मिळते. सूर्यास्ताची शोभा पाहिल्याने मिळते. नरम मुलायम गादीवर गाढ झोपल्याने मिळते.

जीभ, कान, नाक, डोळे, त्वचा हि इंद्रिये आहेत आणि शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध हे विषय आहेत. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यामुळे जी अनुकूल संवेदना निर्माण होते ते म्हणजे सुख. हे सुख 'मला' होते. हा आनंद 'मला' होतो.

पण मग ‘मी’ कोण आहे?

आपण म्हणतो “आज सकाळी ‘मी’ स्नान करून नाश्ता केला”. येथे मी म्हणजे आपण शरीराशी एकरूप आहोत.
“रेल्वे अपघाताची बातमी वाचून ‘मी’ विषण्ण झालो”. येथे मी म्हणजे आपण मनाशी एकरूप आहोत.

“पासपोर्ट कसा काढायचा याची ‘मी’ त्याला कल्पना दिली” या वाक्यात मी स्वात:ला बुद्धी समजून बोलतोय.

“माझ्यातला ‘मी’पणा गेला तर तो (परमात्मा) भेटेल”. या वाक्यात मी म्हणजे अहंकार आहे.

गीतेत कृष्ण म्हणतात “बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन”. म्हणजे माझे व तुझे यापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. यातला ‘मी’ म्हणजे स्वात:चा चैतन्य समजून केलेला उल्लेख आहे.

हे मनुष्याच्या अस्तित्वाचे शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चैतन्य असे विभिन्न होत जाणारे आविष्कार आहेत व सुखाच्या पायऱ्या या सर्व आविष्कारांवर अधिकाधिक उन्नत होत जातात. वरच्या स्तराचे सुख माणसाला अधिक प्रिय असते. त्याची किंमत देऊन खालच्या स्तराचे सुख मिळाले तर ते त्याला नको असते.

उदाहरणार्थ जेवल्याने सुख मिळते. पण कोणी शिव्या देत देत अन्न वाढले तर सुख मिळेल काय? नाही! शिव्या दिल्याने काय झाले? अन्नाची चव कमी झाली काय? नाही! भूक थांबली काय? नाही! पण मन असंतुष्ट झाले. ते सुखी नाही, ते दुःखी आहे. क्षुब्ध आहे. ते क्षुब्ध असताना शरीर स्तरावरच्या सुखाचा आनंद घेता येत नाही. कारण मनाचे सुख अधिक उन्नत आहे.


बुद्धीचे सुख हे त्यापेक्षा उच्च स्तराचे असते. रात्री प्रयत्न केला व एखादे सहजपणे न सुटणारे गणित सोडविले, तर आनंदाची उर्मी येते. तहानभूक विसरून मनुष्य एखाद्या विषयात बुडून जातो. त्यावेळचा आनंद अद्भुत असतो. कवी एखादी कविता लिहितो, चित्रकार सुंदर चित्र निर्माण करतो. ते पूर्ण झाल्यानंतरचा आनंद हा निर्मितीचा (creation) आनंद असतो.

सोने शुद्ध कि अशुद्ध कसे ओळखावे ही समस्या राजाने आर्किमिडीज समोर मांडली. दिवसभर विचार करकरून थकलेला आर्किमिडीज तोच विचार डोक्यात घेऊन रात्री झोपला व दुसऱ्या दिवशी स्नानासाठी टब मध्ये उतरला असताना त्याच्या डोक्यात एक कल्पना स्फुरली. तेव्हा हर्षातिरेकाने वेडा होऊन तो ‘युरेका-युरेका’ असे ओरडत धावत सुटला. अंगावरती वस्त्र नाही, ओले अंग पाण्याने निथळत आहे. रस्त्यावरील लोक ह्या ध्यानाकडे बघून आपसात हसत आहेत. प्रतिष्ठा धुळीला मिळते आहे. कशाची सुद्धा पर्वा न करता आर्किमिडीज धावत होता. केव्हा एकदा एकदा राजाला भेटून हि युक्ती सांगतो. असे त्याला झाले होते. हा असतो बौद्धिक आनंद. तो शरीर व मनापेक्षा श्रेष्ठ प्रतीचा असतो.

प्रसूतीच्या कळा सोसल्यानंतर बाळाच्या मुखाकडे पाहून झालेला मातेला आनंद हा या सर्व आनंदाच्या पलीकडला असतो. शरीर तर पीडेने कष्टात असते. त्या वेदनेमुळे मन-बुद्धी विचारांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यानंतर आपण ‘आई’ झालो याचा आनंद! हा आत्मिक आनंद असतो. हा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. देशासाठी हसतमुखाने फासावर चढणाऱ्या क्रांतिकारकांच्या चेहऱ्यावरचा आनंद. शरीर थोड्याच वेळात आत्यंतिक पीडा देऊन होणार शांत होणार असतानासुद्धा झालेला हा आनंद हा आत्मिक आनंद असतो. इतर सर्व सुखे यापुढे फिकी वाटतात. मनुष्य उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेला; याचा अर्थ तो वरच्या सुखाच्या पाय-या चढत गेला. त्याची गोडी त्याला लागली . त्या सुखापुढे निन्म स्तराची सुखे त्याला गौण वाटू चालली.

जनसामान्यांचे जीवन शारीरिक स्तराच्या सुखावरच अडकते. 'आहार- निद्रा, भय, मैथुन' हेच त्यांचे जीवन असते. खाण्यासाठी जगणारे बरेचजण असतात. अशा व्यक्तींना मृत्यू अत्यंत दुःख:दायक वाटतो. भयाण वाटतो. त्यापेक्षा वरच्या स्तरावर पोचलेले समाजसेवा करणारे, दुसऱ्यांसाठी झिजणारे; तुलनेने शांतपणे मृत्यूचे स्वागत करतात. कला, कविता, साहित्य यांचं आस्वाद घेत, बौद्धिक आनंद उपभोगणारे मृत्यूचे प्रसन्न मनाने स्वागत करतात. अटलजींच्या कवितेची एक ओळ आहे. ‘अंतिम दस्तक पर खुद दरवाजा खोले’..... तर उन्नत होत होत सत्-चित्-आनंद अवस्थेला पोचलेल्या व्यक्तीला जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे उत्सव असतो. त्याला आनंद होतो हे म्हणण्यापेक्षा तो आनंदमय होऊन जातो असे म्हणणे सुयोग्य ठरेल.

ह्या चिर आनंदमय अवस्थेकडे संकेत करणारे सुख हे इंद्रिय-विषयांच्या संयोगातून शारीरिक स्तरावर निर्माण होणारे सुख असते. हे सुख क्षणिक असते. तरीही ते सत्-चित्-आनंद अवस्थेची एक झलक दाखवते. मनुष्याला क्षणमात्र त्या उंचीवर पोचवते. पुन्हा खाली आणते. अतृप्ती वाढवते. मनुष्य तेच तेच सुख घेण्यास चटावतो. हे वर खाली येणे सुरु राहते. सततची अतुप्तीच इंद्रिय-विषयांच्या संयोगातल्या सुखातून नशिबात येते. वास्तविक तो क्षण काय आहे हे समजून घेतले पाहिजे.

सुखाचा क्षण म्हणजे व्यावहारिक स्तरावर गुंतून जाणे असे असते. मानसिक स्तरावर भान हरपणे असते आणि आध्यात्मिक स्तरावर अहंकार-रहित होणे असते. मनुष्याचे ‘मी’पण क्षणार्धासाठी लुप्त होते. तो विराटाशी एकाकार होतो. त्याला सुखानुभूती म्हणतात. गाढ झोपेत सुख मिळते. मनुष्य म्हणतो छान झोप झाली. खूप मजा आली. तू तर झोपला होतास मग मजा कुणास आली? मजा माझ्यातल्या सुप्त ‘मी’ला आली.

जसे जसे मनुष्याला ह्या उन्नत अवस्थांचा बोध होईल, सुखाची खरी गुरुकिल्ली सापडेल तसे तसे निन्म स्तरावरील सुखाच्या लालसा गाळून पडतील. त्यांचे दमन करावे लागणार नाही. त्या गळून पडतील. कमीत कमी हे लक्षात आले तरी ह्याच जन्मी सर्व भोगून घ्यायची वखवख थांबेल. मनुष्य शांत होत जाईल. जीवनाकडे संतुलित दृष्टीने पाहू शकेल. जीवनाचे सार केवळ अर्थ व काम न राहाता धर्म व मोक्षाच्या आधारावर तो स्थिर होईल. या दिशेने मनुष्याला नेण्यासाठी चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना भारतीय नीतिशास्राने मांडली. ते चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे काय ते पुढे पाहू. (पुढे क्रमशः)

No comments:

Post a Comment