वर्तणुकीचे अर्थशास्त्र - अनिल जवळेकर

अमेरिकेचे अर्थतज्ञ श्री रिचर्ड थेलर यांना त्यांनी वर्तणुकीच्या अर्थशास्त्रात केलेल्या कामगिरीबद्दल नुकतेच नोबेल पारितोषक देण्यात आले. आधुनिक पाश्चात्य अर्थशास्त्रात सामान्यपणे स्वार्थ साधण्याच्या वर्तणुकीला मान्यता आहे. अर्थव्यवहारातील मानव हा समजदारीने आपला स्वार्थ साधतो ह्या गृहितकावर अर्थशास्त्र उभे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. थेलर ह्यांचे वर्तणुकीचे अर्थशास्त्र हे मानायला तयार नाही. त्यांच्या मते वास्तविक व्यवहारात मानव हा असा समजदारीने वागत नाही. बऱ्याच वेळा खूप पर्याय दिले तर त्याच्या हातून चूक होण्याचीच शक्यता असते म्हणून पर्याय देताना नीट विचार झाला पाहिजे. त्यातून इष्ट पर्यायाकडे लोकांना हळुवारपणे ढकलावे (nudging), अशाने लोक इष्ट निर्णय घेण्याची शक्यता वाढते असे मानणारे हे वर्तणुकीचे अर्थशास्त्र आहे. एका दृष्टीने भारतीय चिंतनाच्या काहीसा जवळ जाणारा हा पैलू आहे असे म्हणता येईल.

भारतीय चिंतन मानवाला पूर्णपणे स्वार्थाच्या आधीन मानत नाही तर अज्ञानाच्या आधीन मानते. अज्ञान दूर झाले तर मानव आपले हित जाणेल व तेच समाज धारणेत उपयोगी ठरेल. त्यामुळे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा भारतीय चिंतनाचा आग्रह आहे. अर्थात अर्थशास्त्रात पर्यायांची माहिती पुरवली म्हणजे अज्ञान दूर होते व विक्रेत्याची जबाबदारी संपली असे मानले जाते व जाहिरातबाजीने मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय चिंतन ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीला समाजहिताची दृष्टी देते व समाज धारणेचा मार्ग खुला करते.

पाश्चिमात्य अर्थशास्त्र व्यक्तीला स्वार्थी बनवते व सरकार कडून समाजधारणेची व समाजहिताची अपेक्षा ठेवते. कंपन्यांना इच्छित निर्णय लोकांनी घ्यावेत यासाठी उपयोगी पडणारे वर्तणुकीचे अर्थशास्त्र समाजधारणेत तोटके पडण्याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय मानसशास्त्राची जोड दिली तर कदाचित ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. वर्तणूक प्रभावित करणे फक्त आर्थिक क्षेत्रातच आवश्यक नसते तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे हे मान्य व्हावे. आणि त्यासाठी मानव मानसिकदृष्ट्‍या प्रगल्भ होणे गरजेचे आहे जेणे करून व्यक्तिगत स्वार्थापेक्षा त्याला समाजहित महत्त्वाचे वाटले पाहिजे. यासाठी एकात्मतेची संकल्पना सतत पुढे ठेवली पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ साधल्याने मानव फक्त भोगवादी होत जाईल व ते समाज धारणेत बाधा टाकणारे असेल. एकात्मतेच्या जाणीवेतून आलेली प्रगल्भता सर्वांचे हित साधणारी असेल व समाजधारणेत उपयुक्त ठरेल असे म्हणता येते. वर्तणुकीचे अर्थशास्त्र भारतीय चिंतनाचा आधार घेत वाटचाल करेल तर ते निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.

9 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. भारतीय तत्व चिंतन जर एकात्मतेचा इतका विचार करीत अस्ते तर मग भारतीय समाजात एकात्मता का दिसत नाही? जाती-पातीमध्ये विभागलेल्या समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवण्यात कसले आले आहे समाज चिंतन एकात्मतेचे? भारतीय मानसिक शास्त्र म्हणजे काय? कोण आहेत हे मानस शास्त्रज्ञ ?
    भारतीय अर्थशास्त्र म्हणजे तरी काय? भारतीय समाज इतका अप्रगल्भ का? त्यामुळे आप्लाला लेख मला अजिबात आवडला नाही आणि त्यातील आपले विचार पटणे शक्यच नाही. एक स्त्री म्हणून तर ते मान्य होणारे नाहीत तर दालीत्तांना कसे मान्य व्हावेत? प्रत्येक पाश्चात्य ज्ञान आपल्याला म्हणजे भारतीयांना होतेच असे म्हणणे हे खोटेपणाचे आणि दांभिकपणाचे लक्षण आहे. आपण विचार करावा...

    ReplyDelete
    Replies
    1. आपण लेख वाचून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला परिचय सुधारक असा आहे त्यामुळे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे माहित असणे संभवनीय आहे. देशातील सामाजिक परिस्थितीबद्दल आपली चिंता वाजवीच आहे. भारतीय समाजातील एकात्मता अजूनही टिकून आहे याचे प्रत्यंतर आपणही कुठे न कुठे घेत असालच. एकात्मतेच्याच आधारे युरोप एवढा आपला भारत देश त्याच्या विविधतेसह एक जीवमान राष्ट्र म्हणून खंबीरपणे उभा आहे असे आम्हाला वाटते. आपली मते वेगळी असू शकतात. एकात्म मानव दर्शनाच्या दृष्टीकोनातून समकालीन वास्तवाचे अवलोकन, आकलन व विश्लेषण तसेच संभाव्य सुयोग्य दिशेचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्लॉग हे त्यासाठी एक माध्यम आहे. एकात्मता काय आहे वा एकात्म मानव दर्शन, भारतीय मानस शास्त्र वा भारतीय अर्थशास्त्र काय आहे ह्यासाठीच याच ब्लॉग मधील इतर लेख व लिंक पाहल्यास तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही मांडलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि उत्तराचा शोध आपणा सर्वांना मिळूनच घ्यायचा आहे अशी आमची भूमिका आहे. वाचकाचा सहभाग व सहकार्य यात गृहीत आहे. निश्चितच आज जो वंचित, पीडित आहे त्याला मदतीचा हात देऊन सन्मानपूर्वक स्वावलंबी कर्तृत्वान बनण्यास मदत करणे किंवा किमान जे असे काम करीत आहेत त्यांना सहाय्य करणे हे आपले कर्तव्य आहे. जुन्या गोष्टी उगाळल्याने क्षोभ वाढतो व वंचित, पीडितांचा शक्ती क्षय होतो हे आपणही मान्य कराल. एकात्मता, समता, समरसता, समन्याय, सर्वांना सन्मान व संधी यांचा व अशा सकारात्मक भावांचा परिपोष करीत रहाण्यानेच ते व्यवहारात आणखी प्रत्यक्षपणे उतरतील व तऴागाऴातील माणसांनाही जीवनात सुख, समाधान इ. लाभेल असे आम्हाला वाटते. आपण सर्वांनीच या साठी प्रयत्न केले पाहिजेत एवढेच म्हणावेसे वाटते. धन्यवाद-अनिल जवळेकर

      Delete
  3. The views expressed in the article are correct. The common man has to be patiently and skillfully directed towards the right path. However this requires that the Guru ( The Director) has to be extremely selfless. And that is where the market driven economy in western countries fail.

    ReplyDelete
  4. Good well meaning thought. Opinion makers and the vehicle i.e. media in our society yet to arrive at commonly beneficial Universal view that could guide everyday consumption, appropriately differentiated for different groups, and thereby define economic activity.

    ReplyDelete