पं. दीनदयाळ उपाध्याय - विनय सोमण

पंडित दीनदयाळ भगवतीप्रसाद उपाध्याय (जन्म 1916 - मृत्यू 1968) हे आधुनिक भारतातील एक थोर विचारक होत ज्यांनी "एकात्म मानव दर्शन" ह्या विषयाची मांडणी केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा पूर्वीचा अवतार मानल्या जाणाऱ्या "भारतीय जनसंघाचे" कार्यकर्ता होते. सांप्रतचे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे (25 सप्टें. 2016 ते 25 सप्टें. 2017) वर्ष आहे.



कुशाग्र बुद्धी व तरल संवेदना घेऊन दीनदयाळजी राजस्थानातील धनकिया या छोट्या गावात आजोळी रामप्यारी यांच्या पोटी जन्मले. लहान वयातच माता व पित्याचं छत्र हरपल्यामुळे राजस्थानातील सीकर येथे आपल्या मामांकडे शिक्षणासाठी गेले. शालेय जीवनात अनेक पुरस्कार व शिष्यवृत्ती प्राप्त करीत त्यांनी कानपूर येथून B.A. संस्कृत व आग्रा येथून सुवर्णपदकासह M.A. English पूर्ण केले. तद्नंतर B.Ed. व M.Ed. ह्या परीक्षासुद्धा उत्तीर्ण केल्या. १९३७ साली कानपूर येथेच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. पू. डॉ. हेडगेवारांशीही कानपूर येथेच त्यांची गाठ-भेट झाली आणि अनेकांचे जे होत असे तेच त्यांचेही झाले. आपले जीवनसर्वस्व संघकार्याच्या माध्यमातून मातृभूमीच्या सेवेसाठी देण्याचे त्यांनी ठरवले.



तरुणांनी आपल्या क्षमतेचा उपयोग मातृभूमीच्या सेवेसाठी केला पाहिजे, अशी त्यांची नेहमी तळमळ असायची. एकदा कानपूर मधल्या एका संघशाखेची जबाबदारी श्री. शांतीदेवांनी घ्यावी असे ठरले. पण शांतीदेवांचा बासरी शिकण्याचा वर्ग व शाखेची वेळ एकच असल्याने "आपल्याला शाखा चालवणे जमणार नाही" असे सांगायला शांतिदेव संघ कार्यालयात गेले. तेव्हा पंडितजी आपले कपडे धूत होते. शांतीदेवांचे बोलणे ऐकल्यावर पंडितजी शांतपणे म्हणाले, "बरोबर आहे शांती. तू बासरी शिकच. जेव्हा देश जळेल तेव्हा कोणीतरी बासरी वाजवणारा लागेलच ना!"



पहिल्या संघबंदीनंतर संसदेत संघाची बाजू मांडणारे कोणीतरी असावे, असा विचार पुढे आला. त्याचवेळी पं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. "श्री" गुरुजींच्या (रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंघचालक) बरोबर त्यांची चर्चा झाल्यावर "श्री"गुरुजींनी दीनदयाळजी, अटलजी व नानाजी देशमुख ह्या संघ प्रचारकांना जनसंघाच्या कामात सहभागी होण्यास सांगितले. दीनदयाळजींची तल्लख बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता, अजातशत्रु स्वभाव यांमुळे श्यामाप्रसाद अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणत, "असे आणखी दोन दीनदयाळ मला मिळाले तर देशाचे राजकीय भविष्य मी बदलून टाकीन."



पंडितजींनी जनसंघाच्या माध्यमातून मूल्याधिष्ठीत राजकारणाला भारतीय वातावरणात स्थान प्राप्त करून दिले. एकदा लखनऊ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी चालू होती. एका ब्राह्मणबहुल मतदारसंघात दीनदयाळजींनी उमेदवारी अर्ज भरावा असे सुचवले गेले. "पंडितजी, तुमच्या नावाच्या मागे 'पंडित' आणि पुढे 'उपाध्याय'. ह्या मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे." पंडितजी उत्तरले, "तसे झाले तर मी विजयी होईन, पण जनसंघ पराभूत होईल." कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनात शुचिता आणि पावित्र्य राखण्यावर त्यांचा विशेष भर असे. एकदा एकाने प्रश्न विचारला की, "निवडणुकीत विजयी झालेल्या जनसंघाच्या उमेदवारांनी जर भ्रष्टाचार केला तर?". पंडितजी विनाविलंब उत्तरले, "असे झाले तर मी तो भ्रष्ट जनसंघ विसर्जित करीन आणि नवीन पक्ष निर्माण करीन." निवडणुकीतील जय-पराजय त्यांच्यासाठी फार महत्वाचे नव्हते. कारण "सत्ता हे 'अंत्योदय' साध्य करण्याकरता एक साधनमात्र आहे" असे ते मानीत. जेव्हा सत्ता हे साधन न रहाता, सत्ता हेच साध्य बनते, तेव्हाच अध:पतनाला सुरवात होते.



"एकात्म मानव दर्शनाची" मांडणी हे तत्वज्ञ दीनदयाळजींचे सर्वात मोठे योगदान होय. आजच्या जगातील सर्व मानवी प्रश्नांना सोडवण्याचे सामर्थ्य ह्या दर्शनात आहे. "अंत्योदयाची" इच्छा बाळगणाऱ्यांनी ह्या तत्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करावा. १९६५ मध्ये तत्कालीन जनसंघाने ह्या "दर्शनाचा" जनसंघाची नीती म्हणून स्वीकार केला. ह्या "दर्शनाचा" मला समजलेला अर्थ असा -

"मनुष्य किंवा कोणीही सजीव-निर्जीव वस्तू ही संपूर्ण विश्वाचा एक घटक आहे. ह्या विश्वाशिवाय व त्यातील अन्य घटकांशिवाय व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व अशक्य आहे. जसा मी एक व्यक्ती ह्या विश्वाचा घटक आहे, तसेच समोरच्या रस्त्यावरचा तो भिकारी किंवा त्याच्या बाजूला झोपलेला कुत्रासुद्धा ह्या विश्वाचे तितकेच महत्वाचे घटक आहेत. एका समान एकत्वाच्या सूत्राने सर्व चराचर बांधले गेले आहे. त्याला आत्मा वा ब्रह्म म्हटले आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, विश्व, ब्रह्माण्ड अशा सर्वांना जोडणारे हेच एक समान सूत्र आहे. हे भारतीय चिंतनाचे सार आहे. त्यामुळेच मानवी समस्यांचा विचार तुकडया-तुकड्यांत न करता, ह्या संपूर्ण विश्वाच्या परिप्रेक्ष्यात करणे आवश्यक आहे." जिज्ञासूंनी हा विषय स्वतः: मुळातूनच वाचणे अधिक श्रेयस्कर ठरेल.



पंडितजी हाडाचे कार्यकर्ता होते. ते "श्री"गुरुजींना म्हणत, "गुरुजी, मला संघकामच मनापासून आवडते. तुम्ही मला ह्या राजकारणाच्या धकाधकीत का बरे अडकवले आहे?". "श्री"गुरुजी म्हणत, "अहो, तुम्हाला राजकारणात रस नाही म्हणूनच तुम्हाला ते काम दिले आहे. जेव्हा तुम्हाला राजकारण आवडायला लागेल, तेव्हा मी तुम्हाला पुन्हा संघकामात आणीन."

१९५१ ते १९६८ अशा १७ वर्षांच्या कालावधीत पंडितजींनी जनसंघात "ह्ये हृदयींचें, ते हृदयीं" करून आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते निर्माण केले. काँग्रेस च्या हिंदूविरोधी व प्रतिगामी राजकारणाला एक सशक्त पर्याय निर्माण करून भारतीय राजकारणाला एक नवीन दिशा देण्याच्या स्थितीत जनसंघ पोहोचत असतानाच "अजातशत्रू" दीनदयाळजींचा ११ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराई स्थानकाजवळ रेल्वेच्या डब्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचे शव रेल्वेच्या रुळांवरून प्राप्त झाले. त्यांची हत्या करण्यात आली हे उघडंच होते, पण त्याची योग्य प्रकारे चौकशी झाली नाही. काही नेत्यांच्या हत्यांवर खेळले गेलेले गलिच्छ राजकारण आपल्या देशाने पाहिले आहे, आणि काही अशा नेत्यांच्या हत्या दडपल्या गेलेल्यासुद्धा पाहिल्या आहेत. दीनदयाळजींच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !!!

1 comment:

  1. "एकात्म मानव दर्शनाची" मांडणी आणि हिन्दू धर्माचा पाया असलेल्या वेदांमध्ये काहीही फरक नाही. दुर्दैवाने, आजची सामाजिक मनस्थिती हे तत्व न समजावून घेता केवळ हिंदू या शब्दाविरोधात तसेच हिंदूंच्या विरोधात बोलायचे अशी झाली आहे.
    यामागे भारतातील विशिष्ट राजकीय फायद्यामागे धावणारे पक्ष आणि भारताबाहेरील घातक शक्तींच्या कृती / कारवायांचा विघातक हेतू आहे.
    त्यामुळे, एकात्म मानव दर्शन भारतीयांच्या मनात ठसवून मनपरिवर्तन करणे हे समाजप्रवृत्त / समाजाच्या गरजांपैकी योग्य त्या गरजा पूर्ण करीत करीतच शक्य आहे.
    यासाठी सुचलेले काही उपाय:
    १) भोगवादी आणि चंगळवादी विचार, त्यातून मिळणार्‍या शीघ्र नाशवंत वस्तू किंवा सुविधा आणि त्यासाठी व्यक्तीश: होत असलेले प्रयत्न यांचा फोलपणा ध्यानात आणून देणे.
    २) चार पुरुषार्थांचे महत्व आणि त्यांची भौक्तिक, शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील उपयुक्तता समजावून सांगणे.
    ३) कौटुंबिक एकत्रिकरणाचे महत्व, फायदे आणि त्यादिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करणे.
    ४) आजच्या तरुण वर्गासमोर असलेल्या समस्यांविषयी त्यांच्याबरोबर त्यांना समजणार्‍या भाषेत चर्चा करून त्यांवर परिणामकारक उपाय शोधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे.
    - राजेंद्र कोप्पीकर

    ReplyDelete