फुकटेगिरीकडून पुरुषार्थी समाजाकडे - सदाशिव (नाना) लेले

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान केले होते की “जनतेला सर्व फुकट हवे आहे व राजकारणी तर तयारच आहेत... ”. मतदारांचे लाड पुरवण्याची ही वृत्ती खरेच काळजी करण्याइतकी वाढली आहे. फुकटेगिरी हा नेत्यांचा व लाभार्थींचा एक प्रकारे सामाजिक भ्रष्टाचार आहे.

चारित्र्यनिर्माणाच्या ह्या प्रश्नावर सुयोग्य शिक्षण हा एक जगन्मान्य उपाय आहे. कुटुंब, समाज व यांच्या माध्यमांतूनही संस्कार होत असतात. मुळात आईवडिलांच्या गुणसूत्रातूनच व्यक्तीचे गुणसूत्र जन्मते व असे जन्मजात गुण प्रभावी असतात. तरीही वरील तिन्ही गोष्टींतून होणारे बाह्यसंस्कारही तितकेच प्रभावी असतात.

पण आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर शिक्षणातून संस्कार देण्याला भोंगळ सेक्युलरबाजीतून खीळ बसली. पाश्चात्यांचे सर्वकाही स्वीकार्य व आपले पारंपारिक (म्हणजे हिंदूंचे) ते सर्व त्याज्य या सेक्युलर-डाव्या विचाराने राष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातून आजही बाहेर न पडल्यास फार उशीर झालेला असेल.

आपल्यापाशी असलेल्या गुणसूत्र-संस्कार पूंजीतून आजही तर्काधारित विचाराच्या जोरावर चांगले-वाईट योग्य-अयोग्य निवड आपण जितकी करू शकतो तितकी करावी. राजकीय पुढा-यांनी समाजाला फुकटेगिरीच्या मार्गावर लालूच दाखवून नेण्याचे थांबवावे. सर्वच क्षेत्रांतील समाजनेत्यांनी स्वप्रयत्नाने, स्वावलंबनाने, आपल्या पुरुषार्थाने प्रगती करण्याचे संस्कार आवर्जून द्यावेत.

पं. दीनदयाळांनी एकात्म मानव दर्शनाचा मार्ग दाखविला आहे व त्यावर मंत्रीमहाशयांचा विश्वास असावा असे मानण्यास जागा आहे. तेव्हा त्यांनी शिक्षणात सुयोग्य बदल करावेत. उरलेल्या दोन-अडीच वर्षांत सकारात्मक बदल दृश्यमान होतील व त्यांची मतदार मान्यता वाढू शकेल.

स्वावलंबन, आत्मबल व पुरुषार्थप्रवणता दर्शविणारी एक घटना पहा. न्यायमूर्ति रामशास्त्री एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मले. घरच्या गरीबीमुळे मामांच्या घरी आश्रय घेण्याची वेळ लहान वयातच आली. पेशव्यांच्या रमण्यात लहान विद्यार्थ्यांना दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम होता. मामांच्या दडपणामुळे उनाड प्रवृत्तीच्या रामने काही बाही खोटे सांगून दक्षिणा घेतली परंतु नंतर टोचणी लागून ती परत दिली व खरे काय ते सांगीतले. त्यानंतर मात्र त्यांच्यात आमुलाग्र बदल होऊन परिश्रमाने शिक्षण घेऊन ते उच्च पदावर पोहोचले. आईने दिलेले संस्कार वरचढ ठरले हे महाराष्ट्राचे भाग्य.

आपले आई, वडील, शिक्षक यांजकडून मिळणा-या संस्कारांबरोबरच सर्वच क्षेत्रांतील पुढा-यांच्या विचारांचा व वर्तनाचाही परिणाम समाजमानसावर होत असतो. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे नोव्हेंबर 2016 ची नोटबंदी होय. विरोधक, पुढारी, वर्तमानपत्रे, TV चॅनल यांचा टीकेचा भडिमार होऊनही समाज मन स्थिरविचारी राहिले.

आपला समाज लाचार, याचक व फुकट्या मानसिकतेचा न बनता तो पुरुषार्थी बनावा यासाठी नेत्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व सर्व संस्कार माध्यमांनीही काळजी घेतल्यास ते अशक्य नाही.

4 comments:

  1. प्रमोद क्षीरसागर29 June 2017 at 23:47

    विचारांची मांडणी चांगली आहे.पण समाजाला दोष न देता आई आणि दाई च्या मायेने बदल घडविण्याची तयारी करावी लागेल.फुकटे गिरी हा परिणाम आहे.राजा प्रक्रुती रंजनात म्हणजे प्रजानुनय नव्हे.पण लोकानुरंजना च्या धबडक्यात स्वाभिमानी स्वावलंबी सुखी समाधानी संपन्न समाजाची निर्मिती करण्याचे समाजकर्तव्य हे स्वप्नरंजन ठरते.एक हजार वर्षाच्या गुलामगिरीत विकसित केलेल्या अवगुणांचा त्याग जसे खुशमस्करी, तोंडपुजेपणा, लाळघोटेपणा,
    विश्वासघात, लायकी नसताना पदाभिलाषा इ.हे समाजातून घालवून टाकण्याचे काम चिकाटीने दिर्घकाळ करावे लागणार. तशी व्यवस्था उभी करावी लागेल. प्रमोद क्षीरसागर.

    ReplyDelete
  2. ‘जनतेला सर्व फुकट हवे आणि राजकारणी ते द्यायला तयार आहेत’ हे मत तसे बरोबर म्हणता येणार नाही. खरं म्हणजे फुकटे कुणीच नसतात. सरकारची मदत म्हणजे फुकटेपण असा अर्थ काढला जाणे धोक्याचे म्हणावे लागेल. एक तर राजकारणी आपल्या स्वत:च्या खिशातून काही देत नाहीत ते सरकारी तिजोरीतूनच देतात. सरकारी तिजोरीत येणारा पैसाही जनतेचा असतो आणि जनतेत फुकटे म्हणवले जाणारे सुद्धा असतात आणि त्यांनीही ही तिजोरी भरायला हातभार लावलेला असतो हे विसरून चालणार नाही. भारतातला प्रत्येक जन कुठल्या न कुठल्या प्रकाराने कर देत असतो हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. त्यामुळे त्यांना फुकटे म्हणणे योग्य नाही. कल्याणकरी राज्यात प्रगतीत मागे राहिलेल्यांना अशी मदत सरकारची जबाबदारीच आहे असेही म्हणता येईल. प्रश्न त्यांच्या स्वावलंबी होण्याचा व त्यांना सर्वांच्या बरोबरीने आणण्याचा आहे. येथे कदाचित तुम्ही म्हणाल्या प्रमाणे बरेच काही करता येण्या सारखे आहे आणि ते केले पाहिजे. धन्यवाद.-अनिल जवळेकर

    ReplyDelete
  3. श्री. लेले यांचा हा लेख आजच्या अनेक चिंताजनक तसेच प्रामुख्याने ज्यावर कृती आणि कारवाई व्हायला हवी अशा अनेक विषयांपैकी एका विषयाला हात घालणारा आहे.
    यावरील माझी मते आणि करता येण्यासारख्या कृती:
    कुठलीही गोष्ट कमीत कमी त्रासात आणि खर्चात कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणे हा मानवाचा स्थायी भाव झाला आहे आणि याचाच फायदा वेळोवेळी घेतला हातो.
    हा लेख आणि पर्यायाने विषय फक्त श्री. तावडेच नव्हे तर राजकीय मानसिकता असलेल्या सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यायोगे अशा व्यक्तींच्या मनाला तसेच बुद्धीला आव्हान आणि चालना सुद्धा मिळेल.
    त्याचा एक परिणाम असा होईल की मतदारांचा केवळ निवडणुकीपुरता अनुनय न करता मतदारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजकारण कसे वापरता येईल याचा विचार होऊ लागेल.
    आपला समाज लाचार, याचक व फुकट्या मानसिकतेचा न बनता तो पुरुषार्थी बनावा यासाठी लेखकाने नमूद केल्याप्रमाणे नेत्यांनी (सामाजिक आणि राजकीय), शिक्षकांनी, पालकांनी व सर्व संस्कार माध्यमांनीही काळजी घ्यायला हवी.
    त्यासाठी आपण ’पुरुषार्थ’ या शब्दाचा अर्थ वरील सर्वांना तसेच ’समाज’ या संज्ञेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत (लहान मुलांपासून तारुण्यावस्थेच्या शेवटाला आलेल्या प्रत्येकापर्यंत सुद्धा) पोहोचविला पाहिजे.
    याचे कारण असे की, जसे आई-वडील, शिक्षक यांजकडून मिळणा-या संस्कारांबरोबरच पुढारी, वर्तमानपत्रे, टीव्ही वरील मालिका, चित्रपट (लघु आणि दीर्घ) इत्यादी सर्वांच्या वक्तव्यांचा आणि कला-कृतींचा (?) लहान मुलांपासून तारुण्यावस्थेतील समाजाच्या मनावर परिणाम होत असतो, तसेच कुठला संस्कार हा सुसंस्कार आहे आणि कुठला कुसंस्कार आहे याचा योग्य निर्णय योग्य वेळी घ्यायची कुवत सुद्धा निर्माण झाली / केली पाहिजे.
    कारण संस्कार जेव्हा दिले किंवा केले जातात त्याच वेळेस मिळालेल्या संस्कारांपैकी कुठले घ्यायचे ते सुद्धा ठरविता येणे आवश्यक आहे.
    या उद्देशाला हातभार लावण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ? - राजेंद्र कोप्पीकर

    ReplyDelete