तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे काय? - रवीन्द्र महाजन


नुकतीच बातमी वाचली की नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी २३.४.२०१७ रोजी पंतप्रधानांसमोर सादर केलेल्या कार्ययोजनेप्रमाणे २०३२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना स्वतःचे घर, एक स्वयंचलित वाहन (दुचाकी वा चारचाकी) व थंड हवेसाठी वातानुकूलित यंत्र असेल. स्वप्नें पाहणे हा मानवी स्वभाव आहे व स्वप्नें ही छोटी न पहाता मोठी पहावीत असेच विचारशील मार्गदर्शकांचे मत असते.
खरे तर देशाच्या विकासाचा विचार करताना आधारभूत तत्त्वज्ञान – त्यावर आधारित ध्येय व उद्दिष्टें – त्यासाठी सुयोग्य धोरणे – मग कार्ययोजना – तिची अंमलबजावणी – सतत आढावा व आवश्यक सुधारणा असा क्रम हवा. मग नीति आयोगाची ही उफराटी रीत का?  
याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे अनेक राजकीय नेत्यांना व तथाकथित विचारवंतांना तत्त्वज्ञानाची आवश्यकता नाही असे वाटते. मंत्री व सरकारी अधिकारी यांच्या सुशासनातून (good governance) देशाचा आवश्यक विकास होईल अशी त्यांची समजूत व मांडणी असते. पण यात धोका आहे. आधारभूत राष्ट्रीय तत्त्वज्ञानाविनाच राष्ट्र पुनर्निर्माणाची प्रक्रिया चालविल्याने उद्देशहीन भटकंती होऊ शकते. उदाहरणार्थ इंदिरा गांधीची धोरणे १९६६ ते १९७६ एक प्रकारची व १९८० नंतर एकदम विपरीत!

दुसरे कारण आमचा नीति आयोग स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही अजूनही पाश्चात्य प्रभावाखाली दिसतो आहे व तिकडील यशस्वी वाटणा-या योजना इकडे-तिकडे करून इथे सक्षमतेने राबवल्यास द्रुतगतीने सकल घरेलु उत्पाद (GDP) वाढेल अशी त्याच्या धुरीणांची समजूत दिसते. राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत विविध सामाजिक क्षेत्रांची रचना व त्यांतील कार्य राष्ट्रीय सांस्कृतिक धारणा त्यावर आधारित जीवनदृष्टीनुसार असावयास हवे. अशा अधिष्ठानरूप जीवनदृष्टीविना विकसित होणा-या वा केल्या जाणा-या सामाजिक व्यवस्था आत्मविसंगत व अल्पजीवी होऊ शकतात याचा विचारही आयोगापुढे आहे असे वाटत नाही.
        
वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात पुनर्निर्माणाचे कार्य करणा-या नागरिकांसाठीही कार्यक्रमांची सैघ्दान्तिक समानता असली पाहिजे तसेच त्यांना समान साधन-सामग्रीही मिळाली पाहीजे या दृष्टीनेही राष्ट्रीय तत्त्वज्ञान अत्यंत महत्वपूर्ण हे.

१९८९ मध्ये रशियात कम्युनिझम कोसळला. एकेकाळी कम्युनिझमने भारलेले व नंतर भ्रमनिरास झालेले नवमानवतावाद (Radical Humanism) मांडणारे मानवेंद्र रॉयही तत्त्वज्ञानाचे महत्व अधोरेखित करतात.  मानवी विकाससंकल्पना ही संपूर्ण जीवनदृष्टी-जीवनपध्दतीतूनच विकसित होते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी या संदर्भात सांगितलेले तथ्य- Political doctrines and social theories are deduced from a philosophy having a comprehensive view of life- आवर्जून लक्षात घेता येते. (एकात्म मानव दर्शन – एक पर्याय ले. डा.बापू केंदूरकर, समग्र अध्ययन केंद्रासाठी, २००२ या लेखातून उद्धृत)
भांडवलशाही व्यवस्थेस २००८ मध्ये पुन्हा एकदा मोठा झटका बसला. अशा सतत येणा-या संकटांवर काही मार्गच सापडत नाही असे झाले आहे. पश्चिमी विकासनमुन्याचा आधार असलेल्या गेल्या ३-४ शतकांमध्ये पश्चिमेत विकसित झालेल्या, तुकडयातुकडयांतून जीवनाचा विचार करणाऱ्या मूलत: इहवादी, व्यक्तिवादी, भोगवादी, हक्कप्रवण, निसर्गाचे शोषण हा जन्मसिध्द अधिकार मानणाऱ्या व स्पर्धा-संघर्ष हेच जीवनव्यवहाराचे माध्यम मानणाऱ्या जीवनदृष्टीतून जगभरच्या मानवमात्राचे हित होईल ही आशा व्यर्थच ठरली आहे. पश्चिमेतही एवढया भौतिक प्रगतीच्या झगमगाटातही संपूर्ण मानवी जीवन पोखरणारे सांस्कृतिक अराजक अटळतेने विकसित झालेले दिसते कारण या प्रगतीला एका समग्र एकात्मिक जीवनदृष्टीचे अधिष्ठान प्राप्त होऊ शकले नाही. म्हणून आपण आपल्या राष्ट्रीय तत्त्वज्ञानाचीच कास धरली पाहिजे.
   
उपनिषद वचन आहे ''यत्करोति विद्यया करोति, तत् वीर्यवत्तर भवति।'' (कोणत्याही क्षेत्रात जे काही करावयाचे ते समजून उमजून करा, त्याने ते कार्य अधिक प्रभावकारी होईल). म्हणूनच राष्ट्रीय विकासाचे कार्य राष्ट्रीय तत्त्वज्ञानाच्या आधारेच केले पाहिजे कारण त्यातूनच आपण समाजाचे मानस नीट आकळू शकतो, व्यक्तींना प्रेरणा देऊ शकतो व आपल्या सर्वे भवन्तु सुखिनः या उद्दिष्टाकडे वाटचाल करू शकतो.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी १९६४-६५ मध्ये भारतीय चिंतनावर आधारित आजच्या काळानुरूप एकात्म मानव दर्शन ही राष्ट्रीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा मांडली आहे. हे तत्त्वज्ञान सध्या केंद्रात व अनेक राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने आपले मार्गदर्शक राष्ट्रीय तत्त्वज्ञान म्हणून अधिकृतरीत्या स्वीकारले आहे. पण नीति आयोग या संबंधी का बोलत नाही? त्याची सर्व धोरणे व योजना या तत्त्वज्ञानातील मांडणीशी कशा पूर्णपणे सुसंगत आहेत हे दाखवून देणे हे नीति आयोगाचे कर्तव्यच आहे. भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री तसेच सर्व खासदार यासंबंधी आग्रही आहेत हेही दिसले पाहीजे. त्यांनी जनतेला व कार्यकर्त्यांना आपल्या बोलण्यातून व कृतीतून सतत आश्वस्त करत रहाणे आवश्यक आहे.
किमान यापुढे तरी कोणतेही नवीन धोरण वा कार्ययोजना मांडताना नीति आयोग या बाबी एकात्म मानव दर्शनातूनच कशा आल्या आहेत वा त्याच्याशी कशा सुसंगत आहेत हे आवर्जून मांडेल ही भाजपच्या मतदारांची अपेक्षा आहे.
ताजा कलम – २०३२ सालच्या स्वप्नावर टीका झाल्याने किंवा स्वतःलाच काही वाटल्याने नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी इकॉनॉमिक टाइम्सला २.५.२०१७ दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की आम्ही वेळेअभावी भविष्यचित्र (Vision) व रणनीति (Strategy)  मांडू शकलो नाही. पण आम्ही त्यावर काम करीत आहो.

13 comments:

  1. अहवाल सोडून त्याविषयीच्या बातमीवरच टीका केल्यासारखे वाटते. हे साप म्हणून भुई धोपटणे नव्हे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. या अहवालाचे फक्त सादरीकरण झाले आहे असे वाटते. सरकारने हा अहवाल मान्य केला असेही अजून पुढे आले नाही. चर्चेसाठी नीति आयोगाने हा अहवाल प्रसृत केला असेही दिसत नाही. आवश्यक वाटले तर त्यावर लिहिता येईल.
      या लेखाचे महत्वाचे मुद्दें तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते व ‘आधारभूत तत्त्वज्ञान – त्यावर आधारित ध्येय व उद्दिष्टें – त्यासाठी सुयोग्य धोरणे – मग कार्ययोजना – तिची अंमलबजावणी – सतत आढावा व आवश्यक सुधारणा’ असा क्रम असावा पण तो ठेवला जात नाही तसेच एकात्म मानव दर्शनाचा आधारभूत तत्त्त्वज्ञान म्हणून स्वीकार केल्यावर त्यानुसार मांडणी असावी हे आहेत.-- रवींद्र महाजन

      Delete
  2. मला वाटलेले काही मुद्दे
    १. मुळात नीती आयोगाच्या घोषणेपाठी तत्वज्ञान नाही अशा स्वरूपाचे premise जाणवते जे चुकीचे असू शकते. ज्याला Capitalism म्हणून ओळखले जाते अशी विचारसरणी नीती आयोग चालवणाऱ्या अर्थतज्ञांची आहे. पण हा टोकाचा Capitalism नसून ज्यात सरकार enabling role करू शकेल असे मानले जाते त्या स्वरूपाचा आहे. हे एक तत्वज्ञान आहे असे म्हणता येईल आणि मानवाच्या भौतिक जगातील वागण्याच्या निरीक्षणांवर आधारित मांडणी त्यात आहे. ह्या तत्वज्ञानाला काही पारलौकिक ध्येय साधायचे नाही म्हणून ते तत्वज्ञान होत नाही असे नाही.
    २. २००८ सालचे रिसेशन किंवा अन्य काही संकटे ही भांडवलशाही संपवू शकत नाहीत. पण अशा बूम आणि बस्ट येत राहणे हे भांडवलशाहीमध्ये घडत राहणार. ह्याचे प्रमुख (एकमेव नव्हे) कारण त्यात असलेली वस्तू-मूल्यावर आधारित नसलेली स्वैर चलनव्यवस्था आहे. भांडवलशाही ही मानवी समाजात अनेक वर्षे आढळणारी रचना आहे. संसाधनांची मालकी आणि त्याद्वारे येणारी पॉवर हे गाठायचा प्रयत्न मनुष्यप्राणी काही आधुनिक काळात (म्हणजे रेनेसांनंतर) वगैरे करू लागला असे नाही. (अर्थात प्राचीन सनातन भारतात असे नव्हते हो असे असेल तर तिथे मी काही बोलू शकत नाही! बोलणे खुंटलेच). भांडवलशाही एवढेच सांगते कि मनुष्याच्या स्वतःचे भौतिक हित साधायच्या स्वाभाविक इच्छेतून निर्माण होणारी आर्थिक व्यवस्था ही अन्य पर्यायांपेक्षा उत्तम आहे. not absolutely best, but relatively best! दुसरं म्हणजे भांडवलशाही ही positive theory आहे. म्हणजे मनुष्यप्राणी का असे वागतात हे ती स्पष्ट करते. त्यांनी असे वागावे का नाही हा प्रश्न ती सोडवताच नाही. म्हणजे सगळ्यांनी भौतिक सुख शोध रे असे ती काही सांगत नाही, तर बहुतेकजन भौतिक सुख शोधतात ह्या गृहितकावर ती मांडणी करते.
    ३. आता कुठलाही समाज हा काही केवळ आर्थिक रचनेत नसतो. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा तीन प्रतलात समाजव्यवस्था असते. आज जी जगभरात व्यवस्था आहे तिला लोकशाही भांडवलशाही (domocratic capitalsim) असं म्हणता येईल. ही व्यवस्था कळीचा मुद्दा आहे. व्यक्तीच्या भौतिक सुखाच्या तहानेतून विकास आणि ह्या विकासाच्या पायाशी असलेले व्यक्ती स्वातंत्र्य आणि शासनाची पंचाची आणि पब्लिक गुड देण्याची तेवढी भूमिका अशी आपण त्याची संक्षिप्त मांडणी करू शकूओ. प्रत्येक व्यक्ती ही आपापला मूल्य निर्णय करू शकेल आणि त्यामुळे केवळ इतरांची हानी होणार नाही एवढ्याच मर्यादेत व्यक्तीचे स्वातंत्र्य नियंत्रित केले जावे असे ही व्यवस्था मानणारे लोक मानतात. (अर्थात अशा व्यवस्थेत राहणारे सर्व लोक असे मानतात असे नाही. पण लोकशाही भांडवलशाहीचे वैशिष्ट्य असे कि हि व्यवस्था न मानणाऱ्या लोकांनाही ह्या व्यवस्थेचे फायदे पूर्ण मिळू शकतात. काही थोड्या शहाण्या लोकांनी सर्वांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवले तर काय वाईट असेही लोक मानतात, पण तरी ते लोकशाही भांडवलशाहीमध्ये असू शकतात.)
    ४. 'तत्वज्ञान' आवश्यक आहे का हा प्रश्न जर खरोखर विचारायचा असेल तर तो व्यक्तीस्वातंत्र्य आणि सर्वंकष तत्वज्ञान (totalitarian, व्यक्तीने कसे वागावे हे निर्धारित करणारे तत्वज्ञान) ह्यांच्या तुलनेने मांडला पाहिजे असं मला वाटतं.

    ReplyDelete
    Replies
    1. १ नीति आयोगाचे सुप्त तत्त्वज्ञान भांडवलशाही (capitalism) हेच असेल पण भांडवलशाहीचे अनेक प्रकार मांडले, वापरले गेले असल्याने योजना व कार्यक्रम बनवणा-या संस्थेने तिला नेमके कोणते तत्त्वज्ञान, कोणती उद्दिष्टे व धोरणे अपेक्षित आहेत हे मांडूनच पुढे कार्यक्रम आखावेत हेच योग्य नाही का? तत्त्वज्ञानात पारलौकिक उद्दिष्ट असावेच असे सर्वांना वाटत नसेल हे आपण समजू शकतो. पण तत्त्वज्ञानात स्वतःचे स्वरूप नीट समजून घेणे व त्यातून जगही आकळण्याचा प्रयत्न करणे याला प्राथमिकता असली पाहिजे हा हिंदू विचार आहे. हे आपल्या पूर्वजांपैकी अनेकांनी साधले आहे. त्यातून त्यांनी समाजजीवनाची रचना केली व अध्यात्म व समृद्धि यांचा शेकडों (कदाचित काही हजार) वर्षे प्रत्यक्षात सुमेळ घालून दाखविला. दीनदयाळजींनी भारतीय चिंतनाच्या आधारावर मांडलेले एकात्म मानव दर्शन असेच एक पाऊल आहे. या पूर्वसंचिताचा काळानुरूप आवश्यक त्या बदलासह आपण सुयोग्य उपयोग करून घेत नसू किंवा विचारच करणार नसू तर ते आपलेच दुर्देव ठरेल.

      २ मनुष्याचा मूळ स्वभाव हा जगाच्या सुरूवातीपासून आजपर्यंत व सर्व ठिकाणी सारखाच आहे. पण त्या स्वभावाची व्यक्तिगत व सामाजिक अभिव्यक्ती स्वप्रयत्न, संस्कार, नैसर्गिक परिस्थिती, आजबाजूच्या लोकांचे वागणे, प्रेरणाना उत्तेजन व अडथळा कशा प्रकारे येतो, समाजाचे धुरीण कोणत्या तत्त्वज्ञानाचा उद्घोष करतात व कसे वागतात इ. कारकांमुळे बदलू शकते.

      मनुष्यात स्वार्थ व परहिताची भावना दोन्ही असतात. पण भांडवलशाहीचे काही तत्त्ववेत्ते (सगळे नाही) हे सर्व स्वार्थ साधणे हेच स्वाभाविक व योग्य अशी तात्त्विक मांडणी करत प्रस्थापितांनी केलेली पिळवणूकही ही त्या परिस्थितीत अपरिहार्य असते हे मांडतात हे अयोग्य होय.

      भांडवलशाही लोकांनी कसे वागावे याचा विचार करीत नाही किंवा त्यात सामाजिक मूल्यांना स्थान नाही हे प्रस्थापितांच्या हिताचे असल्यानेच याच्या विरोधात भरपूर साहित्य निर्माण होऊनही यात बदल का होत नाही? प्रश्न भांडवलशाहीला पूर्ण विरोध करण्याचा वा तिच्या बाजूने उभे रहाण्याचा किंवा थोडा विरोध थोडा पाठिंबा असा नसून चांगला पर्याय शोधण्याचा आहे. सुदैवाने आपल्या देशात हे चिंतन होते व आहे. त्याचा उपयोग करून नवीन दिशा ठरवून मार्गक्रमण करण्याचा ध्यास विचारवंतांनी घेतला पाहिजे.

      ३ आपल्या हिंदू चिंतनाप्रमाणे मानवाला मूळ आंस अभय, स्वतंत्रता व आनंद यांची असते. त्यामुळे स्वातंत्र्यावर घाला घालणे किंवा अनावश्यक संकोच करणे हे आपल्याला मान्य नाही. सामाजिक संदर्भातही जी बंधने आवश्यक असतील तीही किमान असावीत व शक्यतो व्यक्तीने ही स्वतःहूनच स्वीकारावीत यावर भर आहे. यासाठी संस्कार, स्वाध्याय, आत्मसंयमाची शिकवण इ. चा उपयोग करून घेतला पाहिजे. वेगवेगळे विचार असणा-या व मांडणा-या लोकांना समाजात स्थान पूर्वीही होते व राहिले पाहिजे.

      ४ एकात्म मानव दर्शन तुलनात्मकदृष्ट्या नक्कीच मांडता येईलच.
      -- रवींद्र महाजन

      Delete
  3. 'आधारभूत राष्ट्रीय तत्वज्ञान' ह्याबाबत काही गोष्टी

    १. भारत हे एकमेवाद्वितीय राष्ट्र आहे आणि त्यामुळे अन्य देशांना लागू होणाऱ्या गोष्टी भारताला लागू होत नाहीत असं असेल तर मग अन्य देशांच्या अभ्यासाचा प्रश्न उद्भवत नाही. पण विचार करणाऱ्या माणसाला असं दिसू शकतं मानवी स्वभाव हाच शेवटी साऱ्या मांडणीच्या मुळाशी असल्याने वेगवेगळ्या देशांच्या अवस्थांत स्वाभाविकपणे एक तौलनिक साधर्म्य असते. ह्या तौलनिक साधर्म्याला अनुसरून आपण असा प्रश्न विचारू शकतो कि 'आज कुठल्या देशांच्या सोबत असे 'राष्ट्रीय तत्वज्ञान' आहे? भूतकाळात असे राष्ट्रीय तत्वज्ञान स्वीकारणाऱ्या देशांचे अनुभव काय आहेत? राष्ट्रीय तत्वज्ञान हे सरतेशेवटी (totalitarian) हुकुमशाही बनते का, जाचक किंवा दयाळू, पण काही थोड्या व्यक्तींनाच निर्णयप्रक्रियेत सहभाग देणारी? आपण अनेक देशांचा अभ्यास करून ह्याबाबत काही तात्पर्य काढू शकतो.
    २. 'लोकशाही भांडवलशाही' ही आर्थिक-राजकीय रचनेची एक (Universal) वैश्विक पद्धती आहे. त्याला 'अधिभौतिक' असे म्हणता येईल. ही पद्धती माणसाच्या सार्वजनिक (वैयक्तिक नाही असे ते सर्व, अगदी कौटुंबिकसुद्धा) जीवनाला थेट नियंत्रित करते (राजकीय पैलू) आणि तिच्या आर्थिक बाजूंत मालकी अधिकार आणि स्पर्धात्मक भांडवलशाही ह्यांचा अंतर्भाव असतो. सरकारचे काम जिथे market failure अशा ठिकाणी सहभागी होण्याचे असते आणि मालकी अधिकार आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याचे असते. असे का असावे ह्याचा उहापोह मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पण अर्थात हे मानवाच्या भौतिक जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि ते उपयुक्ततावादी पायावर उभे आहे.
    आता भारताने ही वैश्विक पद्धती स्वीकारली (खरंतर, अर्धी-मुर्धी इन स्पिरीट आणि अर्धा पाव इन practice) ह्याकडे दोन पद्धतीने बघता येईल, एक म्हणजे भारतीय policymakers हे काही तात्विक निर्वातात काम करत नाही आहेत, एक वैश्विक विचार पद्धतीमध्ये ते ट्रेन आहेत आणि ते ती अप्लाय करत आहेत. दुसरा दृष्टीकोन असा असू शकतो कि ही पद्धती भारतातून बनली नाही ना मग ती विचारपद्धती नव्हेच. मी दुसरा दृष्टीकोन चुकीचा मानतो किंबहुना तो केवळ आत्मप्रौढीचा आणि त्यातून येणाऱ्या जे आमचे म्हणता येत नाही ते एकतर कसेही आमचे दाखवा किंवा चुकीचे म्हणा ह्या वर्तनाचा भाग आहे.
    ह्या विचार पद्धतीत सुधारणेला वाव नाही का? आहे, लोक त्यावर काम करत आहेत. बाब अशी आहे कि मुळात व्यक्ती स्वातंत्र्य मुलभूत मानल्याने आधुनिक लोकशाही भांडवलशाही ही अनेक छटांना सामावू शकते आणि त्यामुळे तिचा पर्याय हा व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाराच असावा लागतो असे म्हणता येईल. जर पर्याय म्हणून स्वतःचा विचार करणारी बाजू व्यक्तीस्वातंत्र्य मानेल तर ती आपोआपच आधुनिक लोकशाही भांडवलशाहीचा भाग बनेल.
    व्यक्तीमध्ये काय चांगले-काय वाईट हे ठरवण्याची क्षमता असते आणि अशी क्षमता आल्यावर व्यक्ती आपले प्राधान्यक्रम ठरवू शकते. शासनाने ही क्षमता येण्यासाठीचे काम करावे (capability development). ह्या क्षमता आल्यावर क्षमतेने येणाऱ्या स्वातंत्र्याचा अविष्कार हाच विकास (development as freedom) अशी सेन ह्यांची मांडणी आहे (हे मला समजलेले आहे, चुकीचे असू शकते. प्राचीन भारतीय चिंतनातील 'या विद्या सा विमुक्तये' ह्या ओळींशी मला 'development as freedom चे साम्य जाणवते.), जी लोकशाही भांडवलशाहीने वागणारी सरकारे implicitly किंवा explicitly स्वीकारतात. ही लोकशाही भांडवलशाहीची normative (आदर्शवादी) अशी मांडणी म्हणता येईल.
    पर्यायी मांडण्या ह्या व्यक्तीलाच व्यक्तीसाठी काय चांगले ह्या गृहितकाला छेद देतात. एकात्म मानवतावाद असे करतो का? वरील कोअर मांडणीला काय प्रतिवाद देता येईल? (माझ्या मते काहीच नाही, unless आपण व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत असण्याचा संकोच करू, जे माझ्या मते समाजाला खिळखिळे करून सोडणारे काम आहे. किमान आर्थिक अंगाला व्यक्तीस्वातंत्र्य द्यावेच लागते, मग राजकीय बाजूला त्याचा संकोच करता येतो, उदाहरणार्थ चीन)

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. प्रतिक्रिया ३ (A Spectator) उत्तर –
      १ सर्व देशांचा तौलनिक अभ्यास करणे योग्यच आहे. त्यातून नक्कीच लाभ होईल. पण त्यातून निघणा-या चांगल्या गोष्टी सर्वच देशांत तितक्याच चांगल्या परिणामकरक होतील असे नव्हे. कारण प्रत्येक देशाचा एक स्वभाव बनतो जो त्या देशाची भौगोलिक परिस्थिती, हवामान, इतर देशांशी आलेल्या संबंधांचा अनुभव, त्या राष्ट्रात झालेले चिंतन, इतिहासातील प्रमुख घटना, त्यातून घेतलेला बोध, इतर देशांशी आलेल्या संबंधांचा अनुभव इ. अनेक कारकांनी बनतो. या स्वभावामुळे जीवनसाफल्याचा विचार, प्रेरणा, इतराकडे व निसर्गाकडे पहाण्याची दृष्टी इ. भिन्न असू शकतात. यांचा विचार करूनच देशाच्या विकासाची धोरणे बनवणे आवश्यक आहे. या राष्ट्रीय स्वभावाला एकात्म मानव दर्शनात ‘चिति’ असे म्हटले आहे.
      २ लोकशाही शब्द वापरला जातो पण निवडून आलेल्या बहुमतातील प्रतिनिधींचा कारभार असाच जो व्यवहार दिसतो तो निखळ लोकहिताचा किंवा जास्तीत जास्त लोकहिताचा असेलच असे नाही. तो कधी चांगला, कधी मनमानी, कधी लूट करणारा, कधी काही वर्गावर अन्याय करणारा असा दिसतो. लोकशाही पद्धतीतही सुधारणा हवी. लोकशाहीचा गाभा काय? युनोने या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी प्रकाशित केलेल्या Democracy या Jean Baechler यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत UNESCO चे Federico Mayor (Director General) म्हणतात “Culture of democracy is based on freedom of expression, respect for human rights, acceptance of civil responsibilities, pluralism and mutual understanding.” आणि “The cultivation of that ‘art of thinking independently together’ which in a true democracy should approximate to a second nature.” आपल्याकडे हे ब-यापैकी होते. त्यामुळे केवळ पाश्चात्य पद्धतींमध्ये अडकून न पडता, आपल्या परंपरेत काय होते याचाही डोळस अभ्यास आपण करावा, चुकीचे वा आज अप्रस्तुत असेल ते टाकून द्यावे, पाश्चात्त्यांच्या अनुभवातून शिकावे व या देशाच्या मानसाला अनुकूल अशा पद्धतींमध्ये शोधन करीत रहावे हेच आवश्यक नाही का?
      आपल्या हिंदू चिंतनाप्रमाणे मानवाला मूळ आंस अभय, स्वतंत्रता व आनंद यांची असते. यांची संपृक्ती करणे हीच आपली दिशा असावयास हवे. मात्र मार्ग वाकडा-तिकडा, अवघड, चढाचा असू शकेल. (रवीन्द्र महाजन)

      Delete
  4. The efforts are very much appreciable and are necessary.Can a facility of writing in marathi be provided in the blog itself? Though the Hindu( Vedic)philosophy has been appreciated by many western scholars and is therefor likely to accepted by many if not by all we may have to rewrite it considering the developments in the field of Evolution theory including Modern Genomic theory. Gaia hypothesis, Modern Brain development theory etc. I think while writing the modern philosophy we will have to consider the Human being as a whole instead of just Bharatiy. The philosophy shall be acceptable and applicable to all human beings on the earth irrespective of nationality, religious group, ethnic group,political orientation etc. The Bharteey (Vedic) philosophy rewritten in modern scientific language will certainly answer this call.
    Thank you very much for a thought provoking initiative.

    ReplyDelete
  5. १ गूगलमध्ये जाऊन मराठी भाषेत पण रोमन लिपीत टाईप केल्यास ते देवनागरीत बदलते. तेथून ते येथे घालता येईल. पण मुळात सरळ देवनागरीत टंकलेखन करणे तितके अवघड नाही. थोड्याशा सरावाने सहज येईल. सर्व नव्या संगणकात मराठी युनिकोड असतेच, जुन्यात नसल्यास घालता येईल.
    २ उल्लेखिलेली नवी तंत्रज्ञाने ही कोठेही मूळ हिंदू तत्त्वज्ञानाच्या विरोधी नाहीत, उलट त्याला ती बळच देतात.
    ३ मूळ हिंदू तत्त्वज्ञान हे मानवमात्रासाठीच आहे, म्हणूनच हिंदू किंवा तत्सम शब्द नव्हता. परदेशी आक्रमकांनी आणलेल्या संकुचित तत्त्वज्ञानामुळे आपल्या सर्वजनीन तत्त्वज्ञानाला हिंदू हे वेगळे नाव मिळाले.

    ReplyDelete
  6. I would like to point this item from BJP manifesto.

    Housing - No Longer a Mirage
    We will roll out a massive Low cost Housing programme to ensure that by the time the nation completes 75 years of its Independence, every family will have a pucca house of its own. It will be an innovatively designed scheme that dovetails various existing programmes and also encourages the housing sector by appropriate policy interventions and credit availability including interest subventions, where necessary.


    Our proposed programme will further ensure that these houses are equipped with the basic facilities of toilet, piped water supply, electricity and proper Access. To do this we will amongst others:
    - Prioritize all our resources towards this goal.
    - Leverage on land as a resource in urban areas and demand for unskilled labour in the rural areas.
    - Innovatively structure the programme to converge and dovetail various existing programmes, while adding the missing links.
    - Simultaneously encourage the overall housing sector, through appropriate policy interventions and credit availability and interest subvention schemes.
    http://guide-india.blogspot.in/2016/06/housing-modi-govt-economic-policy-and.html

    ReplyDelete
  7. एकात्म मानवतावाद हे केवळ तत्वज्ञान नसून भारतीय आत्मभानाला अनुसरुन मांडलेले व्यावहारीक तत्व आहे. भारताचा हा स्वभाव लक्षात घेवून सर्व योजना केल्या तरच त्या यशस्वी होतील. पण हा नेमका स्वभाव कसा आहे. भारतीय मातीत सुख म्हणजे काय?, उन्नती म्हणजे काय? समाधान म्हणजे काय? हे भाजपा कार्यकर्त्यांनी समजावून घेतले पाहीजे. निदान संघ, परिवारातील संस्थांनी एक विचार गट तयार करुन एकात्म मानवता वादाच्या तत्वज्ञानावर आधारीत व्यावहारीक अर्थशास्त्र तयार केले पाहीजे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रिया Pravin Deshmukh15 May 2017 at 03:58 उत्तर
      हे आवश्यकच आहे. अशा मुद्द्यांचा विचार करून एकात्म मानवदर्शनाच्या आधारावर अर्थशास्त्राची रूपरेषा NATIONAL POLICY STUDIES in the Light of Ekatma Manav Darshan या पुस्तकात मांडली आहे. भारतीय विचार साधना, पुणे येथे उपलब्ध आहे. (रवीन्द्र महाजन)

      Delete
  8. My opinion on तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे काय?

    I fully agree with the fact that we all Indians must be guided by the Indian Philosophy (Hinduism) which will always ensure genuine progress of community at large instead of deceptive materialistic progress pursued by western world.
    - Neena Akerkar

    ReplyDelete